रावसाहेब दानवे माझं घर फोडत आहेत, जावयाचा सासऱ्यावर गंभीर आरोप
भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे माझं घर फोडत आहेत, असा गंभीर आरोप दानवे यांचे जावई आणि माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी केला आहे (Dispute in Harshavardhan Jadhav and Raosaheb Danve).
औरंगाबाद : भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे हे माझं घर फोडत आहेत, असा गंभीर आरोप दानवे यांचे जावई आणि माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी केला आहे (Dispute in Harshavardhan Jadhav and Raosaheb Danve). या आरोपानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. लोकसभा निवडणुकीपासून रावसाहेब दानवे आणि हर्षवर्धन जाधव यांच्याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात होते. मात्र, आता जाधव यांनीच आरोप केल्याने दानवेंच्या घरातच फूट पडल्याचं चित्र आहे.
हर्षवर्धन जाधव म्हणाले, “रावसाहेब दानवे माझं घर फोडत आहेत. ते माझ्या बायकोला विधानसभा निवडणुकीत उभं करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळेच रावसाहेब दानवे यांनी माझे सदस्य फोडले.”
रावसाहेब दानवे यांच्या औरंगाबादमधील राजकीय प्रवेशाने सासऱ्याने जावयाला चकवा दिल्याची चर्चा रंगली आहे. दानवे यांनी जावई हर्षवर्धन जाधव यांच्या कन्नडमधील होम ग्राऊंडवरच राजकीय खेळी केली. दानवेंनी आपले पंचायत समितीचे सदस्य फोडल्याचा थेट आरोप हर्षवर्धन जाधव यांनी केला आहे. जाधव यांनी रायभान जाधव विकास आघाडीच्या माध्यमातून कन्नड पंचायत समितीची निवडणूक लढली. मात्र, आता दानवेंनी ही आघाडीच फोडत कन्नड पंचायत समितीवर भाजपचा झेंडा फडकावला.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या काळात शिवसेनेचे उमेदवार आणि तत्कालीन खासदार चंद्रकांत खैरे यांना पराभवाचा धक्का बसला. त्यानंतर रावसाहेब दानवे यांच्यावर जावयाला मदत केल्याचे अनेक आरोप झाले. लोकसभेत औरंगाबादमध्ये युतीच्या उमेदवाराचा दानवे यांनी मुद्दाम प्रचार न केल्याचाही आरोप झाला. मात्र, दानवेंनी हे सर्व आरोप फेटाळले होते. आता नव्याने झालेल्या या राजकीय घडामोडींनंतर सासरे आणि जावई यांची राजकीय आखाड्यात कुस्ती सुरु असल्याचं बोलले जात आहे.