Sharad Pawar : ‘पाकिस्तान, श्रीलंका व्हायचं नसेल तर…’ शरद पवारांचा इशारा, तर भाजपवर जोरदार निशाणा
पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं सर्वधर्मीय ईद-ए-मिलानचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला शरद पवारांची उपस्थित होते. यावेळी बोलताना शरद पवार यांनी भाजपवर जोरदार टीका केलीय. तसंच पाकिस्तान, श्रीलंकेतील स्थितीकडे बोट दाखवत देशातील जनतेलाही सूचक इशारा दिलाय.
पुणे : ‘भारत हा देश अनेक जाती-धर्माचा आहे. आपल्या विविधतेत सौंदर्य आहे. मात्र, रशियासारख्या (Russia) देशाला मानवतेचा विसर पडलाय. पाकिस्तान (Pakistan) सारखा देश आपल्यासोबत स्वतंत्र झाला. आज तिथे काय स्थिती आहे? खाली दक्षिणेत काय चित्र आहे? आज हिंदुस्थानात काय सुरु आहे? भारतातही काही लोक असाच प्रयत्न करत आहेत’, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी देशातील स्थितीवर भाष्य केलं. पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं सर्वधर्मीय ईद-ए-मिलानचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला शरद पवारांची उपस्थित होते. यावेळी बोलताना शरद पवार यांनी भाजपवर जोरदार टीका केलीय. तसंच पाकिस्तान, श्रीलंकेतील स्थितीकडे बोट दाखवत देशातील जनतेलाही सूचक इशारा दिलाय.
पवारांनी पाकिस्तानातील अनुभव सांगितला
शरद पवार म्हणाले की, समाजाच्या सर्व घटकांचे नेतृत्व करणाऱ्या आणि मानवतावादासाठी आपल्या वाणीचा उपयोग करणाऱ्या सर्वधर्मीय धर्मगुरुंना बोलावलं हे आजच्या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य आहे. हा देश अनेक जाती-धर्माचा आहे. विविधदेत सौंदर्य आहे. हे सौंदर्य उठून दिसायचं असेल तर सर्वांचा सन्मान केला पाहिजे. रशियासारखा शक्तीशाली देश एका लहान देशावर रोज हल्ला करतोय. या मोठ्या देशाला मानवतेचा विसर पडल्याचं आपण रोज पाहतो आहोत. ही स्थिती रशियात असेल तर त्याच्या शेजारी काय स्थिती असेल? खाली दक्षिणेत काय आहे? उत्तरेत काय चित्र आहे? पाकिस्तानसारखा देश जो आपल्यासोबत स्वतंत्र झाला, तिथे काय स्थिती आहे? एक तरुण माणूस तिथे पंतप्रधान झाला. त्याला पायउतार व्हावं लागलं. हे घडतं त्याचं कारण त्या ठिकाणचे राज्यकर्ते त्यांची भूमिका या सगळ्याला कारणीभूत आहे. मी अनेकदा पाकिस्तानला गेलोय. माझा स्वत:चा अनुभव आहे, तिथला सामान्य माणूस आपला विरोधक नाही, असा दावाही पवार यांनी यावेळी केलाय.
आज हिंदुस्तानात काय सुरु आहे?
‘ज्यांना सत्ता हवी आहे, ते लष्कराचा वापर करुन आपल्या स्वार्थासाठी राजकारण करतात. राजकीय स्वार्थासाठी हा संघर्ष उभा केला जातोय. आज हिंदुस्तानात काय सुरु आहे? चुकीचं नेतृत्व हे प्रश्न निर्माण करतात. भारतात काही लोक असाच प्रयत्न करत आहेत. आज कुणी देशाच्या अभिमानाला धक्का लावण्याचं काम करत असेल, देशातील एकात्मतेला धोका निर्माण करत असेल, तर तुम्हाला आम्हाला काही झालं तरी त्या विरोधात उभं राहावं लागेल. आम्ही जात, धर्म, भाषा यावरुन माणसा माणसात संघर्ष होऊ देणार नाही आणि हे सांगण्यासाठीच आपण इथे जमलो आहोत. आज आपल्या शेजारील देशात जे चित्र दिसत आहे ते टाळण्यासाठी आपल्यातील बंधुभाव वाढवावा लागणार आहे. भाईचारा जपला जावा असा संदेश इथून दिला जावा. याचा संबंध राजकारण किंवा निवडणुकीच्या मतांशी नाही’, असंही पवार यावेळी म्हणाले.