हमरी-तुमरी, वादविवाद मिटले, सोलापुरातील अतिसंवेदनशील ग्रामपंचायतीने करुन दाखवलं
Solapur Gram Panchayat : गावातील स्थानिक नेत्यांनी एकत्र येऊन बिनविरोध ग्रामपंचायत करण्याचा निर्धार केला. त्यानुसार निर्णयही घेतला.
सोलापूर : गाव आणि गावाच्या नाना तऱ्हा. त्यात सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील माढा (Madha) तालुक्यातील सापटणे (भोसे ) (Sapatane Bhose) गाव कसे मागे राहणार? अतिसंवेदनशील गाव म्हणून गावची ओळख. मात्र याच गावातल्या लोकांनी यंदा इतिहास घडवत गावची ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध घडवून आणली आहे. सापटणे (भोसे ) गावात निवडणूक लागली की इथे हाणामाऱ्या वाद, हमरी तुमरी झालीच नाही असे कधी घडलेच नाही. मात्र गावातील स्थानिक नेत्यांनी एकत्र येऊन बिनविरोध ग्रामपंचायत करण्याचा निर्धार केला. त्यानुसार यास उपस्थित ग्रामस्थांनी देखील प्रतिसाद दिला. नेते मंडळी अन् ग्रामस्थांनी सामोपचाराने समन्वय साधला गेल्याने गाव बिनविरोध झालं आहे. (Sapatane Bhose Gram Panchayat unopposed)
आमदार शिंदे बंधूंच्या समर्थकांची बैठक
सापटणे (भोसे ) गावात दर निवडणुकीत आमदार बबनराव शिंदे,आमदार संजय शिंदे या राष्ट्रवादीच्या आमदार बंधूंचे समर्थक असलेल्या हनुमंत गिड्डे,संग्राम गिड्डे या दोघा चुलत बंधूमध्ये राजकीय युध्द होत असायचं. दोन्ही नेत्यांनी आपआपल्या गटातील कार्यकर्त्यांची बैठक घेऊन निवडणूक बिनविरोधचा विचार मांडला. त्यास कार्यकर्त्यांनी देखील होकार दर्शवला.
ग्रामस्थांनी तर मोठ्या उत्साहाने या निर्णयाला प्रतिसाद दिला. माढा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अमुल कादबाने यांनी देखील गावात जाऊन नेते मंडळी, ग्रामस्थांचे बिनविरोध निवडणुकीसंदर्भात प्रबोधन केले होते. या सर्वाचे अखेर फलित झाले. जवळपास अडीच हजार लोकसंख्या आणि 1850 मतदार असलेल्या या गावात लाखो रुपंयाचा चुराडा होऊन निवडणुक पार पडत असायची.
यातून शाब्दिक बाचाबाची,राजकीय वितुष्ट निर्माण होत असायची. यंदा मात्र या गोष्टीला फाटा बसणार असुन गावात शांतता आणि सुव्यवस्था राखली जाईल. ग्रामपंचायत निवडणुकीत काँटे की टक्कर होणाऱ्या या गावात यंदा निवडणूक होणार नसल्याने ग्रामस्थदेखील आनंदून गेले आहेत.
बिनविरोध निवडणुकीचं सेलिब्रेशन
निवडणूक बिनविरोध झाल्याचा आनंद तहसील कार्यालयाच्या बाहेर नेते मंडळी, उमेदवार आणि ग्रामस्थांनी पेढे वाटून साजरा केला. सापटणेकरांनी तालुक्यातील इतर गावापुढे निवडणूक बिनविरोध करुन आदर्श निर्माण केला आहे. तालुक्यातील अतिसंवेदनशील लक्षवेधी आणि तितकीच महत्वाची असलेली ग्रामपंचायत म्हणून सापटणे ग्रामपंचायतची ओळख होती. मात्र ग्रामपंचायत निवडणुकीमुळे बदनाम झालेले सापटणे (भोसे ) गावची ओळख ग्रामस्थांनी योग्य निर्णय घेऊन पुसून टाकला आहे.
(Sapatane Bhose Gram Panchayat unopposed)
संबंधित बातम्या
महिला प्रवर्गात तृतीयपंथीचा अर्ज, निवडणूक अधिकाऱ्यासमोर प्रश्न, छाननीत अर्जावर मोठा निर्णय
कोल्हापूर महापालिका निवडणूक भाजप ताकदीनिशी लढणार; चंद्रकांत पाटलांची घोषणा