नारायण राणे भाजपचे पोपटलाल… ‘हे’ आरोप सिद्ध करा, संजय राऊतांनी कोर्टात खेचलं…
संजय राऊत यांनी नारायण राणेंविरोधात ठोकलेला दावा किती कोटींचा आहे, असा सवाल विचारला जात आहे. यावर राऊत यांनी स्पष्टच सांगितलं.
मुंबईः नारायण राणे (Narayan Rane) आणि किरीट सोमय्या (Kirit Somaiya) हे भाजपचे (BJP) पोपटलाल असल्यासारखं बोलतात, असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे. मात्र या नारायण राणे यांच्या आरोपांवरून संजय राऊत यांनी आता कठोर भूमिका घेतली आहे. उठसूठ शिवसेनेवर बिनबुडाचे आरोप करतात. आता इनफ इज इनफ. यापुढे तथ्यहीन आरोप ऐकले जाणार नाहीत. आमच्यापैकी बहुतांश शिवसैनिक या सर्वांना कायदेशीर उत्तर देण्याच्या तयारीत आहेत. नारायण राणे यांनी केलेल्या वक्तव्याविरोधात मी कायदेशीर नोटीस दिली आहे. त्यांनी एक तर माफी मागावी किंवा कोर्टात त्यांचं वक्तव्य सिद्ध करावं, असं आव्हान संजय राऊत यांनी दिलंय.
काय म्हणाले संजय राऊत?
नारायण राणेंविरोधात मानहानीचा दावा ठोकणाऱ्या संजय राऊत यांनी आज माध्यमांसमोर सविस्तर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, ‘ नारायण राणे, किरीट सोमय्या हे भाजपचे पोपटलाल आहेत. ते उठ सूठ शिवसेनेवर बिनबुडाचे आरोप करत असतात. तथ्यहिन विधानं करतात. तर आता पुरे म्हणण्याची वेळ आली आहे. कायदेशीर लढाई लढणार आहोत, अशी माहिती संजय राऊत यांनी दिली.
कोणत्या विधानावर आक्षेप?
‘२००४ साली नारायण राणे यांनीच संजय राऊत यांना खासदार केलं. त्यावेळी त्यांचं नाव मतदार यादीत नव्हतं, असा दावा नारायण राणे यांनी केलाय. यावरून संजय राऊत यांनी आक्षेप घेतला आहे. तुम्ही मला खासदार केलं तर तेव्हा मग शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे काय करत होते? असा सवाल संजय राऊत यांनी केलाय.
मी बांग्लादेशी की पाकिस्तानी?
शिवसेना प्रमुख होते ते. बाळासाहेबांना शिवसना प्रमुख म्हणून मीच नेमलं, असंच म्हणायचं बाकी आहे. २००४ साली मी सामनाचा संपादक होतो. मतदार यादीत नाव नव्हतं म्हणतात. मी काय बांग्लादेशी की पाकिस्तानी नागरिक आहे का? भारताचा नागरिक आहे. महाराष्ट्राचा नागरिक आहे. अनेकदा मतदान केलंय, असं वक्तव्य संजय राऊत केलं.
माफी मागा अन्यथा दावा सिद्ध करा…
२००४ साली माझं नाव मतदार नोंदणी यादीत होतं. त्यांनी यादी चेक करावी. भाजपच्या नादाला लागून किती खोटं बोलावं? त्यांनी माफी मागितली नाही तर मी कोर्टात त्यांच्याविरोधात खटला दाखल करतोय. शिवसेनेचे बहुतांश लोक या लोकांवर खटले दाखल करत आहेत, अशी माहिती संजय राऊत यांनी दिली.
किती कोटींचा दावा?
संजय राऊत यांनी नारायण राणेंविरोधात ठोकलेला दावा किती कोटींचा आहे, असा सवाल विचारला जात आहे. यावर राऊत यांनी स्पष्टच सांगितलं. ते म्हणाले, ‘ पैशांसाठी दावा दाखल करत नाही. यांची चाराण्याचीही लायकी नाही. चंद्रकांत पाटलांवर मी सव्वा रुपयाचा खटला दाखल केला होता. माझी, पक्षाची प्रतिष्ठा यासाठी ही कायदेशीर लढाई लढू. या लोकांना कोर्टात खेचणार. त्यांचे पुरावे सादर करावेत. आमचं नाणं खणखणीत आहे. आम्ही सत्याची बाजू घेत आलो आहोत. बाळासाहेब ठाकरे यांचा संस्कार आहे.
मी खासदार केलं म्हणतात… तुम्हालाच मुख्यमंत्री बाळासाहेब ठाकरे यांनी दिली. आम्हाला सर्व पदं आधी बाळासाहेब ठाकरे यांनी दिली आणि नंतर उद्धव ठाकरे यांनी दिली. याचं भान राखायला हवं.
‘सुशिक्षितांनी भाजपाला नापास केलं’
विधान परिषद निवडणुकांमध्ये भाजपाचा दारुण पराभवाचा सामना करावा लागलाय. यावरून संजय राऊत यांनी जोरदार टीका केली. ते म्हणाले, ‘ पाच पैकी एक जागा जेमतेम भाजप जिंकू शकली.. उमेदवार उधारीचाच आहे. ती जागा शेकापकडे होती. महाविकास आघाडी म्हणून ती जागा शेकापला दिली होती. सुशिक्षित आणि पदवीधरांनी भाजप आणि त्यांच्या सरकारचा पराभव केलाय, हेच यातून दिसून येतंय.