मी काय एमआयएमचा नेता आहे का? संजय राऊत यांचा भाजपला सवाल
शिवसेना पुढे येऊन बोलत नाही. प्रस्ताव देत नाही या भाजपच्या आरोपाचा शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी (Sanjay Raut hit BJP) खरपूस समाचार घेतला आहे.
मुंबई: शिवसेना पुढे येऊन बोलत नाही. प्रस्ताव देत नाही या भाजपच्या आरोपाचा शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी (Sanjay Raut hit BJP) खरपूस समाचार घेतला आहे. विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यापासून मी प्रस्ताव काय होता यावर बोलत आहे. तरिही शिवसेनेने प्रस्ताव दिला नाही, असं म्हणत असाल तर मग मी काय एमआयएमचा नेता आहे का? असा सवाल संजय राऊत (Sanjay Raut on BJP Allegations) यांनी केला. स्वतः शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील 24 ऑक्टोबरला निकालानंतर ठरल्याप्रमाणे 50-50 च्या फॉर्म्युल्यानुसार सत्तावाटप व्हावी, हे स्पष्ट केलं आहे, असंही राऊत यांनी नमूद केलं.
संजय राऊत म्हणाले, “महाराष्ट्रातून 48 खासदार निवडून जातात. विधानसभेत 288 आमदार आहेत. देशाची आर्थिक राजधानी मुंबई महाराष्ट्रात आहे. हे इतकं मोठं आणि महत्त्वाचं राज्य आहे. मात्र, काही लोकांच्या हट्टासाठी हे मोठं राज्य राष्ट्रपती राजवटीकडे ढकललं जात आहे. शिवसेना असं कधीच होऊ देणार नाही.”
भाजपसोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिवसेनेकडून कोणताही प्रस्ताव मिळाला नसल्याचं म्हटलं आहे. यावर विचारलं असता राऊत म्हणाले, “भाजप-शिवसेना युती होती. आमचं युती करतानाच ठरलं होतं. मात्र, शरद पवारांचं आणि आमचं काहीही ठरलं नव्हतं. त्यामुळे त्यांनी प्रस्ताव आला नाही हे म्हणणं योग्य आहे.”
“आमच्यासाठी चर्चेचा विषय संपला, नातं आणि विश्वास महत्त्वाचा असतो”
सत्तास्थापनेबाबत शिवसेना भाजपसोबत चर्चा करणार की नाही यावरही संजय राऊत यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, “सत्तास्थापनेचा प्रस्ताव एकाच ओळीचा आहे. 50-50 सत्तावाटप. त्यावर चर्चेचा विषयच येत नाही.”
दरम्यान, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले होते, “शिवसेनेने अद्याप कोणताही प्रस्ताव दिलेला नाही. शिवसेनेसोबत चर्चा करण्यासाठी भाजपची दारं 24 तास उघडी आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात सरकार स्थापन होणार आहे. महाराष्ट्राच्या जनतेने जो कौल दिला आहे, त्याचा आदर ठेवून, देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात लवकरात लवकर सरकार स्थापन होईल, याबाबत आमच्या मनात शंका नाही.”
संबंधित बातम्या:
सेनेने अद्याप प्रस्ताव दिलेला नाही, मात्र देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री : चंद्रकांत पाटील
शिवसेना फार पुढे गेली आहे, त्यामुळे दरवाजा खुला आणि दारांच्या फटीला महत्त्व नाही: संजय राऊत
शिवसेनेला प्रस्ताव दिला आहे, कोणत्याही क्षणी गोड बातमी: सुधीर मुनगंटीवार