आमच्या खांद्यावर बसवून भाजप वाढली, त्याच खांद्यावरून तिरडी… कसबा निकालांवरून संजय राऊत यांनी ठणकावलं…
'राज्यात ज्या पद्धतीचं वातावरण आहे. इथे फक्त शिवसेना राहणार बाकी सगळ्यांवर सर्जिकल स्ट्राइक जनताच करणार आहे. ही जनतेची प्रतिक्रिया आहे, असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलंय.
भूषण पाटील, कोल्हापूर : शिवसेनेच्या खांद्यावर बसून भाजप महाराष्ट्रात मोठी झाली. वाढली. पण आता याच खांद्यावरून त्यांची तिरडी निघणार. महाराष्ट्रातून भाजप हद्दपार होणार असा इशारा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिला आहे. कोल्हापुरात शिवगर्जना अभियानात ते बोलत होते. पुण्यातील कसबा पेठ पोट निवडणुकीत भाजपच्या उमेदावाराचा दारुण पराभव झाला. महाविकास आघाडीतर्फे येथे काँग्रेसचे रवींद्र धंगेकर निवडणुकीत उभे होते. धंगेकर यांच्या विजयाचा उल्लेख संजय राऊत यांनी शिवसैनिकांसमोर भाषणात केला. तसेच भाजप आणि शिंदे गटावर जोरदार टीका केली. महाराष्ट्रात वणवा पेटलाय. पण कसब्यात टरबूज फुटल्याचं ऐकतोय, अशा शब्दात राऊत यांनी खोचक टीका केली.
सगळ्यांवर सर्जिकल स्ट्राइक…
संजय राऊत यांनी शिवसैनिकांमध्ये उत्साह भरण्यासाठी दिमाखदार भाषण केलं. ते म्हणाले, ‘राज्यात ज्या पद्धतीचं वातावरण आहे. इथे फक्त शिवसेना राहणार बाकी सगळ्यांवर सर्जिकल स्ट्राइक जनताच करणार आहे. ही जनतेची प्रतिक्रिया आहे. कसब्यातील सगळ्या पेठा कोसळल्या. मिंधेसुद्धा त्यांना वाचवू शकले नाहीत. आमच्या खांद्यावर बसवून आम्ही भाजप वाढवले आहे. याच खांद्यावरून तुमची तिरडी नेल्या शिवाय राहणार नाही. शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसणं म्हणजे महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसण्यासारखं आहे. रंगा बिल्लाला शिवसेना संपवता येणार नाही. आमची शिवसेना म्हणता. ती तुमच्या बापाची आहे का, असा सवाल संजय राऊत यांनी केला.
‘तुमच्या छाताडावरचं पहिलं पाऊल…’
शिवसेना संपवण्यासाठी तुम्हाला शंभर जन्म घ्यावे लागतील ते पुरणार नाहीत. आजचा कसब्याचा निकाल म्हणजे तुमच्या छाताडावरचा पहिलं पाऊल आहे. एकनाथ शिंदेंचासुद्धा पराभव होईल. ठाण्याची महानगरपालिका निवडणूक जिंकून दाखवा, ठाणे कोणाच्या बापाची मक्तेदारी नाही. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार आणि देशाचा पंतप्रधान कोण होणार हे 2024 ला कळेल, असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलंय.
आमचे काळीज वाघाचे, उंदराचे नाही..
भाजपला इशारा देताना संजय राऊत म्हणाले, ‘बाळासाहेबांनी आमचे काळीज वाघाचे बनवले उंदराचे नाही. उंदीर होते ते पळून गेले. नारायण राणेचं टील्लू पोरगं मला धमकी देत होतं काल विधानसभेत. अरे सरकार तुझं आहे सुरक्षा काढून घे ना.. शिवसैनिक घरी गेले तेव्हा कोकणात घरात स्वतःला कोंडून घेतलं, अशी टीका संजय राऊत यांनी केली.