‘शशिकांत वारिशे यांचा अपघात नव्हे हत्याच, दिवसाढवळ्या खून पडतायत, हे धक्कादायक’ संजय राऊत यांचं गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र
वारिशे यांच्या हत्येचे प्रकरण कोकणातील इतर खुनांप्रमाणे दडपले जाईल अशी भीती असल्याने या खुनाची समांतर न्यायालयीन चौकशी करावी, अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे.
दिनेश दुखंडे, मुंबईः कोकणातील नाणार रिफायनरीविरुद्ध (Nanar refinary) लोकांमध्ये जागृती करणाऱ्या पत्रकाराची दिवसाढवळ्या हत्या होते. हे भयंकर आहे. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) हे गृहविभागाचे नेतृत्व करीत असताना राज्यात खून पडावेत व संबंधित गुन्हेदारांना राजाश्रय मिळावा, हे भीषण असल्याची टीका शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केली आहे. राजापूर येथील तरुण पत्रकार शशिकांत वारिशे यांचा अपघात नव्हे तर ती हत्याच आहे. महाराष्ट्राच्या पुरोगामी प्रतिमेस कलंक लावणारी घटना आहे, अशा शब्दात संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला आहे. राऊत यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना यावरून इशारा देणारे पत्र लिहिले आहे. तसेच लवकरच मी आणि शिवसेनेतील सहकारी रत्नागिरी, राजापूर येथे जाणार आहोत, अशी माहितीही दिली.
७ फेब्रुवारी रोजी अपघाती मृत्यू
रत्नागिरी जिल्ह्यात एका वृत्तपत्राचे पत्रकार शशिकांत वारिशे यांचा ७ फेब्रुवारी रोजी अपघाती मृत्यू झाला. ६ फेब्रुवारी रोजी हा अपघात झाला. यात ते गंभीर जखमी झाले होते. रुग्णालयात उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यू झाला. 48 वर्षीय शशिकांत वारिशे हे कोकणातील नाणार रिफायनरीविरोधात सातत्याने बातम्या लिहित होते, म्हणून त्याची हत्या करण्यात आली असा आरोप केला जातोय. याविरोधात अनेक निदर्शनेही करण्यात येत आहेत.
पत्रातील मुद्दे काय?
संजय राऊत यांनी लिहिलेल्या पत्रातील मुद्दे असे-
- 4 फेब्रुवारीला आंगणेवाडी जत्रेतील भाजपच्या सभेत नाणार रिफायनरी होणार हे आपण ठासून सांगितल्यानंतर दुसऱ्या दिवशी शशिकांत वारिशे यांची हत्या झाली.हा फक्त योगायोग समजावा काय ?
- आंगणेवाडीतील आपल्या भाषणाने रिफायनरी समर्थकांतील गुंड प्रवृत्तींना हिरवा झेंडाच मिळाला व वारिशे यांची हत्या झाली, असे आपणास वाटत नाही काय ?
- दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर, लोकमान्य टिळक, यांसारखे ज्वलंत-निर्भीड पत्रकार ज्या कोकणाच्या भूमीत जन्मास आले त्याच भूमीत एका पत्रकाराची हत्या होणे धक्कादायक आहे.
न्यायालयीन चौकशीची मागणी
- वारिशे यांच्या हत्येचे प्रकरण कोकणातील इतर खुनांप्रमाणे दडपले जाईल अशी भीती असल्याने या खुनाची समांतर न्यायालयीन चौकशी करावी. तसंच वारिशे यांच्या कुटुंबाला 50 लाखांचे अर्थसहाय्य सरकारने करावे.
- मी स्वतः तसंच शिवसेनेतील माझे प्रमुख सहकारी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार या प्रकरणाची अधिक माहिती घेण्यासाठी लवकरच रत्नागिरी-राजापूर येथे जात आहोत, याची कृपया नोंद घ्यावी.. असे संजय राऊत यांनी या पत्रातून सूचित केले आहे.