Sharad Pawar Meet PM Narendra Modi : मोठी बातमी, शरद पवार पंतप्रधान मोदींमध्ये चर्चा, भेट म्हणून दिली ही फळं
Sharad Pawar Meet PM Narendra Modi : महाराष्ट्राच्या दृष्टीने एक महत्त्वाची बातमी आहे. माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणाच्या दृष्टीने महत्त्वाची बातमी आहे. दिल्लीमध्ये माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी आज संसद भवनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. शरद पवार यांनी त्यांची ही भेट राजकीय नसल्याच सांगितलं आहे. शेतीच्या विषयाशी संबंधित ही भेट होती. पण सध्याच्या परिस्थितीत महाराष्ट्रात महायुतीच सरकार सत्तेवर आल्यानंतर नवीन समीकरण जुळतील असं चित्र दिसू लागलय. 12 डिसेंबरला शरद पवारांचा वाढदिवस झाला. त्यांनी वयाच्या 85 व्या वर्षात पदार्पण केलं. त्यानंतर त्यांच्यापासून दुरावलेले त्यांचे पुतणे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख अजित पवार यांनी सहकुटुंब शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी जाऊन भेट घेतली. त्यांना शुभेच्छा दिल्या. तेव्हापासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांनी एकत्र यावं अशी चर्चा सुरु झालीय. म्हणून शरद पवार आणि पंतप्रधान मोदींची भेट महत्त्वपूर्ण ठरते.
शरद पवार आज पंतप्रधान मोदींना भेटले, त्यवेळी सातारा आणि फलटणचे दोन डाळिंब उत्पादक शेतकरी त्यांच्यासोबत होते. या भेटी दरम्यान शेतकऱ्यांशी संबंधित प्रश्नावर त्यांनी पंतप्रधान मोदींसोबत चर्चा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत शेतकऱ्यांच्या डाळिंब पिकाशी संबंधित ही भेट होती, असं पवारांनी सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत कुठलीही राजकीय चर्चा झाली नाही. पवारांनी त्यांना भेट म्हणून डाळिंब दिली. या भेटीतून कुठलाही राजकीय अर्थ निघू नये, म्हणून ही भेट फक्त पाच मिनिटांचीच होती, असं शरद पवार म्हणाले.
NCP-SCP chief Sharad Pawar, accompanied by pomegranate farmers from Satara and Faltan, met with Prime Minister Narendra Modi and presented him with pomegranates. Sharad Pawar emphasized that they did not have political discussions in the meeting. https://t.co/Jx5EUxR5At
— ANI (@ANI) December 18, 2024
याआधी दोन्ही नेत्यांची भेट कधी?
मागच्यावर्षी पुण्यात पीएम मोदी आणि शरद पवार यांची भेट झाली होती. त्या कार्यक्रमात शरद पवार आणि नरेंद्र मोदी एकाच मंचावर आले होते. त्या कार्यक्रमात पीएम मोदींना सन्मानित करण्यात आलं होतं. त्यावरुन राजकारणही बरच झालं.