संजय राऊत यांच्यावर हल्ल्याचं भाकित, हा केवळ प्रसिद्धीचा स्टंट, भाजप नेत्याची सणकून टीका
सनसनाटी वक्तव्य करून आपल्याकडे लक्ष वेधण्याचे संजय राऊत यांचे हे केविलवाणे प्रयत्न असल्याची प्रतिक्रिया भाजप नेत्याने दिली आहे.
मुंबईः बेळगावमध्ये (Belgaum) माझ्यावर हल्ला करून मला अटक करण्याचा भाजपाचा डाव आहे, असा गंभीर आरोप संजय राऊतांनी (Sanjay Raut) केलाय. मात्र स्वतःवर हल्ला होण्याचं भाकित करणाऱ्या संजय राऊत यांचा का केवळ प्रसिद्धीसाठीचा स्टंट असल्याची टीका भाजप नेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी केली आहे. टीव्ही 9 शी फोनवर बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.
येत्या 1 डिसेंबर रोजी संजय राऊत यांना बेळगाव कोर्टात हजर रहावं लागणार आहे. ३० मार्च २०१८ रोजी प्रक्षोभक भाषण केल्याचा ठपका त्यांच्यावर आहे. या प्रकरणी राऊत यांना समन्स बजावण्यात आलं आहे. मात्र कोर्टात जाताना माझ्यावर हल्ला करण्याचा कट असल्याची भीती संजय राऊत यांनी व्यक्त केली आहे.
प्रवीण दरेकर म्हणाले, संजय राऊतांना जळी स्थळी काष्ठी भाजपाच दिसते. त्यांना बेळगाव कोर्टात बोलावलं हे न्यायालयीन व्यवस्थेचा भाग आहे. शिवसेना नेते वैफल्यग्रस्त असल्याने भाजपला बदनाम करण्याची वक्तव्ये करत आहेत, असं दरेकर म्हणाले.
कोर्टाने बोलावल्यानंतर कर्नाटकात संजय राऊत गेले आणि आले काय… त्यांच्याकडे कुणीही लक्ष देणार नाही. मात्र त्यांना सातत्याने प्रसिद्धीची सवय लागली आहे. साधेपणाने गेल्यावर प्रसिद्धी मिळणार नाही. त्यामुळे काहीतरी सनसनाटी वक्तव्य करून आपल्याकडे लक्ष वेधण्याचे संजय राऊत यांचे हे केविलवाणे प्रयत्न असल्याचं वक्तव्य प्रवीण दरेकर यांनी केलंय.
त्यामुळे बेळगाव कोर्टाने जारी केलेल्या समन्सला संजय राऊत उपस्थित राहतील का नाही, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
संजय राऊत काय म्हणाले?
सोमवारीच संजय राऊत यांनी बेळगाव कोर्टाच्या समन्सवर प्रतिक्रिया दिली. बेळगावमध्ये 2018 मध्ये केलेल्या वक्तव्यावरून आता समन्स पाठवण्यात आलंय. मला कर्नाटकात बोलावून माझ्यावर हल्ला करण्याचा, मला अटक करण्याचा कट असल्याचा गौप्यस्फोट संजय राऊत यांनी केलाय.