जाणत्या राजाकडून छत्रपतींची कोंडी?, संभाजीराजेंचं मराठा राजकारण संपवण्याचा कट?, शिवसेनेच्या काठीने पवारांचा डाव?
आत्तापर्यंतच्या अडीच-तीन वर्षांच्या महाविकास आघाडीच्या काळात शरद पवार यांचा शब्द या सरकारमध्ये अखेरचा मानला जातो. ते या सरकारचे प्रवर्तक असल्याचे मानले जाते. मात्र संभाजीराजेंच्या पाठिंब्याच्या मुद्द्यावरुन पवारांच्या पाठिंब्याच्या विधानंनतरही शिवसेनेची आलेली भूमिका ही बरचं काही सांगून जाणारी आहे.
मुंबई – छत्रपती संभाजीराजे (MP Chatrapati Sambhaji Raje)यांना राज्यसभा निवडणुकीसाठी (Rajyasabha election)नेमक्या कोणकोणत्या पक्षांचे समर्थन मिळणार, ते शिवसेनेत (Shivsena)जाणार का, अशा सगळ्या प्रश्नांचा सस्पेन्स अजून कायम आहे. महाविकास आघाडीत नेहमी एक भूमिका असलेल्या दोन पक्षांत मात्र यानिमित्ताने मतभेद दिसत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस संभाजीराजेंना राज्यसभेच्या जागेसाठी पाठिंबा देईल, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी जाहीर केले असले तरी अंतिम निर्णय महाविकास आघाडी म्हणून घेतला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. तर दुसरीकडे गुरुवारी संभाजीराजे यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर सुद्धा संभाजीराजेंना शिवसेना पाठिंबा देणार की नाही, हे दोन्ही बाजूंकडून अद्याप स्पष्ट झालेले नाही. राज्यसभेचा सहावा उमेदवार शिवसेनेचाच असेल, अशी भूमिका राज्यसभा खासदार आणि शिवसेना नेते संजय राऊत यांनी ठासून मांडली आहे. संभाजीराजे शिवसेनेत आले तरच त्यांना राज्यसभेची उमेदवारी दिली जाईल, अशी शिवसेनेची भूमिका आहे.
छत्रपती संभाजीराजे शिवसेनेत जाण्याने काय होईल?
छत्रपती संभाजीराजे शिवसेनेत गेले तर छत्रपतींचा वंशज अधिकृतरित्या शिवसेनेत असल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेनेचे बळ वाढेल. हिंदुत्व, मराठी आणि छत्रपतींच्या नावाच्या राजकारणात संभाजीराजेंचा शिवसेनेला लाभ होईल. राज्यसभेत शिवसेना आणि पर्यायाने विरोधकांचे एक संख्याबळ अधिकृत रित्या वाढणार आहे. इतकेच नाही तर याचा फायदा शिवसेनेची मैत्री असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसलाही होणार आहे.
छत्रपतींचे मराठा राजकारण संपवण्याचा प्रयत्न?
छत्रपती संभाजीराजे यांनी राज्यसभेची सहावी जागा लढवण्याचा निर्णय ज्या दिवशी जाहीर केला, त्याच दिवशी त्यांनी स्वराज्य नावाची संघटना काढण्याचाही निर्णय जाहीर केला आहे. आगामी काळात ही संघटना राजकीय पर्याय म्हणूनही उभी राहील, अशी शक्यताही त्यांनी वर्तवली आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर गेल्या दोन वर्षांत या आंदोलनाचे नेतृत्व जवळपास छत्रपती संभाजीराजेंकडे गेले आहे. मराठा आरक्षण न मिळाल्याने मराठा समाजात सत्ताधाऱ्यांबाबत नाराजी आहे. अशा स्थितीत छत्रपतींच्या स्वराज्य या संघटनेच्या रुपाने नवा पर्याय उभा राहिला, तर त्याला राज्यात राजकीय पाठइंबा मिळण्याची शक्यता आहे.
मराठा मतदान असलेल्या राष्ट्रवादीला थ्रेट?
छत्रपती संभाजीराजे राजकीय पटलावर स्वतंत्र्यरित्या आले तर त्याचा सर्वाधिक राजकीय फटका, राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसला बसेल. राज्यात विशेषता प. महाराष्ट्रात मराठा मतदार हे राष्ट्रवादीचे मुख्य मतदार आहेत. अशा स्थितीत छत्रपतींनी स्वतंत्र संघटना उभारणे राष्ट्रवादीला परवडणारे नाही. मात्र छत्रपती असल्याने खुलेपणाने याचा विरोधही राष्ट्रवादीला करता येणे शक्य नाही.
पहिल्यांदाच पवारांपेक्षा शिवसेनेची भूमिका वेगळी?
आत्तापर्यंतच्या अडीच–तीन वर्षांच्या महाविकास आघाडीच्या काळात शरद पवार यांचा शब्द या सरकारमध्ये अखेरचा मानला जातो. ते या सरकारचे प्रवर्तक असल्याचे मानले जाते. मात्र संभाजीराजेंच्या पाठिंब्याच्या मुद्द्यावरुन पवारांच्या पाठिंब्याच्या विधानंनतरही शिवसेनेची आलेली भूमिका ही बरचं काही सांगून जाणारी आहे. छत्रपती संभाजीराजे शिवसेनेत गेले तर स्वतंत्र मराठ्यांची संघटना अस्तित्वात येणे शक्य होणार नाही, असे झाल्यास त्याचा फायदा राज्यात सर्वाधिक राष्ट्रवादीलाच होईल. यात पडद्यामागून नेमकं राजकारण कोण करतंय, हे वेगळं सांगायची गरज नाही.