सर्वात मोठी बातमी ! शरद पवार यांना अजितदादा यांचा ‘तो’ आरोप मान्य?; निवृत्तीवर म्हणाले, ना टायर्ड हूँ, ना रिटायर हूँ, मैं तो फायर हूँ
राज्यातील शिंदे सरकार भाजपच चालवेल. दिल्लीच्या आदेशावर हे सरकार चालेल. त्यांना मंत्रीपदं मिळतील, पण दिल्लीचे आदेशच पाळावे लागतील, असं राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार म्हणाले.
मुंबई : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी पक्षात बंड केल्यानंतर सवतासुभा मांडला आहे. अजित पवार यांचा गट शिंदे सरकारमध्ये सामील झाला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीत खळबळ उडाली आहे. सवतासुभा मांडल्यानंतर अजित पवार यांनी कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला होता. यावेळी त्यांनी शरद पवार यांच्यावर अनेक आरोप केले. त्यापैकी अजित पवार यांनी केलेला सर्वात मोठा आरोप खुद्द शरद पवार यांनीच मान्य केला आहेत. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत शरद पवार यांनी ही कबुली दिली आहे.
2014, 2017 आणि 2019 मध्ये शरद पवार यांनी भाजपशी युती करण्यासाठी चर्चा करण्यास सुरुवात केली होती. पण तिन्हीवेळी सर्व ठरल्यानंतर त्यांनी माघार घेतली होती, असा सर्वात मोठा आरोप अजित पवार यांनी केला होता. अजित पवार यांचा हा आरोप शरद पवार यांनी मान्य केला आहे. 2014 ते 2019 या काळात भाजपसोबत युतीची चर्चा झाली होती. चर्चा करण्यात गैर काय? चर्चा करणं हा लोकशाहीचा एक भाग आहे. पण विचारधारा वेगवेगळी अस्लयाने चर्चा पुढे गेली नाही. त्यानंतर कधीही भाजपला आम्ही साथ दिली नाही, असं शरद पवार म्हणाले.
मी अजून म्हातारा झालेलो नाही, असं सांगत शरद पवार यांनी अटल बिहारी वाजपेयी यांचे शब्दच ऐकवले. मी टायर्ड नाही आणि रिटायर नाही. मी अजूनही पक्षासाठी काम करत आहे. माझ्याकडे कोणतंही मंत्रीपद नाही. मला रिटायर होण्याचा सल्ला देणारे हे कोण आहेत? असा सवालच शरद पवार यानी केला. मी अजूनही काम करत आहे, असंही ते म्हणाले.
भाजपच्या इशाऱ्यावरून हल्ला
जर अध्यक्ष म्हणून माझी नियुक्ती बेकायदेशीर असेल तर प्रफुल्ल पटेल आणि इतरांची नियुक्तीही बेकायदेशीर ठरते. प्रफुल्ल पटेल यांनीच अध्यक्षपदासाठी माझ्या नावाचा प्रस्ताव ठेवला होता. दिल्लीतील तालकटोरा स्टेडियममध्ये सर्व संमतीने माझी निवड करण्यात आली होती. अजित पवार आणि इतरांकडून (भुजबळ आणि पटेल) माझ्यावर होत असलेले हल्ले भाजपच्या इशाऱ्यावरच होत आहे, असा आरोपही त्यांनी केला.
ही घराणेशाही आहे काय?
अजितला मी चारवेळा उपमुख्यमंत्री बनवलं. त्यांना चांगली खाती दिली. निवडणुकीत पराभव होऊनही मी प्रफुल्ल पटेल यांनी केंद्रात मंत्री बनवलं. पीए संगमा याच्या कन्येसह इतरांना मंत्री बनवलं. पण मी सुप्रियाला मंत्रीपद दिलं नाही. ही घराणेशाही आहे काय? अजित जे सांगत आहेत ते चुकीचं आहे. त्यांचे आरोपच चुकीचे आहेत, असं शरद पवार म्हणाले.
शिवसेना-भाजपमध्ये फरक
आम्ही शिवसेनेसोबत जाऊ शकतो तर भाजपसोबत का नाही? असा सवाल अजित पवार यांनी केला होता. त्यालाही पवारांनी प्रत्युत्तर दिलं. शिवसेना आणि भाजपमध्ये फरक आहे. आणीबाणीच्या काळात शिवसेना आणि काँग्रेसची युती झाली होती. आपण भाजपच्या विरोधात आहोत हीच सर्वात मोठी गोष्ट आहे. भाजपचा हिंदुत्ववाद वगैरे काही नाही. लोकांना संभ्रमित करण्याचा हा प्रकार आहे, असंही ते म्हणाले.