‘शरद पवारांनी देशाचं पंतप्रधान व्हावं’, महाविकास आघाडी नव्हे तर भाजप जवळच्या नेत्यांचं वक्तव्य!
आता भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचे मानलेले बंधु आणि भाजप सरकारमधील एका मंत्र्यानेच शरद पवार यांनी पंतप्रधान व्हावे अशी इच्छा व्यक्त केलीय!
सांगली : शरद पवार (Sharad Pawar) यांनी पंतप्रधान व्हावं अशी इच्छा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते व्यक्त करतात. तर भाजपच्या नेत्यांकडून अनेकदा यावरुन राष्ट्रवादीवर टोलेबाजी होती. मात्र, आता भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांचे मानलेले बंधु आणि भाजप सरकारमधील एका मंत्र्यानेच शरद पवार यांनी पंतप्रधान व्हावे अशी इच्छा व्यक्त केलीय! माजी मंत्री महादेव जानकर (Mahadev Jankar) यांनी शरद पवार यांनी देशाचे पंतप्रधान व्हावे ही आपली इच्छा असल्याचं वक्तव्य केलंय. सांगलीमध्ये आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचं अनावरण आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आलं.
महादेव जानकर म्हणाले की, एसटीच्या सवलती पवार साहेबांनीच दिल्या. आम्ही प्रयत्न केले. धनगर समाजासाठी एसटीच्या 13 योजना मी बनवल्या. 1 हजार कोटी रुपये दिले. मात्र अजून 1 हजार कोटी तुम्ही दिले. त्यामुळे एसटी समाजातील मुले भविष्यात आएएस, आयपीएस होतील. बाप हा बाप असतो आणि नेता हा नेता असतो. मी ही तीन चार आमदार केले. पहिलं आरक्षण शाहूंनी दिलं आणि होळकरांच्या घरी मुलगी देण्यात आलीय. जयंत पाटील तुम्ही आम्ही पाहुणे होऊ शकतो. शरद पवार आपण देशाचे पंतप्रधान व्हावे मी माझी इच्छा आहे. मोदी आणि तुमचं रिलेशन चांगलं आहे, थोडा धक्का द्या. महाराष्ट्रात आपण दोघं असल्यावर रान हाणून नेऊ. माझी पार्टी भविष्यात राष्ट्रीय पार्टी होईल आणि मी खासदार होऊ शकेल, असंही वक्तव्य जानकर यांनी केलंय.
जानकर भाजपची साथ सोडून महाविकास आघाडीसोबत जाणार?
दरम्यान, जानकर यांनी जाहीर व्यासपीठावरुन शरद पवार यांच्यावर स्तुतीसुमनं उधळल्यानं महादेव जानकर भाजपची साथ सोडणार का? असा प्रश्न आता विचारला जातोय. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचे मानलेले बंधु अशी जानकरांची ओळख आहे. तसंच शिवसेना भाजप युती सरकारच्या काळात दुग्धविकास खात्याची जबाबदारी जानकरांवर होती. मात्र, पडळकरांची भाजपशी जवळीक वाढली आणि जानकर भाजपपासून काहीशे दूर गेल्याचं पाहायला मिळालं.
जयंत पाटलांचाही मिश्किल प्रतिसाद
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही जानकर यांना मिश्किल प्रतिसाद दिल्याचं पाहायला मिळतंय. ज्यांच्याकडे पाहिल्यानंतर मला सारखं वाटतं की हा आपला माणूस आहे, होऊ घातलेल्या राष्ट्रीय पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर, अशा शब्दात जयंत पाटलांनी जानकरांचं स्वागत केलं. महादेव जानकर मला माहित आहे तुम्ही बोलू शकत नाही. मात्र, तुमच्या मनातील सरकार आहे. काळजी करु नका आपलं सरकार आहे. आम्ही निश्चित प्रश्न सोडवू, ज्यावेळी तुम्ही आणि पवारसाहेप दिल्लीला जाल, असंही जयंत पाटील यावेळी म्हणाले.
इतर बातम्या :