माझ्या मनात दोन गोष्टींचं दुःख…; विजयी सत्यजित तांबे यांना अजूनही काँग्रेसकडून आशा?
संजय राऊत आणि अजित पवार यांनी सत्यजित तांबे यांना सल्ला दिला आहे. तुम्ही काँग्रेसमध्ये होतात आणि काँग्रेसमध्येच रहा, असं म्हटलंय.
मनोज गाडेकर, संगमनेरः निवडणुकीत विजयी झालो तरी माझ्या मनात दोन दुःख आहेत. त्यापैकी एक हे सहकाऱ्याच्या निधनाचं दुःख आणि दुसरं म्हणजे ही निवडणूक काँग्रेसमार्फत विजयी झालो असतो तर आणखी आनंद झाला असता, अशी खंत सत्यजित तांबे (Satyajit Tambe) यांनी बोलून दाखवली आहे. विधान परिषदेच्या निवडणुकांमध्ये (MLC Election) सर्वाधिक हाय व्होल्टेज ड्रामा रंगला तो नाशिकमध्ये (Nashik)… तांबे पिता पुत्रांनी ऐनवेळी काँग्रेस पक्षाच्या निर्णयाविरोधात कृती केल्याने येथे भाजप मोठी खेळी करणार का, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं.
डॉ. सुधीर तांबे यांच्यावर काँग्रेसने कारवाई केल्यानंतर आता सत्यजित तांबे भाजपात जाणार का, याकडे नजरा खिळल्या होत्या. मात्र निवडणुकीचा निकाल लागेपर्यंत असं काहीही घडलं नाही. किंबहुना भाजपने सत्यजित तांबे यांना पाठिंबादेखील दिला नाही. त्यामुळे विधान परिषदेची निवडणूक जिंकल्यानंतरही सत्यजित तांबे नेमकी कोणती भूमिका घेणार सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. मात्र तांबे यांच्या आजच्या वक्तव्यावरून त्यांना अजूनही काँग्रेसकडून आशा असल्याचंच दिसून येतंय.
काय म्हणाले सत्यजित तांबे?
विधान परिषद निवडणुकीत विजयी झाले तरीही विजयी रॅली काढणार नाही, जल्लोष साजरा करणार नाही, अशी भूमिका सत्यजित तांबे यांनी घेतली आहे. याची दोन कारणं त्यांनी सांगितली. एक म्हणजे, नाशिक जिल्हा युवक काँग्रेसचा अध्यक्ष मानस पगारे याचा कालच दुर्दैवी मृत्यू झाला. या सगळ्या राजकारणात तो माझ्या पाठिशी उभा होता. त्याचं अपघाती निधन झाल्याने आम्ही आनंदोत्सव साजरा करणार नाहीत…
दुसरं कारण म्हणजे..
हा विजय काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून झाला असता तर जास्त आनंद असता. तो होऊ शकला नाही, म्हणून जास्त दुःख असल्याचं तांबे यांनी म्हटलं आहे.
काँग्रेसचे होते, काँग्रेसचेच राहणार?
संजय राऊत आणि अजित पवार यांनी सत्यजित तांबे यांना सल्ला दिला आहे. तुम्ही काँग्रेसमध्ये होतात आणि काँग्रेसमध्येच रहा, असं म्हटलंय. यावर सत्यजित तांबे यांनी मार्मिक प्रतिक्रिया दिली आहे. ते काय म्हणाले माहिती नाही, पण त्या वेळी प्रश्न सुटू शकले असते, अशीच स्थिती होती. पण योग्य वेळी भूमिका घेणार, असं तांबे यांनी सांगितलं.
500 किमी उभा आणि 500 किमी आडवा असा हा नाशिक पदवीधर मतदार संघ आहे. वडील डॉ. सुधीर तांबे यांनी या मतदार संघाची बांधणी केली आहे. त्यामुळे सगळ्याच लोकांनी आमच्या पाठिशी उभे राहिले. हे संबंध आम्ही जपणार आहोत, असं तांबे यांनी सांगितलं.
तांबे-थोरात एकच…
राजकारणात तांबे – थोरात परिवार एकच आहोत. आम्ही कधी आमच्या शत्रूलाही कधी शत्रू मानत नाही..आमचे संबंध अत्यंत सलोख्याचे संबंध आहेत.. तसेच सर्व राजकीय पक्षांशी देखील सलोख्याचे संबध आहेत. विचारांची लढाई विचाराने करतो… जिथं राजकारण करायचं तिथं राजकारण करायचं, मात्र तो काळ संपला की सर्वांशी आपण चांगले संबंध ठेवण्याचे काम करत असतो त्यामुळे यश मिळतंय, अशी प्रतिक्रिया सत्यजित तांबे यांनी दिली.