देशाच्या सीमेवरील दुश्मनांशी लढण्यासाठी सीबीआय आणि ईडीला पाठवा; शिवसेनेचा केंद्रावर निशाणा
भारतीय सैन्य एकाच वेळी चीन आणि पाकिस्तानशी लढत आहे, त्यांच्या जोडीला सरकारने आपल्या ईडी आणि सीबीआयसारख्या यंत्रणांनाही पाठवावे, असा खोचक सल्ला शिवसेनेने केंद्र सरकारला दिला आहे.
मुंबई : लडाख आणि कश्मीरातील दुश्मनांशी आपले सैन्य लढत आहे, त्यांच्या जोडीने सरकारने (Central government) आपल्या ईडी (सक्तवसुली संचालनालय), सीबीआयसारख्या यंत्रणांनाही चीन, पाकिस्तान यांच्याविरोधात जुंपावे, असा खोचक सल्ला शिवसेनेने (Shivsena) केंद्र सरकारला दिला आहे. केंद्रातील भाजप सरकार सातत्याने विरोधकांविरोधात ईडी (ED) आणि सीबीआय (CBI) या यंत्रणांचा वापर करत असल्याचा आरोप गेल्या अनेक महिन्यांपासून केला जात आहे. शिवसेचे आमदार प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांच्या घरावर व मुंबई, ठाण्यातील कार्यालयांवर सक्तवसुली संचालनालयानं (ED) छापे टाकले, तसेच त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. ईडीच्या या कारवाईनंतर केंद्र सरकार ईडीचा वापर राजकीय विरोधकांविरोधात करत असल्याचा आरोप शिवसेनेने यापूर्वीच केला होता. त्यानंतर आज ‘सामना‘ या शिवसेनेच्या अग्रलेखामधून शिवसेनेने या कारवाईविरोधात आवाज उठवला आहे. (Send CBI and ED to fight enemies on the borders; ShivSena advises Centeral Govt)
शिवसेनेने अग्रलेखात म्हटले आहे की, “लडाख आणि कश्मीरातील दुश्मनांशी आपले सैन्य लढत आहेच, पण त्या जोडीने सरकारने आपल्या ईडी, सीबीआय वगैरे यंत्रणांनाही चीन, पाकिस्तान यांच्या विरोधात जुंपावे. नाहीतरी हल्ली देशातील राजकीय विरोधकांविरोधात ईडी, सीबीआय आदी तपास यंत्रणांचा हत्यार म्हणून वापर सुरूच आहे. त्यामुळे या संस्थांना राष्ट्रीय शौर्य गाजवण्याची संधी मिळायला हवी. प्रत्येक वेळी बंदुकांनीच काम होते असे नाही. दिल्लीच्या सीमेवर आपल्याच शेतकऱ्यांना अतिरेकी ठरवून मारले जात आहे, तर कश्मीर सीमेवर अतिरेकी आमच्या सैनिकांचे बळी घेत आहेत. तेव्हा सीमेवरदेखील आता सैन्याबरोबर ईडी आणि सीबीआयला पाठवा! त्याशिवाय पर्याय नाही”.
सरदार पटेल हे पोलादी पुरुष होतेच. पोलादी पुरुषाचा अतिभव्य पुतळा नरेंद्र मोदी व अमित शहा यांनी गुजरातमध्ये उभा केला. सरदार पटेल हे शेतकऱ्यांचे नेते होते. ब्रिटिशांविरुद्ध त्यांनी केलेली साराबंदी चळवळ, बार्डोलीचा सत्याग्रह निर्णायक ठरला, शेतकऱ्यांचे आंदोलन उभे करून त्यांनी ईस्ट इंडिया कंपनीस जेरीस आणले, पण दिल्लीच्या सीमेवर आणि देशाच्या सीमेवर सध्या जो अंदाधुंद प्रकार सुरू आहे, त्यामुळे पोलादी पुरुषाच्या पुतळ्याच्या डोळ्यांच्या कडाही ओलावल्या असतील.
चीनचे सैन्य हिंदुस्थानी हद्दीत लडाखमध्ये घुसले आहे. त्याचवेळी पंजाब आणि हरयाणाच्या शेतकऱ्यांना दिल्लीच्या सीमेवर अडवून ठेवण्यात आले आहे. नुसतेच अडवले नाही, तर त्यांच्यावर बळाचा, साम- दाम-दंड-भेदाचा प्रयोग केला जात आहे. केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्याविरोधात पंजाब व हरयाणातील शेतकऱयांचे हे आंदोलन आहे. शेतकऱयांना दिल्लीतील रामलीला मैदानावर जायचे आहे, पण केंद्राने लाठ्याकाठ्या, थंड पाण्याचे फवारे, अश्रुधुराची नळकांडी फोडून त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. कडाक्याच्या थंडीत पहाटे शेतकऱ्यांवर थंड पाण्याचा मारा करणे हे अमानुष आहे. तरीही शेतकरी मागे हटायला तयार नाहीत. शेतकरी इतके आक्रमक व जिद्दीला कधीच पेटले नव्हते. आता शेतकरी ऐकत नाहीत व केंद्र सरकारविरोधात, पंतप्रधान मोदी यांच्या विरोधात हंगामा करीत आहेत म्हटल्यावर भाजपने व केंद्रीय यंत्रणांनी त्यांचे नेहमीचे जंतर मंतर, जादुई हातचलाखीचे प्रयोग सुरू केले.
हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी असे बेताल विधान केले की, शेतकऱ्यांच्या आंदोलनात खलिस्तानवादी घुसले आहेत. म्हणजेच शेतकऱ्यांचे आंदोलन देशद्रोही आहे. हरयाणा भाजपचे प्रदेशाध्यक्ष ओमप्रकाश धनकड यांनी तर असाही दावा केला की, शेतकऱ्यांचा आंदोलनात ‘‘पाकिस्तान झिंदाबाद’’च्या घोषणा दिल्या. तशी एक क्लिपच म्हणे जारी केली. भारतीय जनता पक्षाची ही भूमिका देशातले वातावरण चिघळवणारी आहेच, पण नव्या अराजकाला आमंत्रण देणारी देखील आहे.
खलिस्तानचा विषय संपला आहे. त्या अंधारयुगातून बाहेर पडण्यासाठी इंदिरा गांधी, जनरल अरुणकुमार वैद्य यांनी प्राणांचे बलिदान दिले, पण खलिस्तानचा विषय आज भाजपवाले नुसते उकरून काढत नाहीत तर त्यांना ती ठिणगी टाकून पंजाबात स्वतःचे राजकारण सुरू करायचे आहे. पंजाबातील ही थडगी पुन्हा उकरून काढली तर देशाला भारी पडेल. एखादा विषय हातातून निसटला की, ‘हिंदुस्थान-पाकिस्तान’ हा खेळ सुरू करायचा ही त्यांची हातचलाखी ठरलेलीच आहे.
जवाहरलाल नेहरू विद्यापीठातही पाकिस्तान झिंदाबाद, स्वातंत्र्य, आझादीच्या नावाने घोषणा दिल्या गेल्याचे जे पुरावे समोर आणले गेले ते बोगस ठरले. आपलीच माणसे मेकअप करून घुसवायची व हे असे प्रकार घडवायचे. त्यामुळे देशाची एकात्मता, शांतता, अखंडता उद्ध्वस्त होत असते. शेतकरी दिल्लीच्या सीमेवर नेटाने थांबला आहे व तो त्यांच्या मागण्यांसाठी जिद्दीने लढतो आहे. तो पंजाबचा आहे म्हणून त्यास देशद्रोही, खलिस्तानवादी ठरवायचे हा विचार दळभद्रीपणाचेच लक्षण आहे. शेतकऱ्यांवर दंगलीचे गुन्हे दाखल केले आहेत. खून, हत्या करण्याचे प्रयत्न असे आरोप आहेत. त्याच वेळी वृद्ध-जर्जर अशा अन्नदात्या शेतकऱ्यांवर काठ्या उगारतानाचे, त्यांना रक्तबंबाळ करतानाचे फोटो प्रसिद्ध झाले आहेत. हे पाहून सरदार पटेल यांचा भव्य पुतळा अहमदाबादेत खरेच अश्रू ढाळत असेल. तेही सरदारच होते. शीख बांधवांनाही ‘सरदार’ म्हणूनच संबोधले जाते. सरदारांवर अन्याय तेव्हाही झाला व आजही होतच आहे.
इकडे आपल्याच शेतकऱ्यांना दिल्लीत घुसू दिले जात नाही आणि तिकडे सीमेवर चीनचे सैन्य आमच्या हद्दीत घुसले व ठाण मांडून बसले आहे. शेतकऱ्यांवर जे फवारे मारले जात आहेत किंवा अश्रुधुराच्या नळकांड्या फोडून शेतकऱ्यांना मारले जात आहे तसा बलप्रयोग लडाख किंवा जम्मू-कश्मीरात होऊ नये याचे आश्चर्यच वाटते. चीनला सडेतोड उत्तर देण्यासाठी लडाखच्या पेंगाँग क्षेत्रात आता मरीन कमांडो तैनात करण्यात आले आहेत. याआधीच तेथे गरुड सैन्य, पॅरा स्पेशल फोर्स आहे. आता त्यांच्या जोडीला मरीन कमांडो तैनात केल्यामुळे सैन्य कारवाईस मजबुती मिळणार आहे. हे सर्व आपण वर्षभरापासून ऐकत आहोत, पण घुसलेले सैन्य बलप्रयोग करून हटवल्याच्या शौर्याची बातमी काही देशवासीयांना अद्यापपर्यंत ऐकायला मिळालेली नाही.
श्रीनगर, कश्मीर खोऱ्यात जवानांची बलिदाने सुरूच आहेत. गेल्या महिनाभरात महाराष्ट्राचे 11 सुपुत्र देशासाठी वीरगतीला प्राप्त झाले. हा मजकूर लिहीत असताना छत्तीसगढ येथील नक्षलवादी हल्ल्यात महाराष्ट्राचे जवान नितीन भालेराव यांना वीरगती प्राप्त झाली. दोन दिवसांपूर्वी 21 वर्षांचे यश देशमुख श्रीनगरात अतिरेक्यांच्या हल्ल्यात शहीद झाले. कोल्हापूरचे संग्राम पाटील पाकड्यांबरोबरच्या चकमकीत शहीद झाले. कोल्हापूरचेच ऋषीकेश जोंधळे व नागपूरचे भूषण सतई पाकड्यांना उत्तर देताना वीरगतीस प्राप्त झाले. देशासाठी बलिदान देणे, त्याग करणे ही छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्राची परंपराच आहे, पण राज्यकर्ते असे किती बळी व बलिदाने देणार आहेत? महाराष्ट्रासह देशभरात राजकीय विरोधकांना चिरडण्यासाठी भाजप सरकार सर्व प्रकारचे हातखंडे वापरत आहे. मग ती जिद्द देशाच्या दुश्मनांशी लढताना का दिसत नाही?
लडाख आणि कश्मीरातील दुश्मनांशी आपले सैन्य लढत आहेच, पण त्या जोडीने सरकारने आपल्या ईडी, सीबीआय वगैरे यंत्रणांनाही चीन, पाकिस्तान यांच्या विरोधात जुंपावे. नाहीतरी हल्ली देशातील राजकीय विरोधकांविरोधात ईडी, सीबीआय आदी तपास यंत्रणांचा हत्यार म्हणून वापर सुरूच आहे. तेव्हा या यंत्रणांना चीन आणि पाकिस्तानचीही सुपारी द्यायला काहीच हरकत नाही. त्यामुळे कदाचित चीन, पाकिस्तान गुडघे टेकून शरण येतील. बहुधा लडाखमध्ये घुसलेले चिनीही शरण येतील व पाकडेही ‘पीओके’ सोडून पसार होतील. विरोधकांना नमवण्याचे तंत्र ईडी, सीबीआयला माहीत आहे असा एकंदर विद्यमान राज्यकर्त्यांचा समज दिसत आहे. त्यामुळे या संस्थांना राष्ट्रीय शौर्य गाजवण्याची संधी मिळायला हवी. प्रत्येक वेळी बंदुकांनीच काम होते असे नाही. दिल्लीच्या सीमेवर आपल्याच शेतकऱ्यांना अतिरेकी ठरवून मारले जात आहे, तर कश्मीर सीमेवर अतिरेकी आमच्या सैनिकांचे बळी घेत आहेत. तेव्हा सीमेवरदेखील आता सैन्याबरोबर ईडी आणि सीबीआयला पाठवा! त्याशिवाय पर्याय नाही.
संबंधित बातम्या
Farmer Protest | केंद्र सरकारकडून अपमान, चार-पाच महिने आंदोलन करु, शेतकऱ्यांचा इशारा
नव्या कृषी कायद्यांमुळे शेतकऱ्यांच्या समस्या दूर होतील; पंतप्रधान नरेंद्र मोदींना विश्वास
क्वॉरंटाईन आहे, पुढच्या आठवड्यात चौकशी करा; प्रताप सरनाईक यांची ईडीला विनंती
(Send CBI and ED to fight enemies on the borders; ShivSena advises Centeral Govt)