उद्धव ठाकरे सरकार शेतकरी हिताचे निर्णय घेण्यास विलंब करायचे; शिंदे गटाच्या ‘या’ नेत्याचा पुन्हा निशाणा
शिंदे गटाच्या नेत्यांकडून उद्धव ठाकरे यांच्यावर टीका सुरूच आहे. आता आणखी एका नेत्याने उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप केला आहे.
मुंबई : शिंदे गटाच्या नेत्यांकडून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर टीका सुरूच आहे. आतापर्यंत अनेक गंभीर आरोप शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केले आहेत. आता पुन्हा एकदा असाच एक आरोप शिंदे गटाचे आमदार चिमणराव पाटील (Chimanrao Patil) यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केला आहे. उद्धव ठाकरे हे शेतकऱ्यांच्या (farmers) हिताचे निर्णय घेण्यास विलंब करायचे असं चिमणराव पाटील यांनी म्हटलं आहे. उद्धव ठाकरे सरकारमध्ये एकप्रकारचा सुस्तपणा होता अशी टीका चिमणराव पाटील यांनी केली आहे.
नेमकं चिमणराव पाटील यांनी काय म्हटलं?
शिंदे गटाचे आमदार चिमणराव पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार घणाघात केला आहे. उद्धव ठाकरे हे शेतकरी हिताचे निर्णय घेण्यातही विलंब करायचे असे चिमणराव पाटील यांनी म्हटलं आहे. ठाकरे सरकारमध्ये सुस्तपणा होता. आम्ही त्यांना म्हणायचो शेतकरी हिताचे पारदर्शी निर्णय लवकरात लवकर घ्या पण ते निर्णय घेताणा मागे, पुढे पहायचे असं पाटील यांनी म्हटलं आहे.
मात्र त्यांनी यावेळी नव्या सरकारचं कौतुक केलं आहे. शिंदे सरकार आल्यापासून प्रशासनात गतिमानता आली. एकनाथ शिंदे यांनी निर्णयाला गती दिल्याचं चिमणराव पाटील यांनी म्हटलं आहे.
अब्दुल सत्तार यांची टीका
दुसरीकडे शिंदे गटाचे आणखी एक आमदार आणि मंत्री अब्दुल सत्तार यांनी शुक्रवारी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला होता. आता उद्धव ठाकरे यांचा धाक उरला नसल्याची टीका त्यांनी केली होती. उद्धव ठाकरे यांचा धाक असता तर चाळीस आमदार पक्ष सोडून गेलेच नसते. उद्धव ठाकरे यांचा धाक असता तर लाखो कार्यकर्त्यांनी पक्ष सोडला नसता अशी टीका अब्दुल सत्तार यांनी केली आहे.