आजि सोनियाचा दिनु, संकटातही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी हिम्मत दाखवली, पवारांकडून उद्धव ठाकरेंचं कौतुक
महाराष्ट्रावर गेले अनेक दिवस एकापाठोपाठ एक संकटे येतायत, पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या संकटातही त्यावर मात करण्याची हिम्मत दाखवली, अशा शब्दात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांचं कौतुक केलं.
मुंबई : आजि सोनियाचा दिनु… कष्टाकऱ्यांच्या निवाऱ्याचा प्रश्न मार्गी लागतोय. महाराष्ट्रावर गेले अनेक दिवस एकापाठोपाठ एक संकटे येतायत, पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी या संकटातही त्यावर मात करण्याची हिम्मत दाखवली, अशा शब्दात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी मुख्यमंत्र्यांचं कौतुक केलं. (Sharad Pawar Appriciate Cm Uddhav Thackeray In BDD Chawl Redevelopment Event)
मुंबईच्या मध्यवर्ती भागात वसलेल्या वरळी येथील बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील (Worli BDD Chawl Redevelopment) पुनर्वसन इमारतींच्या बांधकामाचा शुभारंभ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आला. खासदार शरद पवार (Sharad Pawar) आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्या प्रमुख उपस्थितीत हा शुभारंभ झाला.
पवारांकडून मुख्यमंत्र्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप
“अलीकडे महाराष्ट्रावर काही ना काही सातत्याने संकटं येत आहेत. एक मोठं अतिवृष्टीचं संकट राज्यावर आलं… हजारो घरं पडली… अनेक घरांमध्ये पाणी शिरलं… होतं नव्हतं ते वाहून गेलं… पण एक गोष्ट चांगली आहे, या संकटावरही मात करण्याची हिंमत मुख्यमंत्र्यांनी दाखवली आणि त्याचंच फलित म्हणजे आजचा कार्यक्रम….”
“म्हणून एका बाजूने या पूरग्रस्त घरांची बांधणी करणे हे सरकारसमोर आव्हान आहे. दुसरीकडे मागील 100 वर्षापासून या मुंबईमध्ये कष्ट करुन महाराष्ट्राला आणि देशाला आर्थिक शक्ती देण्यासाठी ज्यांनी घाम गाळला त्या सगळ्या कष्टकऱ्यांच्या निवाऱ्याचा प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने आज महत्त्वाचं पाऊल पडतंय, याचा मला मनोमन आनंद होतोय”, असं पवार म्हणाले.
आव्हाडांच्या पाठीमागे मुख्यमंत्री खंबीरपणे उभे राहिले
या चाळींच्या मध्ये काही बदल केले पाहिजेत, अधिक सुविधा दिल्या पाहिजेत, मालकी हक्क दिला पाहिजे या सगळ्या मागण्या राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या होत्या. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. म्हणून हा प्रश्न सुटला, आणि मुख्यमंत्र्यांच्याच हस्ते आज शुभारंभ होतोय, याचा आनंद आहे, असंही पवार म्हणाले.
पवारांकडून बीडीडी चाळीचा इतिहासाला उजाळा
या बीडीडी चाळीमध्ये एका दृष्टीने देशाचा इतिहास घडला. कारण या भागामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं वास्तव्य होतं, ज्यांनी या देशाच्या प्रत्येक नागरिकाला मताचा अधिकार दिला आणि लोकशाही पद्धतीने हा देश चालेल, असं सूत्र असणारं घटनेचं पुस्तक म्हणजेच संविधान दिलं. परिवर्तनाच्या चळवळीमध्ये अत्यंत महत्त्वाचं काम करणारे प्रबोधनकार ठाकरे याचंही वास्तव्य या भागात होतं. अण्णाभाऊ साठे, कॉम्रेड डांगे, आचार्य अत्रे, पुल देशपांडे, कॉम्रेड अमर शेख, सुनील गावस्कर अशा कितीतरी रत्नांचं वास्तव्य या भागात होतं, मला वाचतं खऱ्या अर्थाने या भागांने देशाच्या इतिहासात मोलाची भूमिका बजावलीय.
चाळ संस्कृती टिकवून ठेवा
आत या चाळीच्या ठिकाणी मोठ-मोठ्या इमारती उभ्या राहणार आहेत. पण मला तुम्हाला सांगायचंय की यातला कष्टकरी माणूस जाऊ देऊ नका… तुम्ही चाळीत आतापर्यंत जसे एकमेकांच्या सुखदु:खात सहभागी होतात, एकमेकांच्या जीवनाचा भाग होतात, त्याचप्रमाणे इथून पुढेही बिल्डिंगमध्ये असेच एकत्र राहा… आपल्या कष्टाची ही कमाई विकू नका… पुढच्या पिढीला हा ठेवा आहे, असं पवार म्हणाले.
(Sharad Pawar Appriciate Cm Uddhav Thackeray In BDD Chawl Redevelopment Event)
हे ही वाचा :
आम्हाला कुणी थप्पड देण्याची भाषा करु नये, अशी थप्पड मारु की कोणी उठणार नाही, मुख्यमंत्र्यांचा इशारा