‘नारायण राणे बत्ताशावरचे पैलवान, ते हिंद केसरीची बरोबरी करु शकत नाहीत’, शंभुराज देसाईंचा जोरदार टोला
नारळावरची कुस्ती जिंकून हिंद केसरीची बरोबरी नारायण राणे करु शकत नाहीत. जिल्हा बँकेच्या निवडणुका या मर्यादित मतांच्या निवडणुका आहेत. जनमताचा कौल घ्यायला पुढे या म्हणजे तुम्हाला कोकणातील शिवसेना काय आहे हे कळेल, असा इशाराच शंभूराज देसाई यांनी राणेंना दिलाय.
सातारा : सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीत (Sindhudurga District Bank Election) महाविकास आघाडीचा (Mahavikas Aghadi) पराभव करत भाजपनं दणदणीत विजय मिळवला आहे. या विजयानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्ला चढवला होता. नारायण राणे यांच्या या टीकेला शिवसेना नेते आणि गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी खोचक शब्दात प्रत्युत्तर दिलंय.
नारळावरची कुस्ती जिंकून हिंद केसरीची बरोबरी नारायण राणे करु शकत नाहीत. जिल्हा बँकेच्या निवडणुका या मर्यादित मतांच्या निवडणुका आहेत. जनमताचा कौल घ्यायला पुढे या म्हणजे तुम्हाला कोकणातील शिवसेना काय आहे हे कळेल, असा इशाराच शंभूराज देसाई यांनी राणेंना दिलाय. त्याचबरोबर नारायण राणे हे बत्ताशावरचे पैलवान आहेत. ते हिंद केसरीची बरोबरी करु शकत नाहीत, अशी टीका देसाई यांनी केलीय.
राणेंचा मुख्यमंत्री आणि पवारांवर निशाणा
जिल्हा बँकेतील विजयानंतर नारायण राणे यांनी शिवसेना आणि अजित पवारांचा तर समाचार घेतलाच मात्र आता त्यांचे टार्गेट महाराष्ट्र विधानसभा निवडणूक आहे, असेही सांगून टाकले, येत्या विधानसभेत महाराष्ट्रात भाजपचीच सत्ता येईल, आम्हाला भाजपचा मुख्यमंत्री हवा आहे, लगानची टीम नकोय आम्हाला, असे सूचक विधान यावेळी नारायण राणे यांनी केले आहे. तसेच शिवसेनेवर टीका करताना राणेंनी, हे पोस्टर लावायच्याच लायकीचे आहेत, राज्याचा कारभार करण्याच्या लायकीचे नाहीत. आता एका हातात गम आणि दुसऱ्या हातात पोस्टर घेऊन लावत फिरा, असा टोला सेनेला लगावला.
राणेंचा अजितदादांनाही टोला
काही दिवसांपूर्वीच अजित पवारांनी सिंधुदुर्गमध्ये गेल्यावर संस्था वाढवायला अक्कल लागते, डोकं लागतं, बंद पाडायला अक्कल लागत नाही, अशी कोपरखिळी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना लगावली होती, मात्र जिल्हा बँकेंच्या निवडणुकीत भाजपने बाजी मारल्यानंतर नारायण राणेंनी अजित पवारांच्या वक्तव्याचा जोरदार समाचार घेतला. अर्थ खात्याचे मंत्री येतात, तिन्ही पक्षाचा पराभव करून जातात त्याला अक्कल म्हणतात, असा टोला राणेंनी अजित पवारांना लगावला.
एसटी कर्मचारी आंदोलनावरुन देसाईंचा भाजपला सवाल
एसटी कर्मचाऱ्यांच्या विलीनीकरणाच्या मुद्द्यावरुनही देसाई यांनी भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांच्या वक्तव्याचा धागा पकडत भाजपला सवाल केलाय. त्यांच्या सरकारच्या काळात त्यांनी विलीनीकरणाचा निर्णय का घेतला नाही? त्यांचा एक जुना व्हिडीओ समोर आला आहे. त्यात त्याचं वक्तव्य आहे की हा निर्णय होणं अशक्य आहे. असं असतानाही मुख्यमंत्री ठाकरे यांनी एसटी कर्मचाऱ्यांना 41 टक्के पगारवाढ दिली आहे, असं देसाई म्हणाले.
इतर बातम्या :