‘ठाकरे’ ब्रॅण्डचा जोर हवा, राज ठाकरेंनाही फटका बसेल, संजय राऊतांची ‘रोखठोक’ भूमिका
ज्या दिवशी 'ठाकरे' ब्रॅण्डचे पतन होईल त्या दिवसापासून मुंबईचे पतन व्हायला सुरुवात होईल, अशी चिंता संजय राऊत यांनी व्यक्त केली आहे.
मुंबई : मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी करणारी अभिनेत्री कंगना रनौत आणि शिवसेनेत निर्माण झालेला वाद सुरुच आहे. या वादात मनसेने भूमिका न घेतल्यामुळे शिवसेनेचे मुखपत्र ‘सामना’तील ‘रोखठोक’ सदरातून खासदार संजय राऊत यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भविष्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. (Sanjay Raut on Thackeray Brand and concern about Raj Thackeray)
”ठाकरे’ हा महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा एक ब्रॅण्ड आहे. दुसरा महत्त्वाचा ‘ब्रॅण्ड’ पवार नावाने चालतो आहे. मुंबईतून या ब्रॅण्डनाच नष्ट करायचे व त्यानंतर मुंबईवर ताबा मिळवायचा हे कारस्थान पुन्हा उघडे पडले आहे. राज ठाकरे हेसुद्धा त्याच ‘ब्रॅण्ड’चे एक घटक आहेत व या सगळ्याचा फटका भविष्यात त्यांनाही बसणार आहे. शिवसेनेबरोबर त्यांचे मतभेद असू शकतात, पण शेवटी महाराष्ट्रात ‘ठाकरे’ ब्रॅण्डचा जोर असायला हवा. ज्या दिवशी ‘ठाकरे’ ब्रॅण्डचे पतन होईल त्या दिवसापासून मुंबईचे पतन व्हायला सुरुवात होईल’ अशी चिंता संजय राऊत यांनी व्यक्त केली आहे.
‘मुंबईला पाकिस्तान व महापालिकेस बाबराची सेना असे बोलणाऱ्यांच्या मागे महाराष्ट्रातील प्रमुख विरोधी पक्ष उभा राहतो हे विचित्र आहे. पण सुशांत आणि कंगनास पाठिंबा देऊन त्यांना बिहारच्या निवडणुका जिंकायच्या आहेत. बिहारातील उच्चवर्णीय राजपूत, क्षत्रिय मते मिळवण्यासाठी हा खटाटोप आहे. त्यासाठी महाराष्ट्राचा अवमान झाला तरी चालेल. हे धोरण ‘राष्ट्रीय’ म्हणवून घेणाऱ्यांना शोभणारे नाही. महाराष्ट्राचा अवमान केला म्हणून दिल्लीतील एकही मराठी केंद्रीय मंत्र्यास वाईट वाटले नाही तेथे संतापून राजीनामा वगैरे देण्याची बातच सोडा’ असा टोला संजय राऊत यांनी भाजपला लगावला.
पहा व्हिडीओ :
(Sanjay Raut on Thackeray Brand and concern about Raj Thackeray)
‘एक नटी मुंबईत बसून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांविरुद्ध एकेरी भाषेत बोलते. आव्हानाची भाषा करते व त्यावर महाराष्ट्राच्या जनतेने काहीच प्रतिक्रिया द्यायची नाही हे कसले एकतर्फी स्वातंत्र्य? तिच्या बेकायदेशीर बांधकामावर हातोडा पडला तेव्हा हे तर माझे राम मंदिरच होते, असा कांगावा तिने केला. पण हे बेकायदेशीर बांधकाम तिने कायद्याचे उल्लंघन करून ती सांगत असलेल्या ‘पाकिस्ताना’त बांधले. मुंबईला पाकिस्तान बोलायचे व या ‘पाकिस्ताना’तल्या बेकायदेशीर कामांवर सर्जिकल स्ट्राईक केला की छाती पिटायची, हा कसला खेळ? संपूर्ण नव्हे, निदान अर्ध्या हिंदी सिनेसृष्टीने तरी मुंबईच्या अवमानासंदर्भात व्यक्त व्हायलाच हवे होते. कंगनाचे मत हे संपूर्ण सिनेसृष्टीचे मत नाही, असे सांगायला हवे होते. निदान अक्षय कुमार वगैरे मोठ्या कलावंतांनी तरी समोर यायला हवे होते. मुंबईने त्यांनाही दिलेच आहे. मुंबईने प्रत्येकाला दिले आहे. मुंबईचा अवमान होत असताना ते सगळेच खाली मान घालून बसतात’ अशा शब्दात संजय राऊतांनी अक्षय कुमारलाही कानपिचक्या लगावल्या.
VIDEO: Saamana Editorial | ‘मुंबईचे महत्व कमी करण्याचा प्रयत्न’, सामनातून भाजप-कंगनावर हल्लाबोलhttps://t.co/3m5cQMTPOU#Saamana #Mumbai
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 13, 2020
(Sanjay Raut on Thackeray Brand and concern about Raj Thackeray)