काँग्रेससोबत निश्चित मतभेद, जयराम रमेश यांचा मला फोन, संजय राऊत यांची कबूली, महाविकास आघाडीचं काय?
सावरकरांबद्दल राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्यावरून भाजप जे आंदोलन करतंय, ते ढोंग असल्याची टीका राऊत यांनी केली.
मुंबईः आम्ही सावरकर भक्त आहोत. सावरकरांचा (Savarkar) अपमान किंवा त्यासंबंधी टिप्पणी आम्हाला मान्य नाही, अशी आमची भूमिका आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी कालही हे स्पष्ट केलं. आजही आम्ही तेच सांगतोय. त्यामुळे काँग्रेससोबत निश्चितच आमचे काही गोष्टींवर मतभेद आहेत, अशी कबूली संजय राऊत (Sanjay Raut) यांनी माध्यमांसमोर दिली. याविषयी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांच्याशी चर्चाही झाल्याचं राऊत यांनी माध्यमांना सांगितलं.
हिंदुत्ववादी पक्ष असूनही शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत गेली आणि त्यातून महाविकास आघाडीची स्थापना झाली. यावरून शिवसेनेवर भाजप तसेच इतर हिंदुत्ववादी संघटनांनी वारंवार चिखलफेक केली आहे. आता तर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी वीर सावरकरांबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याने महाराष्ट्रात त्याचे तीव्र पडसाद उमटत आहेत.
महाराष्ट्रात सावरकरांचा एवढा अपमान होत असताना शिवसेना काय भूमिका घेते, महाविकास आघाडीच्या भवितव्यावर याचा परिणाम होतो का, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय. कारण आगामी विधानसभा, लोकसभा तसेच त्या आधी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेची भूमिका काय, हे जनतेसमोर स्पष्ट होणे आवश्यक आहे. त्यामुळेच उद्धव ठाकरे यांनी काल पत्रकार परिषद घेत आम्ही राहुल गांधी यांच्या वक्तव्याशी समहत नाहीत, असं सांगितलं. पण भाजपचं सावरकर प्रेमही ढोंगी असल्याचा हल्लाबोल त्यांनी केला.
पाहा संजय राऊत काय म्हणाले?
सावरकरांबाबत वक्तव्यावरून काँग्रेसशी सहमत नसल्याची भूमिका असल्याने शिवसेनेच्या वतीने संजय राऊत यांनी काँग्रेस नेते जयराम रमेश यांच्याशी चर्चा केली. ते म्हणाले, काँग्रेससोबत काही बाबातीत निश्चितच मतभेद आहेत. यासंबंधी भारत जोडो यात्रेत सहभागी असलेल्या जयराम रमेश यांनी मला फोन केला. आमच्यात जी चर्चा झाली, त्याची सविस्तर माहिती पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिल्याचं संजय राऊत यांनी सांगितलं.
यासोबतच सावरकरांबद्दल राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्यावरून भाजप जे आंदोलन करतंय, ते ढोंग असल्याची टीका राऊत यांनी केली. सावरकर हे कधीही संघ परिवाराचे आदर्श नव्हते. गोळवलकर गुरुजींनीही सावरकरांच्या भूमिकांवर नेहमी टीका केली आहे. पण राजकीय फायदे-तोटे पाहून हे आंदोलन सुरु आहे, असा आरोप राऊत यांनी केला.
त्यांना सावरकरांचा अभिमान असता तर सरदार पटेल, सुभाष चंद्र बोस यांच्याप्रमाणे वीर सावरकरांचाही उंच पुतळा बनवला असता. वीर सावरकरांना भारत रत्न पुरस्कार मिळाला पाहिजे, अशी आमची अनेक दिवसांपासूनची मागणी असल्याचं संजय राऊत म्हणाले.