मुंबई : शिवेसेनेला (Shiv Sena) धक्क्यावर धक्के बसतच आहेत. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड केल्यानंतर त्यांना शिवसेनेतील आमदारांच्या एका मोठ्या गटाचा पाठिंबा मिळाला होता. या आमदारांच्या पाठिंब्यावरच एकनाथ शिंदे यांनी सत्ता स्थापनेचा दावा केला आणि बहुमताची चाचणी जिंकली सुद्धा. दरम्यान एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाल्यानंतर आता विविध शहरांच्या महापालिकेतील नगरसेवक आणि शिवसेनेचे पदाधिकारी देखील शिंदे गटात सामील होत आहेत. काही दिवसांपूर्वीच ठाण्यातील जवळपास सर्वच माजी नगरसेवक शिंदे गटात सामील झाले होते. त्यानंतर आता भिवंडीतही (Bhiwandi) शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. भिवंडी महापालिकेतील शिवसेना नगरसेवकांनी एकनाथ शिंदे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन शिंदे गटाला पाठिंबा जाहीर केला आहे. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत माहिती दिली आहे.
याबाबत माहिती देण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी एक ट्विट केलं आहे. ‘ठाणे जिल्ह्यातील भिवंडी महानगरपालिका तसेच ठाणे ग्रामीण विभागातील शिवसेना नगरसेवक तसेच पदाधिकाऱ्यांनी नंदनवन या शासकीय निवासस्थानी भेट घेऊन युती सरकारला जाहीर पाठींबा दिला’ असं एकनाथ शिंदे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. हा शिवसेनेसाठी मोठा धक्का मानण्यात येत आहे. भिवंडीमधील शिवसेना नगरसेवक आणि पदाधिकारी हे शिंदे गटात सामील झाल्याने भिवंडीमध्ये शिवसेनेत मोठी पोकळी निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे गुरुवारी सकाळी आदित्य ठाकरे यांचा भिवंडीत मेळावा पार पडला होता. यावेळी त्यांनी शिंदे गटावर सडकून टीका केली होती. मात्र त्यानंतर गुरुवारी रात्रीच भिवंडीमधील नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेत त्यांना पाठिंबा जाहीर केला आहे.
ठाणे जिल्ह्यातील भिवंडी महानगरपालिका तसेच ठाणे ग्रामीण विभागातील शिवसेना नगरसेवक तसेच पदाधिकाऱ्यांनी नंदनवन या शासकीय निवासस्थानी भेट घेऊन युती सरकारला जाहीर पाठींबा दर्शविला.#realshivsena pic.twitter.com/kIjMETN4yO
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) July 21, 2022
गुरुवारी भिवंडीमधील नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी एकनाथ शिंदे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन त्यांना पाठिंबा दिला. त्यापूर्वी ठाणे महापालिकेत एक माजी नगरसेवक सोडता सर्वच माजी नगरसेवक हे शिंदे गटात सहभागी झाले आहेत. तीच स्थिती नवी मुंबईमध्ये देखील आहे. नवी मुंबईमधील अनेक शिवसेना पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटाला पाठिंबा दिला आहे. कोकणामधील आजी, माजी नगरसेवक देखील शिंदे गटात सामील होत असल्याने शिवसेनेला लागलेली ही गळती रोखण्याचे मोठे आव्हान आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमोर असणार आहे.