Sharad Pawar : ‘केसाने गळा कापायचा…’, आरआर पाटील यांच्याबद्दलच्या अजित पवारांच्या वक्तव्यावर शरद पवार म्हणाले…
Sharad Pawar : "आम्ही सदनाचा सदस्य बनण्याच्या वेळेला आणि शासन यंत्रणेत प्रतिनिधी होण्यासाठी राजभवनात शपथ घेतो, त्यात स्पष्ट उल्लेख आहे, अशा गोष्टी मी कुणालाही दाखवणार नाही, त्याचं स्पष्टीकरण करणार नाही. त्याची गुप्तता कायम ठेवेल. अशी शपथ घेतो" शरद पवारांनी हे सांगताना देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.
“सिंचन घोटाळ्याचा उल्लेख आम्ही केलेला नाही. हा प्रश्न कुणी काढला हे सांगायची गरज नाही. राज्याच्या राजकारणातील स्वच्छ व्यक्ती म्हणून आर.आर. पाटील यांचा लौकीक होता. उत्तम प्रशासक म्हणून त्यांचा लौकीक होता. अशा नेत्याबाबत उलटीसुलटी चर्चा होणं हे अशोभनीय आहे” असं शरद पवार म्हणाले. नाव न घेता शरद पवार यांनी अजित पवार यांच्यावर निशाणा साधला. 29 ऑक्टोबरला सांगलीच्या तासगाव येथे अजित पवार यांची सभा झाली. या सभेत त्यांनी आर. आर. पाटील यांच्याबद्दल जे वक्तव्य केलं त्यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. “आपण आर. आर. आबांना प्रत्येक वेळेला मदत केली. पण आर. आर. आबांनी आपल्याविरोधात उघड चौकशी करावी या फाईलवर स्वाक्षरी केली” असा आरोप अजित पवार यांनी केला. सिंचन घोटाळ्याशी संबंधित ही फाईल होती. ‘केसाने गळा कापायचे धंदे आहेत’ अशी टीका अजित पवारांनी केली.
आज शरद पवार या विषयावर बोलताना म्हणाले की, “हे घडलं नसतं तर आनंद झाला असता. जी व्यक्ती जाऊन 9 वर्ष झाली, त्यांची प्रतिमा चांगली होती. त्यांच्यावर काही बोललं जातं. ठिक आहे. सत्ता हातात आल्यावर आपण काहीही बोलण्यास मुक्त आहोत असं काही लोकांना वाटतं त्यातली हा भाग असेल” असा शरद पवारांनी नाव न घेता अजित पवारांना टोला लगावला.
‘अशा गोष्टी मी कुणालाही दाखवणार नाही’
“ही माहिती मागवण्याचा कुणालाही अधिकार आहे. त्यामुळे माहिती मागवली आहे, असं फडणवीस यांना वाटत आहे. पण ठिक आहे. मी शासनात थोडं फार काम केलं. त्यांच्या इतकं कदाचित नसेल. पण मी शासनात पाहिलं आहे, आम्ही सदनाचा सदस्य बनण्याच्या वेळेला आणि शासन यंत्रणेत प्रतिनिधी होण्यासाठी राजभवनात शपथ घेतो, त्यात स्पष्ट उल्लेख आहे, अशा गोष्टी मी कुणालाही दाखवणार नाही, त्याचं स्पष्टीकरण करणार नाही. त्याची गुप्तता कायम ठेवेल. अशी शपथ घेतो. मी अनेकदा पाहिलं. मी महाराष्ट्र आणि देशात सात वेळा शपथ घेतली आहे. त्या सातही वेळी शपथेत हे वाक्य होतं हे मला कळतं” शरद पवार यांनी यातून देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. मंत्रीपदाची शपथ घेताना काही गोष्टी गोपनीय ठेवाव्या लागतात असं शरद पवार यांचं म्हणण आहे. देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला ही फाईल दाखवली, असं अजित पवार म्हणाले.