उस्मानाबाद: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केल्याबद्दल सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे अडचणीत आले आहेत. त्यांच्या या वक्तव्याचे शिवसेनेतून तीव्र पडसाद उमटू लागले आहेत. भरणे मामा, तुम्ही औकातीत राहा. हिंमत असेल तर उजनीची बाँड्री ओलांडून दाखवाच, असा दमच शिवसेनेचे उपनेते, आमदार डॉ. तानाजीराव सावंत यांनी दिला भरणे यांना दिला आहे. तर, भरणे यांना जिल्ह्यात फिरू देणार नाही, असा इशारा सोलापूरचे शिवसेना जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे यांनी दिला आहे. (shiv sena leader slams Dattatray Bharne controversial statement about CM Uddhav Thackeray)
आज देशाच्या 75 व्या स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर सोलापुरात भरणे यांच्या उपस्थितीत अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना पालकमंत्र्यांनी हे बेताल वक्तव्य केले. या वक्तव्याची व्हिडीओ क्लिप जिल्ह्यात सोशल मीडियावर फिरू लागताच जिल्हा शिवसेनेत संतापाची लाट उसळली असून शिवसेना जिल्हा प्रमख संभाजी शिंदे हे आक्रमक झाले आहेत. यापुढे पालकमंत्र्यांना जिल्ह्यात फिरू देणार नाही असा इशारा त्यांनी दिल्यामुळे आता राष्ट्रवादी कॉग्रेसचे राज्यातील वरिष्ठ नेते याबाबत काय भुमीका घेतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आमचे दैवत आहेत. त्यांच्याबाबत पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी काढलेले उद्गार निषेधार्ह आहे. अशा बेताल वक्तव्य करणाऱ्या पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांना सोलापुरात फिरू देणार नाही, असा इशारा शिवसेनेचे पंढरपुर विभाग जिल्हा प्रमुख संभाजी शिंदे यांनी दिला आहे.
पालकमंत्री भरणे मामा तुम्ही तुमच्या औकातीत राहा व शब्द नीट वापरा. आम्ही बाळासाहेब ठाकरे व उद्धव ठाकरे यांचे शिवसैनिक आहोत. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या जीवावर तुम्ही सत्तेवर आला आहात. तुम्हाला तर जनतेने फेकून दिले होते. उद्धव ठाकरे यांच्या आशीर्वादने तुम्ही सत्तेत आहात हे कधीच विसरू नका. तुम्ही मुख्यमंत्र्यांविरोधात अशी करता, सत्तेत असूनही मरू द्या मुख्यमंत्र्यांना अशी भाषा वापरता. तुम्ही तुमच्या औकातीत राहून शब्द नीट वापरा. तुमच्यात हिंमत असेल व तुम्हाला आमच्या शिवबंधनाची ताकद पाहायची असेल तर सोलापूर जिल्ह्याची हद्द उजनी धरण ओलांडून दाखवा. आम्ही एका क्षणात काय ते दाखवू, असा दम आमदार सावंत यांनी दिला आहे.
फक्त पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आदेश आहे आणि राज्यात महाविकास आघाडी आहे म्हणून त्याला तडा जाईल असे वक्तव्य कोणत्याही शिवसैनिक व पदाधिकाऱ्यांनी करायचे नाही, या एका बंधनात राहून आम्ही खाली मान घालून गप्प बसलोय. याचा अर्थ असा नाही की तुम्ही आमच्या छाताडावर बसून कोणत्याही पद्धतीने नाचावे व आमच्या पक्षप्रमुखाविरोधात गलिच्छ भाषा वापरावी. तुमच्या या वक्तव्याबद्दल योग्य वेळी योग्य ती शिक्षा दिल्या शिवाय हा शिवसैनिक शांत राहणार नाही. हिंमत असेल तर सोलापूरची हद्द ओलांडून दाखवाच, असे आव्हानच त्यांनी दिले. त्यामुळे महाविकास आघाडीतील वाद शिगेला पोहोचण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (shiv sena leader slams Dattatray Bharne controversial statement about CM Uddhav Thackeray)
संबंधित बातम्या:
दुर्लक्ष केल्याचा राग, विवाहित तरुणाने एक्स गर्लफ्रेण्डचा गळा चिरला
(shiv sena leader slams Dattatray Bharne controversial statement about CM Uddhav Thackeray)