Shiv Sena Dahi handi : दहीहंडीच्या निमित्ताने शिंदे गट आणि शिवसेनेची ठसन, शेरेबाजी आणि पोस्टरबाजीने वातावरण तापलं
Shiv Sena Dahi handi : तेजस ठाकरे राजकारणात कधी येतील त्यावर आता बोलू शकत नाही. त्यांना जेव्हा राजकारणात यायचं तेव्हा ते येतील. दिल्लीलाही प्रेरणादायी ठरेल असं नेतृत्व ठाकरे परिवारात आहे. तेजस जेव्हा राजकारणात येतील तेव्हा त्यांचं नेतृत्व राज्याला दिशा देणारे असेल.
ठाणे: राज्यात सर्वत्र दहीहंडीचा (Dahi handi) जल्लोष होत असतानाच या निमित्ताने शिवसेना (shivsena) आणि शिंदे गट आमने सामने आला आहे. दोन्ही गटाकडून मुंबईसह राज्यभरात दहीहंडीचं आयोजन करण्यात आलं आहे. या दहीहंडीच्या माध्यमातून दोन्ही गटाने एकमेकांना ठसन देण्यास सुरुवात केली आहे. दहीहंडीच्या ठिकाणी पोस्टर लावून एकमेकांच्या विरोधात शेरेबाजी करण्यात आली आहे. शिंदे गटाने पोस्टरबाजीतून शिवसेनेची काँग्रेस (congress) होऊ देणार नाही, हे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं विधान पोस्टरवर छापलं आहे. तर शिंदे गटाला प्रत्युत्तर म्हणून शिवसेनेने निष्ठेच्या दहीहंडीचं आयोजन करून शिंदे गटाला डिवचले आहे. आधीच वरळीतील जांबोरी मैदानावरून शिवसेना आणि भाजपमध्ये शाब्दिक चकमकी उडाल्या होत्या. भाजपने थेट वरळी मतदारसंघातून शिवसेनेला आव्हान देण्यासाठी दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले आहे. त्यामुळे शिवसेना-भाजपमध्ये जुंपलेली असतानाच आता दहीहंडीच्या माध्यमातून शिंदे गट आणि शिवसेनेत जुंपली आहे. त्यामुळे मुंबईसह राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे.
ठाण्यात होणार दहीहंडीच्या माध्यमातून शक्तीप्रदर्शन करण्यात आलं आहे. टेंबी नाका इथं एकनाथ शिंदे गटाची दहीहंडी तर जांभळी नाका इथं खासदार राजन विचारे यांची उद्धव ठाकरे गटाची दहीहंडी पार पडत आहे.शक्ती प्रदर्शनाच्या माध्यमातून उद्धव ठाकरे आणि शिंदे गट ठाण्यातल्या दहीहंडीवर वर्चस्व दाखवायचा प्रयत्न केला आहे. विचारे यांच्या दहीहंडीच्या स्टेजवर उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचा फोटो लावण्यात आला आहे. या दोन्ही दहीहंडीला तुफान गर्दी झालेली आहे. ठाण्यात आपलीच ताकद असल्याचं या दोन्ही गटाकडून दाखवण्याचा जोरदार प्रयत्न सुरू आहे.
ठाण्यात निष्ठेचा थर
ठाण्यात दहीहंडीसाठी आदित्य ठाकरे हजेरी लावणार आहेत. राजन विचारे समर्थकांनी दहीहंडी परिसरात पोस्टर लावले आहेत. निष्ठेचा थर…बॅनरच्या माध्यमातून शक्ती प्रदर्शन…असं या पोस्टरवर लिहिलं आहे.
शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही
टेंबी नाका येथील दहीहंडीला यावर्षी खास महत्व आहे. कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वतीने धर्मवीर आनंद दिघे यांनी सुरू केलेल्या दहीहंडीचं आयोजन या वर्षी देखील करण्यात आले आहेय मात्र या वर्षी पोस्टरवरीलचे चेहरे बदलले आहेत. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पोस्टरसह, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांचे फोटो या पोस्टरवर आहेत. मी शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही, बाळासाहेब ठाकरे यांनी व्यक्त केलेले विचार देखील या पोस्टरवर लिहिण्यात आले आहेत. शिंदे गटाकडून एकप्रकारे शिवसेनेला डिवचण्याचा हा प्रयत्न केला आहे.
युवा शक्ती तेजस ठाकरे
शिवसेना नेते पांडूरंग सकपाळ यांनीही दक्षिण मुंबईत दहीहंडीचं आयोजन केलं आहे. सकपाळ यांनी निष्ठावंतांची दही हंडी आयोजित केली आहे. त्यासाठी तीन लाख रुपयांचे बक्षीस लावण्यात आलं आहे. यावेळी सकपाळ यांनी जोरदार पोस्टर बाजी केली आहे. या पोस्टरवर तेजस ठाकरे यांचा फोटो छापण्यात आला आहे. युवा शक्ती तेजस ठाकरे असं या पोस्टरवर लिहिण्यात आलं आहे. त्यामुळे दहीहंडीच्या माध्यामातून तेजस ठाकरे यांचं राजकीय लॉन्चिंग सुरू आहे का? अशी चर्चा सुरू झाली आहे.
तेजस ठाकरे राजकारणात कधी येतील त्यावर आता बोलू शकत नाही. त्यांना जेव्हा राजकारणात यायचं तेव्हा ते येतील. दिल्लीलाही प्रेरणादायी ठरेल असं नेतृत्व ठाकरे परिवारात आहे. तेजस जेव्हा राजकारणात येतील तेव्हा त्यांचं नेतृत्व राज्याला दिशा देणारे असेल, असं पांडूरंग सकपाळ यांनी सांगितलं. या दहीहंडीच्या ठिकाणी ‘शिवसैनिक आणि ठाकरे म्हणजेच शिवसेना’ असे पोस्टर लावण्यात आले आहेत.