Sanjay Raut : ‘शिवसेनेला डावलून काही ठरवाल तर तुमच्या खुर्च्या हलवून टाकू’, संजय राऊतांचा अप्रत्यक्षपणे सतेज पाटलांवर निशाणा
'आता पडद्यामागचं सगळं बंद करा. आता शिवसेनेला डावलून काही ठरवाल तर तुमच्या खुर्च्या हलवून टाकल्याशिवाय राहणार नाही. नाहीतर तुमच्याशिवाय काय करायचं याची गुरुकिल्ली आमच्याकडे आहे', असा इशाराच संजय राऊत यांनी दिलाय.
कोल्हापूर : राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेनेनं कोल्हापुरातील शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार (Sanjay Pawar) यांना उमेदवारी दिली. त्यानंतर संभाजीराजे छत्रपतींचा (Sambhajiraje Chhatrapati) मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवरील आरोप आणि शनिवारी श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनी घेतलेली भूमिका, या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांची कोल्हापुरात जाहीर सभा पार पडलीय. त्यावेळी आता लक्ष्य कोल्हापूर महापालिका असल्याचं संजय राऊत यांनी जाहीर केलंय. यावेळी संजय राऊत यांनी अप्रत्यक्षपणे काँग्रेस नेते सतेज पाटील यांच्यावर निशाणा साधला. ‘आता पडद्यामागचं सगळं बंद करा. आता शिवसेनेला डावलून काही ठरवाल तर तुमच्या खुर्च्या हलवून टाकल्याशिवाय राहणार नाही. नाहीतर तुमच्याशिवाय काय करायचं याची गुरुकिल्ली आमच्याकडे आहे’, असा इशाराच संजय राऊत यांनी दिलाय.
संजय राऊत म्हणाले की, ‘कोल्हापुरात सहा आमदार होते, आता पाच का आले? ते आघाडी बिघाडी नंतर बघू काय करायचं ते. आता 3 खासदार आहेत. पुढे सहा आमदार आले पाहिजेत. त्या आधी कोल्हापूर महापालिका. तुमची चंपाबाई आता कोल्हापुरात येत नाही असं कळालं मला. आता कोल्हापूरचा महापौर शिवसेनेच्या मदतीशिवाय होणार नाही, इतका आकडा आपला पाहिजे. आता पडद्यामागचं सगळं बंद करा. आता शिवसेनेला डावलून काही ठरवाल तर तुमच्या खुर्च्या हलवून टाकल्याशिवाय राहणार नाही. नाहीतर तुमच्याशिवाय काय करायचं याची गुरुकिल्ली आमच्याकडे आहे. इतकं मोठं शहर, बाळासाहेबांवर प्रेम करणारं शहर.. लाखोच्या सभा बाळासाहेबांनी इथं केल्या. त्या बाळासाहेबांची शिवसेना आहे हे लक्षात ठेवा.
‘शाहू महाराज यांनी देवेंद्र फडणवीसांचा मुखवटा उतरवला’
संजय राऊत यांनी संभाजीराजेंच्या राज्यसभेच्या मुद्द्यावरुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपवर जोरदार हल्ला चढवला. शिवसेना कशी आहे, उद्धव ठाकरे कसे आहेत, तर वेळ आली की एका सामान्य शिवसैनिकाला अलगद उचलून राज्यसभेत ठेवला. जागा कोणतीही असेल मग ती आता गाजत असलेली सहावी जागा असेल. मी कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराजांचे आभार मानतो. त्यांनी संभ्रम दूर केला. शाहू महाराज यांनी देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या लोकांचा मुखवटा उतरवला. कोल्हापुरात आजही सत्य आणि प्रामाणिकपणा आहे हे छत्रपती शाहू महाराजांनी पुन्हा दाखवून दिलं. शिवसेनेनं छत्रपती घराण्याचा कधीही अपमान केला नाही, शिवसेनेनं छत्रपती घराण्याचा मान राखला. छत्रपती शाहू महाराजांचे हे वक्तव्य म्हणजे अंबाबाईचा प्रसाद आहे. भाजपवाल्यांनो आता तरी शांत व्हा आणि गप्प बसा, असा टोलाही राऊत यांनी लगावलाय.
फडणवीस कालपर्यंत म्हणत होते संभाजीराजेंची शिवसेनेनं कोंडी केली. आता त्यांची कोंडी झाली. सहावी जागा शिवसेनेची आहे. आम्ही त्यांना सन्मानाने बोलावलं आणि शिवसेनेचे उमेदवार व्हा म्हटलंय. पण भाजपनं संभाजीराजेंचा वापर केला. समाजात द्वेष पसरवण्याचं काम केलं. पण आज शाहू महारांनी त्यांचा बुरखा फाडला, असा हल्लाबोलही राऊत यांनी केलाय.
‘शिवसेनेचा मुख्यमंत्री बघितला की यांच्या पोटात दुखतं’
आमचे मंत्री अनिल परब यांच्या घरी काल ईडी गेली. कारण काय तर दापोलीतील जे रिसॉर्ट आहे त्याचं सांडपाणी दापोलीच्या समुद्रात जातं म्हणे. पण ते रिसॉर्ट अजून सुरुच झालेलं नाही. तुम्ही आर्थिक गुन्हे शोधणारी माणसं सांडपाण्यावर कुठे जाता. महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात राज्य सुरु आहे ते राज्य विस्कळीत करायचं, ते चालू द्यायचं नाही. शिवसेनेचा मुख्यमंत्री बघितला की यांच्या पोटात दुखायला लागतं. पण त्या सगळ्यांना पुरुन शिवसेना महाराष्ट्रात उभी आहे आणि उभी राहणार, असा दावा राऊत यांनी यावेळी केला.
‘भाजप देशात सर्वात भ्रष्ट पक्ष’
भाजपवर निशाणा साधताना राऊत म्हणाले की, देशात सगळ्यात भ्रष्ट पक्ष भाजप आहे. भाजपच्या तिजोरीत किती पैसे आहेत माहिती आहे का? साडे पाच हजार कोटी रुपये त्यांच्या तिजोरीत आहेत. ते पैसे आले कुठून. काँग्रेससारख्या जुन्या पक्षाकडे पाचशे सहाशे कोटी असतील. भाजपकडे इतका पैसा आला कुठून? तुम्हाला व्यापारी, उद्योगपती दोन नंबरचे कामं करण्यासाठी पैसे देतात.
किरीट सोमय्यांना थेट इशारा
किरीट सोमय्या लवकरच जेलमध्ये जाईल. कुणीही सुटणार नाही. विक्रांतचा घोटाळा त्यांनी केला. जिच्या जिवावर आपण पाकिस्तानविरोधातील युद्ध जिंकलो तिच्या नावाने भ्रष्टाचार केला. ते महाशय म्हणाले सरकारकडे पैसे नसतील तर मी तिनशे कोटी गोळा करतो. पैसे गोळा केले, कोट्यवधी रुपये गोळा केले. मग माझ्या लक्षात आलं की पैसे गेले कुठे? मी राज्यपालांना पत्र लिहिलं. राज्यपालही त्यांचाच कार्यकर्ता. त्यांना समजलं नाही त्यांनी सांगितलं की राजभवनाकडे असे कुठलेही पैसे आले नाहीत. त्याने माझ्यावर 300 कोटीचा दावा ठोकलाय. अरे हजारचा टाक, तुला तुरुंगात टाकल्याशिवाय राहणार नाही, असा थेट इशारा राऊत यांनी पुन्हा एकदा सोमय्यांना दिलाय.