आमच्याकडे सर्कसमध्ये प्राणी आहेत, मात्र विदुषकाची कमी, राजनाथ सिंह यांच्या टीकेवर पवारांचं प्रत्युत्तर
भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी (Sharad Pawar on Rajnath Singh) महाराष्ट्र सरकारवर केलेल्या टीकेवरुन राजकारण तापत चाललं आहे.
रायगड : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी (Sharad Pawar on Rajnath Singh) महाराष्ट्र सरकारवर केलेल्या टीकेवरुन राजकारण तापत चाललं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक, शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांच्यापाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीदेखील राजनाथ सिंह यांना प्रत्युत्तर दिलं आहे (Sharad Pawar on Rajnath Singh).
“आमच्याकडे सर्कसमध्ये प्राणी आहेत. त्याचबरोबर सर्कसमध्ये विदुषकाची कल्पना आहे. पण विदुषकाची कमी आहे”, असा टोला शरद पवार यांनी लगावला आहे.
“महाराष्ट्र सरकार हे तीन पक्षांचे सरकार आहे. असं वाटतं की सरकारच्या नावाखाली ‘सर्कस’ होत आहे. महाराष्ट्र शासनाकडे ज्या प्रकारची दूरदृष्टी असायला हवी, तीच दिसत नाही” अशी टीका राजनाथ यांनी केली होती. त्यांच्या याच टीकेवर पवारांनी उत्तर दिलं.
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या कोकण दौऱ्यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी टीका केली होती. या टीकेलादेखील शरद पवार यांनी उपहासात्मक प्रत्युत्तर दिलं. “भाजपच्या नेत्यांनी लवकर दौरे केले. त्यांनी अनेक नारळाची झाडं उभी केली. मला या गोष्टीचा आनंद आहे. त्यांचं अभिनंदन”, असं उत्तर शरद पवार यांनी दिलं.
शरद पवारांचा झंझावाती कोकण दौरा, नुकसानग्रस्तांना थेट बांधावर जाऊन धीर
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज (9 जून) आपल्या कोकण दौऱ्याला रायगडपासून सुरुवात केली (Sharad Pawar in Nisarga Cyclone affected Raigad). यावेळी त्यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्याशी चर्चा केली आणि प्रश्न समजून घेतले. त्यांनी माणगाव आणि म्हसळ्यात वादळाने केलेल्या नुकसानीचा आढावा घेतला. म्हसळानंतर ते दिवे आगारकडे रवाना झाले.
शरद पवार यांनी आज दिवसभर रायगड जिल्ह्यातील नुकसानीची पाहणी केली. दरम्यान, संध्याकाळी त्यांनी श्रीवर्धन येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे नेते सुनिल तटकरे, आदिती तटकरे आणि इतर अनेक नेते उपस्थित होते.
शरद पवार पत्रकार परिषदेत काय म्हणाले?
चक्रीवादळामुळे नारळ आणि सुपारीची पिकं उद्ध्वस्त झाली आहेत. नारळाचं पीक उद्ध्वस्त झालं तर ते परत यायला 10 वर्ष लागतात. नारळ, काजू, सुपारीच्या बागा उद्ध्वस्त होणं म्हणजे पुढच्या 10 वर्षांचं नुकसान.
यापूर्वी जालना आणि औरंगाबादमध्ये मोसंबीच्या बागा उद्ध्वस्त झाल्या होत्या. तेव्हा मी तिथे भेट दिली होती. त्यावेळी आम्ही चार ते पाच दिवसात मोसंबी बागायतदारांना केंद्र सरकारकडून 35 हजार रुपये हेक्टरी मदत करुन दिली होती.
चक्रीवादळामुळे मोठं नुकसान झालं आहे. राज्यात यापूर्वीदेखील अशाप्रकारचे संकटं आली आहेत. जांभूळपाडा इथली आपत्ती मला आठवते, तेव्हा राज्य आणि केंद्र सरकारने तिथली गावं उभी केली होती. तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी तिथे स्वत: आले होते. त्यानंतर नागोठाणे येथील घटना, त्यानंतर 2005 सालाची अतिवृष्टी, त्य वेळी मी कोकणाला भेट दिली होती.
रायगड जिल्ह्यावर कोरोनाचं संकट असताना चक्रीवादळाचं संकट आलं. यावेळी केंद्र आणि राज्य सरकारने धोरण ठरवून मदत केली पाहिजे. सरकार मच्छिमारांसाठी वेगळं पॅकेज जाहीर करण्याची शक्यता आहे. अशा संकंटसमयी याअगोदर केंद्र आणि राज्य दोन्ही सरकारांनी मदत केली आहे. त्यामुळे आतादेखील मदत केली पाहिजे.
वीज पुरवठा खंडीत झाल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. वीज पुरवठा लवकर सुरळीत केला पाहिजे. यासाठी मुंबईतील वीज पुरवठा करणाऱ्या कंपन्यांची मदत घेता येईल का, तेही पहायला हवं. आजूबाजूच्या जिल्ह्यातील मनुष्यबळ इकडे वळवून 4 ते 5 दिवसात वीज पुरवठा सुरु करायला हवा.
लोकांना यापूर्वी दिलेलं धान्य भिजलं आहे. त्यांना परत धान्य दिलं पाहिजे. यासाठी मी अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्याशी संपर्क केला आहे. अन्नधान्य पुन्हा देण्याचा निर्णय ते घेत आहेत.
इथले लोकप्रतिनिधी, शासकीय यंत्रणा चांगल्या पद्धतीने काम करत आहेत. राज्याने आणि केंद्राने मदत केली पाहिजे. त्यासाठी लोकप्रतिनिधी म्हणून आपण सरकारकडे पाठपुरावा करायला हवा, असा सल्ला शरद पवार यांनी दिला.
संबंधित बातम्या :
ही बाळासाहेबांचीच शिवसेना, शब्द न पाळणारी भाजपा आता वाजपेयींची राहिलीय का? : शिवसेना
सत्तेच्या लालसेतून शिवसेनेकडून धोका, महाराष्ट्रात तीन पक्षांचे सरकार नव्हे, सर्कस : राजनाथ सिंह
रिंगमास्टरच्या हंटरवर चालणारे मंत्री लोकशाही सरकारला ‘सर्कस’ म्हणतात : नवाब मलिक