पुणे : शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या ‘सिल्व्हर ओक’ निवासस्थानी जाऊन भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतही होते. तसेच शरद पवार यांच्यासोबत खासदार सुप्रिया सुळे यांचीदेखील भेट झाली. या चारही नेत्यांमध्ये जवळपास सव्वा तास बैठक झाली. या बैठकीत महाविकास आघाडीतील मतभेद दूर सारण्याबद्दल चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. एकीकडे या भेटीगाठींमधून महाविकास आघाडीची वज्रमुठ घट्ट असल्याचा मेसेज देण्याचा प्रयत्न एकीकडे होत असताना शिवसेनेकडून टीका करण्यात आली आहे. ठाकरे-पवार यांच्या बैठकीनंतर राज्याचे उत्पादन शुल्क विभाग मंत्री शंभूराज देसाई यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली केली.
“उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यात बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा वगैरे यावर भाष्य केले. उद्धव ठाकरे ‘सिल्व्हर ओक’वर दाखल झालेय. आजपर्यंत ‘मातोश्री’चा इतिहास महाराष्ट्राने पहिला. कसलीही राजकीय खलबत असो किंवा राजकीय चर्चा, ते सर्व ‘मातोश्री’वर जात होते. ते सगळा वारसा गुंढाळून ठेवून सिल्व्हर ओकवर दाखल झाले. हे पाहून शिवसैनिकांना वेदना झाल्या. सिल्व्हर ओकवर काका मला वाचवा असं म्हणायला तर गेले नाही ना?”, असा सवाल करत शंभूराज देसाई यांनी खोचक शब्दांत टीका केली.
“उद्धव ठाकरे यांचा रिमोट कंट्रोल सिल्व्हर ओकवर होता. सत्तेसाठी रिमोट दुसऱ्याकडे दिला. उद्धव ठाकरे यांची ‘सिल्व्हर ओक’वारी उलगडली आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्याचा रिमोट कंट्रोल सिल्व्हर ओक आहे, हे कळतंय. एकीकडे ठाकरे घराने स्वतःकडे रिमोट कंट्रोल ठेवला. पण आता हा रिमोट कंट्रोल सिल्व्हर ओकवर आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि संजय राऊत, उद्धव ठाकरे यांची शिवसेना संपली”, असा घणाघात त्यांनी केला.
यावेळी भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी बाबरी मशिदीबद्दल केलेल्या दाव्यावर प्रत्युत्तर दिलं. “आम्ही आजही ठाम आहोत. बाबरी पतना वेळी शिवसैनिक होते. चंद्रकांत पाटील यांच्याकडे अपुरी माहिती आहे”, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. दरम्यान, आपण अयोध्येत पक्षाच्या माध्यमातून गेलो होतो. आमदार धार्मिक स्थळवर जाण्यासाठी खर्च करू शकतात, असं देसाई म्हणाले. तसेच “स्वतः बरोबर असले की चांगले. सोडून गेले तर वाईट. दोघांना सवय आहे लोकांचा वापर करून घ्यायचा”, अशी टीका त्यांनी यावेळी केली.