Sharad Pawar : धर्माच्या आधारावर आरक्षण देण्याच्या विषयावर शरद पवारांकडून भूमिका स्पष्ट, म्हणाले….
Sharad Pawar : महाराष्ट्रातील दिग्गज नेते शरद पवार यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर बोचरी टीका केली. त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना अनेक मुद्दे मांडले. धर्माच्या आधारावर आरक्षण देण्यावर विषयावर सुद्धा शरद पवार यांनी भाष्य केलं.
सध्या लोकसभा निवडणुकीचा काळ सुरु आहे. राजकीय पक्ष, नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप, टिका, टिप्पणी सुरु आहे. महाराष्ट्रातही प्रचार जोरात सुरु आहे. आज शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली. त्यांना टोले लगावले. कोल्हापूरमध्ये ते मीडियाशी बोलत होते. ‘मोदींच्या सभा झाल्या पाहिजेत, म्हणून 5 टप्प्यात मतदान होतय’ असं शरद पवार म्हणाले. महाराष्ट्रात पाच टप्प्यात मतदान घेण्याच कारण काय? असा सवाल शरद पवार यांनी विचारला. भाजपाला महाराष्ट्रातील वातावरणाबाबत चिंता वाटत असावी, असंही ते म्हणाले. “पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भाषणातून मूळ मुद्दे सोडून लोकांना इतर ठिकाणी वळवण्याचा काम करतात” असा शरद पवारानी नरेंद्र मोदींना टोला लगावला.
“इंडिया आघाडीचं सरकार आलं तर 5 वर्षांत 5 पंतप्रधान आणणार हा जावईशोध पंतप्रधान मोदींनी कुठून लावला?” असा सवाल शरद पवारांनी विचारला. स्थानिक मुद्यावरुन भाषण सुरु करणं ही मोदींची स्टाईल आहे असं शरद पवार म्हणाले. शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या FRP च्या मुद्यावरही त्यांनी भाष्य केलं. “FRP मुळे शेतकऱ्यांना खात्रीशीर भाव मिळतो. FRP ही संकल्पना आम्ही सुरु केली. मोदींना हे माहित नाही. साताऱ्यात मोदींना यशवंतवराव चव्हाणांच्या नावाचा विसर पडला. स्थानिक नेते लिहून देतात, तेवढं मोदी बोलतात” अशी शरद पवार यांनी टीका केली.
धर्माधारित आरक्षणावर शरद पवारांची भूमिका काय?
पत्रकारांनी शरद पवार यांना 50 टक्के आरक्षणाची मर्यादा वाढवून धर्माच्या आधारवर आरक्षण देण्याचा डाव आहे का? या संबंधी प्रश्न विचारला. त्यावर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. “धर्माच्या आधारावर आरक्षण ही संकल्पना आम्हाला मान्य नाही. मोदींनी जरी धर्माच्या आधारावर आरक्षण दिलं, तरी संघर्ष करु” असं शरद पवार म्हणाले. “एकदा म्हणाले कुणाच तरी बोट धरुन राजकारणात आलो. मोदी आता, भटकती आत्मा म्हणून गेले. मोदी काहीही बोलतात” अशी टीका शरद पवार यांनी केली.