हक्कभंग समिती संजय राऊत यांच्यावर कारवाई करणार?; संजय शिरसाट म्हणतात,…
संजय राऊत यांनी त्यांचं काय म्हणण आहे ते मांडलं आहे. ही समिती आपल्या पद्धतीने कारवाई करेल. कोणावरही अन्याय होणार नाही.
मुंबई : शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट म्हणाले, हक्कभंग समिती स्थापन झाली आहे. आता या समितीसमोर अनेक विषय येतील. त्यापैकी एक संजय राऊत हा एक विषय असू शकतो. आज या समितीत एकमेकांची ओळख होणे. कामकाज समजून घेणे, कामकाज सांगणे असा विषय राहील. हक्कभंग समितीसमोर अनेक पेंडिग विषय आहेत. त्यांच्यावर चर्चा केली होती. त्यामुळे पुन्हा ९ तारखेला बैठक आयोजित केली आहे. समितीच्या या बैठकीत जे विषय पेंडिंग आहेत, त्यांच्यावर चर्चा होईल. त्यानंतर हेरींगचा प्रकार सुरू होईल, असं संजय शिरसाट यांनी सांगितलं.
कायदेशीर विषय तपासणार
संजय राऊत यांनी त्यांचं काय म्हणण आहे ते मांडलं आहे. ही समिती आपल्या पद्धतीने कारवाई करेल. कोणावरही अन्याय होणार नाही. पण, हक्कभंग केला असेल, तर योग्य ती कारवाई समिती करेल. ते खासदार असल्यामुळे संसदेची संमती घ्यावी लागेल का, हा कायदेशीर विषयही तपासावा लागेल. कायदेतज्ज्ञांचं मत मागून योग्य असेल तरी कारवाई केली जाणार असल्याचंही संजय शिरसाट यांनी म्हंटलं.
फक्त वैचारिक मतभेद
हक्कभंग समिती ही कुणावरही सरळ कारवाई करत नाही. आधी नोटीस दिला जातो. समोरच्यानं उत्तरं द्यावं लागते. त्यानंतर उत्तर समाधानकारक नसेल तर समोरच्याला पुन्हा सुनावणीसाठी बोलावलं जातं. तोंडी चर्चा करून प्रश्न विचारले जातात. त्यानंतर समिती निर्णय घेत असते, असंही संजय शिरसाट यांनी सांगितलं. संजय शिरसाट म्हणाले, आमची दुष्मणी कोणाशीही नाही. फक्त वैचारिक मतभेद आहेत. त्यामुळे सर्वांशी भेटीगाठी घ्याव्या लागतात. आम्ही काही एकमेकांचे दुष्मण नाहीत. फक्त वैचारिक मतभेद असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
समिती योग्य ती कारवाई करेल
एवढ्यात अंबादास दानवे तिथं आले. संजय शिरसाट आणि अंबादास दानवे हे दोन्ही छत्रपती संभाजीनगरचे नेते आहेत. यावर बोलताना अंबादास दानवे म्हणाले, हक्कभंग समिती नियमानुसार योग्य ती कारवाई करेल. योग्य ती कारवाई हक्कभंग समिती करेल. काही फासावर लटकवणार नाही.