Congress : राजीनामा देण्यास भाग पाडलं जातं म्हणत काँग्रेसच्या आणखी एका नेत्याचा राजीनामा; आझाद यांच्यानंतर पक्षाला दुसरा धक्का
काँग्रेसमधील (Congress) राजीनाम्याचे सत्र काही केल्या थांबण्याचं नाव घेत नाहीये. दोन दिवसांपूर्वी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद (Ghulam Nabi Azad) यांनी राजीनामा दिला होता. त्यानंतर आणखी एका काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याने राजीनामा दिला आहे.
नवी दिल्ली : काँग्रेसमधील (Congress) राजीनाम्याचे सत्र काही केल्या थांबण्याचं नाव घेत नाहीये. दोन दिवसांपूर्वी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद (Ghulam Nabi Azad) यांनी राजीनामा दिला आहे. या धक्क्यातून पक्ष सावरतो न सावरतो तोच आता काँग्रेसच्या अन्य एका माजी खासदाराने पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. तेलंगनामधील काँग्रेसचे नेते आणि माजी राज्यसभा खासदार एमए खान (MA Khan) यांनी राजीनामा दिला आहे.राजीनामा दिल्यानंतर एमए खान यांनी काँग्रेस नेतृत्व आणि राहुल गांधी यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. यावेळी बोलताना खान यांनी म्हटलं आहे की, काँग्रेस पक्ष हा लोकांपर्यंत पोहोचण्यात आणि आम्ही पूर्वीप्रमाणेच पुन्हा एकदा देशाला विकासाच्या वाटेवर घेऊन जाऊ असा विश्वास देण्यास कमी पडत असल्याचे खान यांनी म्हटलं आहे.
खान यांनी नेमकं काय म्हटलं?
काँग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वाकडे पाठवलेल्या आपल्या राजीनाम्यात एमए खान यांनी म्हटलं आहे की, G23 गटातील वरिष्ठ नेत्यांनी काँग्रेसच्या भलाईसाठी आणि पक्षाची मजबूत बांधणी करण्यासाठी आवाज उठवला होता. मात्र पक्षातील नेतृत्वाला हे काही फारसे रुचले नाही. त्यांनी G23 गटातील नेत्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले. जर पक्षाने वेळीच G23 गटातील वरिष्ठ नेत्यांच्या मागण्या लक्षात घेतल्या असत्या, पक्षातील त्यांचे योगदान लक्षात घेतले असते तर आज कदाचीत ही वेळ आली नसती. मी गेल्या चाळीस वर्षांपेक्षा अधिकाळापासून काँग्रेसचे काम करत आलो आहे. मात्र आता राजीनामा देत असल्याचे खान यांनी म्हटलं आहे.
ज्येष्ठ नेत्यांवर राजीनाम्यासाठी दबाव
एमए खान यांनी पक्षावर आणखी एक गंभीर आरोप केला आहे. काँग्रेसमध्ये ज्येष्ठ नेत्याला राजीनामा देण्यास भाग पाडण्यात येते असं खान यांनी म्हटलं आहे. जे नेते पक्षाशी एकनिष्ठ आहेत, ज्यांनी पक्षाच्या बांधणीसाठी आपलं उभ आयुष्य खर्ची घातलं त्यांना पुन्हा एकदा मुख्य प्रवाहात आणण्यात काँग्रेसला अपयश आले. त्या दिशेने पक्षाने साधे प्रयत्न देखील केले नाहीत. याचा परिणाम आपण सर्वजण पहात आहोत. आता पक्षाचा राजीनामा दिल्याशिवाय माझ्याकडे दुसरा पर्याय नसल्याचे एमए खान यांनी म्हटलं आहे.