कारवाई झाली तरी बेहत्तर, प्रमोद जठारच आमचे उमेदवार: भाजप कार्यकर्ते
सिंधुदुर्ग: शिवसेना- भाजपची युती झाली असली, तरी जिल्ह्याजिल्ह्यातील खदखद बाहेर येत आहे. कोकणात तर भाजप नेते प्रमोद जठार यांच्या कार्यकर्त्यांनी टोकाची भूमिका घेतली आहे. नाणार प्रकल्पासाठी लोकसभेची निवडणूक प्रमोद जठार यांनी लढवावी, युतीने शिवसेनेचा उमेदवार दिला, तरी अपक्ष निवडणूक लढवावी, असा एकमुखी ठराव कणकवली तालुका भाजपा कार्यकारिणीने केला. हा ठराव मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात येणार आहे. सध्या […]
सिंधुदुर्ग: शिवसेना- भाजपची युती झाली असली, तरी जिल्ह्याजिल्ह्यातील खदखद बाहेर येत आहे. कोकणात तर भाजप नेते प्रमोद जठार यांच्या कार्यकर्त्यांनी टोकाची भूमिका घेतली आहे. नाणार प्रकल्पासाठी लोकसभेची निवडणूक प्रमोद जठार यांनी लढवावी, युतीने शिवसेनेचा उमेदवार दिला, तरी अपक्ष निवडणूक लढवावी, असा एकमुखी ठराव कणकवली तालुका भाजपा कार्यकारिणीने केला. हा ठराव मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात येणार आहे.
सध्या रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे विनायक राऊत हे विद्यमान खासदार आहेत.
मात्र युतीने विनायक राऊत हेच उमेदवार 2019 मध्येही लादले तर भाजपाचा एकही कार्यकर्ता कारवाई झाली तरी काम करणार नाही, असा निर्धार या बैठकीत करण्यात आला.
इतकंच नाही तर प्रमोद जठार यांच्या प्रचाराला आजपासून सुरुवात करण्यात येणार आहे. भाजपा कार्यकर्त्यांच्या भूमिकेमुळे संभाव्य उमेदवार आणि विद्यमान खासदार विनायक राऊत यांच्या अडचणीत वाढण्याच्या शक्यता आहे.
वाचा – स्पेशल रिपोर्ट: 1 युती आणि 100 सवाल!
कोण आहेत प्रमोद जठार?
प्रमोद जठार हे भाजपचे माजी आमदार आणि रत्नागिरी-सिंधुदुर्गातील महत्त्वाचे नेते आहेत. मुंबईतील रुपारेल महाविद्यालयाचे विद्यार्थी असलेल्या प्रमोद जठार यांनी भाजपमध्ये सक्रीय सहभाग घेत, पुढे सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीत भाजपच्या वाढीसाठी प्रयत्न केला. कोकणपट्ट्यात भाजपची जी काही पक्षीय वाढ झाली, त्यात प्रमोद जठार यांचा वाटा मोठा मानला जातो.
प्रमोद जठार यांनी 2009 मध्ये विधानसभा निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांनी विजय मिळवला. मात्र 2014 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. कणकवली मतदारसंघात नितेश राणे यांनी 2014 मध्ये प्रमोद जठार यांचा पराभव केला होता.
वाचा – राणेंचा पवारांना प्रस्ताव, रायगडमध्ये तटकरेंना मदत करतो, त्याबदल्यात…..
2014 च्या लोकसभा निवडणुकीत काय झालं?
लोकसभेच्या 2014 च्या निवडणुकीत रत्नागिरी लोकसभा मतदारसंघात काँग्रेसकडून निलेश राणे आणि शिवसेनेकडून विनायक राऊत यांच्यात लढत झाली होती. त्यावेळी विनायक राऊत यांनी तत्कालिन खासदार निलेश राणे यांचा पराभव केला होता.
विधानसभा मतदारसंघांची रचना
रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघाची रचना पाहिली तर रत्नागिरी, चिपळूण, राजापूर हे रत्नागिरी जिल्ह्यातील तर सिंधुदुर्गातील कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडी हे विधासभा मतदारसंघ येतात. रत्नागिरी, चिपळूण, राजापूर, कुडाळ आणि सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे आमदार आहेत. तर कणकवली मतदारसंघात काँग्रेसकडून नितेश राणे निवडून गेलेत.
संबंधित बातम्या
रत्नागिरी : प्रमोद जठार आणि विनायक राऊतांच्या ‘गळाभेटी’मागील रहस्य काय?
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा : निलेश राणे, विनायक राऊत, की सुरेश प्रभू?