Sanjay Raut : ‘इथं आमचा खून होऊ शकतो’, एकनाथ शिंदेंसोबत असलेल्या आमदारांबाबत संजय राऊतांचा मोठा दावा
'अनेक आमदारांनी तिथून सुटण्याचा प्रयत्न केला, त्यांच्यावर दहशत आणि खुनी हल्ले झाल्याची माहिती आम्हाला मिळतेय. काही आमदारांनी कळवलं आहे की आमच्या जिवाला धोका आहे. इथे आमची हत्याही होऊ शकते', असा मोठा दावा संजय राऊत यांनी केलाय.
मुंबई : विधान परिषद निवडणुकीत (Vidhan Parishad Election) उमेदवार काँग्रेसचा हरला, पण भूकंप शिवसेनेत झाल्याचं पाहायला मिळत आहे. कारण शिवसेनेचे मातब्बर नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड पुकारलं आहे. एकनाथ शिंदे हे सध्या सूरतमध्ये हॉटेल लि मेरेडियनमध्ये आहेत. तिथे त्यांच्यासोबत शिवसेनेचे 20 पेक्षा अधिक आमदार असल्याचं सांगितलं जात आहे. या हॉटेलबाहेर गुजरात पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. अशावेळी शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेल्या आमदारांबाबत मोठा दावा केलाय. ‘अनेक आमदारांनी तिथून सुटण्याचा प्रयत्न केला, त्यांच्यावर दहशत आणि खुनी हल्ले झाल्याची माहिती आम्हाला मिळतेय. काही आमदारांनी कळवलं आहे की आमच्या जिवाला धोका आहे. इथे आमची हत्याही होऊ शकते’, असा मोठा दावा संजय राऊत यांनी केलाय.
‘दहशत आणि खुनी हल्ले झाल्याची माहिती मिळतेय’
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत शिवसेनेच्या मुंबईत असलेल्या आमदारांची बैठक पार पडली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी गंभीर आरोप केलाय. ‘गुजरात पोलिसांच्या केंद्रीय पोलिसांच्या गराड्यात त्यांना ठेवण्यात आलंय. अनेक आमदारांनी तिथून सुटण्याचा प्रयत्न केला, त्यांच्यावर दहशत आणि खुनी हल्ले झाल्याची माहिती आम्हाला मिळतेय. काही आमदारांनी कळवलं आहे की आमच्या जिवाला धोका आहे. इथे आमची हत्याही होऊ शकते. अशाप्रकारचं वातावरण का तयार केलं जात आहे मला माहिती नाही. पण यातूनही शिवसेना बाहेर पडले. शिवसेनेचं संघटन यातून पुन्हा एकदा उभं राहिल. कुणी कितीही म्हणत असले तरी संघटनेला कुठेही तडा गेलेला नाही. संध्याकाळी पुन्हा बैठक आहे. अनेक आमदारांनी आमच्याशी विविध मार्गांनी संपर्क साधला’, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.
एकनाथ शिंदेंना गटनेते पदावरुन हटवलं
आमदारांच्या बैठकीत अजय चौधरी यांची विधिमंडळ पक्षाच्या गटनेतेपदी एकमताने निवड करण्यात आलीय. एकनाथ शिंदे आमचे सहकाही आहेत, आमचे मित्र आहेत. अनेक वर्षापासून आम्ही एकत्र काम केलं आहे. नक्कीच बाळासाहेब ठाकरे असतील, ते म्हणतात त्याप्रमाणे धर्मवीर आनंद दिघे असतील. या सगळ्यांसोबत एकत्र काम केलं आहे. मुळात काही गैरसमज निर्माण झाले असतील तर ते दूर होऊ शकतात. शेवटी शिवसेना हा एक परिवार आहे, कुटुंब आहे. त्यामुळे मी त्यांना आवाहन केलं आहे की मुंबईत या आपण चर्चा करू. तिथे जाऊन चर्चा करणं शिवसेनेच्या शिस्तीत बसत नाही.
9 आमदारांच्या कुटुंबियांची तक्रार – राऊत
इतकंच नाही तर अनेक आमदारांच्या कुटुंबियांनी तक्रार केलीय. अकोल्याचे आमदार नितीन देशमुख यांच्या पत्नीने तक्रार केलीय की त्यांचं अपहरण करुन त्यांना सूरतला नेण्यात आलं आहे आणि त्यांच्या जिवाला धोका आहे. आतापर्यंत अशा 9 आमदारांच्या कुटुंबियांनी तक्रारी केलेल्या आहेत. हे असंच चालू राहिलं तर मुंबई पोलिसांना याबाबत कठोर अॅक्शन घ्यावी लागेल हे सगळ्यांना माहितीय, असा इशाराही संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे आणि भाजपला दिलाय.