सामनाच्या अग्रलेखात ना ईडी ना भाजपा तर चक्क कॉंग्रेस, वाचा सविस्तर बातमी
UPA चं नेतृत्व शरद पवार यांच्याकडे देण्याची मागणी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली आहे. त्यावर काँग्रेस नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर राऊतांनी सामनाच्या अग्रलेखातून काँग्रेसला सल्ला देऊ केलाय.
मुंबई: संयुक्त पुरोगामी आघाडी अर्थात UPA चं नेतृत्व शरद पवार यांच्याकडे देण्याची मागणी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली आहे. त्यावरुन काँग्रेस चांगलीच आक्रमक झाली आहे. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण आणि नसीम खान यांनी संजय राऊतांवर जोरदार टीका करत, काँग्रेसच्या अंतर्गत गोष्टींमध्ये न पडण्याचा सल्ला दिला आहे. त्यानंतर संजय राऊत यांनी सामनाच्या अग्रलेखातून काँग्रेसला शुभेच्छा दिल्या आहेत. (Sanjay Raut advice to Congress in Saamana editorial)
“स्वातंत्र्य लढ्यात, स्वातंत्र्यानंतर देश घडविण्यात काँग्रेसचे योगदान मोठे आहे. काँग्रेसला दलित, मुसलमान, ओबीसींचा भक्कम पाठिंबा होता. काँग्रेस हा एक विचार होता व काँग्रेससाठी लोक लाठ्या खायलाही तयार होते. आज काँग्रेसची हक्काची मतपेटी पूर्वीसारखी राहिलेली नाही. राज्यातील प्रादेशिक पक्षांनीही स्वत:चे एक स्थान निर्माण केले आहे. याचा अर्थ असा की, काँग्रेसचा परंपरागत मतदार इकडेतिकडे गेला आहे. यावर तोड काँग्रेसलाच काढावी लागेल. या विषयात इतरांनी पडू नये, असे काँग्रेस नेतृत्वास वाटते. काँग्रेस हा मोठा पक्ष आहे व आघाडीचे नेतृत्व मोठा पक्षच करतो, असेदेखील त्यांचे नेते म्हणतात. आम्चेही त्याबाबत वेगळे मत नाही. मोठ्या पक्षाच्या वाटचालीस आमच्या शुभेच्छा!” अशा शब्दात संजय राऊत यांनी काँग्रेस नेतृत्वावर खोचक टीका केली आहे.
यूपीएसमोर नेमका प्रश्न काय?
“UPA अधिक मजबूत होणे ही काळाची गरज आहे, पण ते व्हायचे कसे? विरोधकांच्या ऐक्यावर सध्या राष्ट्रीय मंथन सुरु झाले आहे. UPA चे नेतृत्व कुणी करावे, हा वादाचा मुद्दा नाही. UPA भक्कम करावी व भाजपसमोर आव्हान उभे करावे, हा मुद्दा आहे. काँग्रेस पक्ष हे सर्व घडवून आणण्यास समर्थ असेल तर त्यांचं स्वागत आहे. आघाडीतील आघाडीतील सर्वात मोठ्या पक्षाकडेच आघाडीचे नेतृत्व असते, असे काँग्रेस नेते हरीश रावत म्हणतात. ते योग्य तेच बोलले आहेत, मात्र त्या पक्षाने जमिनीवर चालू नये. मोठी झेप घ्यावी”, अशी अपेक्षा संजय राऊत यांनी व्यक्त केली आहे.
काँग्रेसमधील मित्रांना ठसका का लागावा?
काँग्रेसच्या खालोखाल तृणमूल, अण्णा द्रमुक असे पक्ष संसदेत आहेत व हे सर्व भाजप विरोधक आहेत, देशातील विरोधी पक्षात पोकळी निर्माण झाली आहे व विखुरलेला विरोधी पक्ष एका झेंड्याखाली एकत्र यावा, अशी अपेक्षा ठेवली तर काँग्रेसमधील मित्रांना ठसका का लागावा?, असा प्रश्न संजय राऊत यांनी विचारला आहे. त्याचबरोबर
“नितीशकुमारांचे सरकार असंतोषाच्या ज्वालामुखीत”
“बिहारमधील नितीश कुमारांचे सरकार असंतोषाच्या ज्वालामुखीत रटरटत आहे. जदयुचे अरुणाचलातील 6 आमदार भाजपने फोडलेच, पण आता अशीही बातमी आहे की, बिहारमधील जदयुलाच सुरुंग लावून भाजप स्वबळावर मुख्यमंत्री बसविण्याच्या तयारीत आहे. बिहारात काँग्रेस, राजदसारख्या पक्षांचे आमदार ते फोडणार आहेत म्हणे. ते राहू द्या बाजूला, पण ज्या नितीश कुमारांना मांडीवर घेऊन ते राजशकट हाकीत आहेत, त्या नितीश कुमारांच्या पक्षालाच भोके पाडण्याचे काम सुरु आहे. यावर नितीश कुमार अस्वस्थ आहेत व त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. नितीश कुमारांनी जदयुचे राष्ट्रीय अध्यक्षपद सोडले आहे. या सगळ्या घडामोडी देशातील विरोधी पक्षाने गांभीर्याने घ्यायला हव्यात”, असा सल्लाही संजय राऊत यांनी सामना अग्रलेखातून सर्व विरोधकांना दिला आहे.
संबंधित बातम्या:
तुम्ही चार द्या, पण दोन घ्यायची तयारी ठेवायलाच हवी – राऊत
23 लाखाचे दागिने, पालघर, अलिबागमध्ये जमिनी, PNB मध्ये 5 खाती, वर्षा राऊतांची प्रॉपर्टी किती?
Sanjay Raut advice to Congress in Saamana editorial