Sharad Pawar : आमदारांना घरं देण्यावरुन शरद पवारांनी फटकारलं! ठाकरे सरकारला पर्यायही सुचवला
मुख्यमंत्र्यांच्या आमदारांना घरे देण्याच्या घोषणेनंतर सर्वस्तरातून टीका होऊ लागली आहे. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही सरकारला फटकारलं आहे.
मुंबई : अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी केलेल्या एका मोठ्या घोषणेमुळं सर्व सामान्य नागरिकांकडून मोठी नाराजी व्यक्त केली जातेय. सोशल मीडिया अनेक विनोद आणि मिम्सही सध्या फिरत आहेत. आमदारांना मुंबईत कायमस्वरुपी घर मिळावं अशी मागणी शिवसेना आमदारांनी (Shivsena MLA) केली होती. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 24 मार्च रोजी विधानसभेत मुंबईत आमदारांसाठी आता 300 घरं बांधणार असल्याची घोषणा केली होती. महाविकास आघाडीचं सरकार केवळ बोलणार नाही तर करुन दाखवणार, असंही मुख्यमंत्री म्हणाले होते. दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या या घोषणेनंतर सर्वस्तरातून टीका होऊ लागल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनीही सरकारला फटकारलं आहे.
केवळ आमदारांसाठी गृहनिर्माण योजना नको. गृहनिर्माण योजनेतील घरांमध्ये आमदारांसाठी कोटा ठेवावा, हे योग्य आहे, असं शरद पवार म्हणाले. मात्र, आमदारांना घर देताना त्याची योग्य ती किंमत घेतली पाहिजे, असंही पवार यावेळी म्हणाले. इतकंच नाही तर शरद पवार राज्य सरकारच्या या निर्णयाबाबत पक्षातील मंत्र्यांशी चर्चाही करणार असल्याची माहिती मिळतेय. त्यामुळे शरद पवार यांनी आमदारांच्या घराच्या निर्णयावरुन सरकारला फटकारल्याची चर्चा सध्या सुरु आहे.
आमदारांना मोफत घरे नाहीच – आव्हाड
दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत आमदारांना घरं देण्याची घोषणा केल्यानंतर त्यावर जोरदार टीका सुरु झाली. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आमदारांना दिली जाणारी घरं मोफत नसल्याचं स्पष्ट केलं. आमदारांना देण्यात येणाऱ्या घरांवरून बराच गदारोळ होतोय. मी स्पष्ट करू इच्छितो की, सदर घरे मोफत देण्यात येणार नसून त्या जागेची किंमत, बांधकाम खर्च (अपेक्षित खर्च 70 लाख) याची किंमत संबंधित आमदारांकडून आकारण्यात येणार आहे, असं ट्विट जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे. त्यामुळे आमदारांना फुकटात घरे मिळणार नसल्याचं आव्हाड म्हणाले.
जितेंद्र आव्हाडांचं स्पष्टीकरण
आमदारांना देण्यात येणाऱ्या घरांवरून बराच गदारोळ होतोय.मी स्पष्ट करू इच्छितो की,सदर घरे मोफत देण्यात येणार नसून त्या जागेची किंमत+बांधकाम खर्च(अपेक्षित खर्च 70 लाख) याची किंमत संबंधित आमदारांकडून आकारण्यात येणार आहे.
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) March 25, 2022
भाजपचं म्हणणं काय?
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मीडियाशी संवाद साधताना सरकारच्या या निर्णयावर प्रतिक्रिया व्यक्त केली. मी आणि सदाभाऊ खोत सोडलं तर अनेकांकडे दोन दोन तीन तीन घरे आहेत. त्यामुळे आमदारांना घरे देण्याची गरज नाही. कुणी आमदार होण्यासाठी नारळ दिला नव्हता. या लोकांना रोज डिप्लोमसी करावी लागत आहे. कशाला हवं घर? असा सवाल पाटील यांनी केला.
इतर बातम्या :