शिवसेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; दसरा मेळाव्यापूर्वी उद्धव ठाकरेंना बसणार जबरदस्त झटका?
शिवसेना पक्षातून मोठ्या प्रमाणात गळती सुरु झाली आहे.
पंढरपूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Chief Minister Eknath Shinde) यांच्या बंडखोरीमुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळले. यानंतर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांनी रातोरात मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. यानंतर राज्यात शिवसेना विरुद्ध शिंदे गटाची शिवसेना यांच्यातील वाद थेट कोर्टात गेला आहे. त्यातच आता दसरा मेळाव्याच्या निमित्ताने दोन्ही गट आमने सामने आले असताना पंढरपूरमध्ये शिवसेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. दसरा मेळाव्यापूर्वी उद्धव ठाकरेंना जबरदस्त झटका बसणार आहे.
पंढरपूरच्या शिवसेना बैठकीपूर्वी अभूतपूर्व गोंधळ पहायला मिळाला आहे. संपर्क प्रमुखांसमोरच शिवसेनेतील गटबाजी उघड झाली आहे.
शिवसेनेच्या संतप्त पदाधिकारी यांच्याकडून संपर्कप्रमुखांची बैठक उधळून लावण्याच प्रयत्न झाला. पंढरपूर शहरप्रमुख, उपजिल्हाप्रमुख यांच्यासह 16 पदाधिकारी सामुहिक राजीनामे देण्याच्या तयारीत असल्याचे समजते.
जिल्हप्रमुख संभाजी शिंदे यांच्या गटबाजीस कंटाळून सेनेचे पदाधिकारी उद्विग्न झाले आहेत. शेकडो कार्यकर्त्यांसह प्रमुख पदाधिकारि शिवसेनेला जय महाराष्ट्र करणार असल्याचे समजते.
शिवसेना संपर्कप्रमुख अनिल कोकीळ यांना शिवसैनिकांनी घेराव घातला. गटबाजी विरुद्ध शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली.
एकीकडे युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरे महाराष्ट्रभर फिरुन शिवसंवाद यात्रा घेत आहेत. तर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे देखील कार्यकर्त्यांशी संपर्क साधत आहेत. तर दुसरीकडे शिवसेना पक्षातून मोठ्या प्रमाणात गळती सुरु झाली आहे.
नुकतचं नवी मुंबईतील राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष अशोक गावडे यांनी शिंदे गटात प्रवेश केला. अशोक गावडे पवारांच्या जवळचे होते. त्यांची मुलगी राष्ट्रवादीची माजी नगरसेविका स्वप्ना गावडे यांनी देखील शिंदे गटात प्रवेश केला. त्यामुळे राष्ट्रवादीला नवी मुंबईत मोठा धक्का बसला आहे.
दरम्यान एकनाथ शिंदे यांना मिळणारा पाठिंबा वाढत आहे. 40 पेक्षा अधिक आमदार, 12 खासदार शिंदे गटात सामील झाले. यांच्या पाठोपाठ महाराष्ट्रातील विविध महापालिका, नगर परिषद, ग्राम पंचायत तसेच शिवसेनेचे दिग्गज नेते शिंदे गटात सामील होत आहेत. इतकंच नाही तर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचे सख्खे पुतणे निहार ठाकरे यांनी देखील एकनाथ शिंदेना पाठिंबा दिला आहे.