आमदार अपात्रतेच्या प्रकरणात नवा ट्विस्ट, शिंदे गटाच्या वकिलांनी थेट 2022ची नोंदवही दाखवली
शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणी आज पार पडलेल्या सुनावणीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ईमेल आयडीवरुन दोन्ही बाजूने चांगलाच युक्तिवाद करण्यात आला. शिंदे आणि ठाकरे गटाचे वकील या मुद्द्यावरुन आमनेसामने आले. अखेर विधानसभा अध्यक्षांना मध्यस्थी करावी लागली. त्यांनी ठाकरे गटाची मागणी मान्य केली. या प्रकरणाची पुढची सुनावणी उद्या सकाळी 11 वाजता होणार आहे. उद्याची सुनावणीदेखील महत्त्वाची ठरणार आहे.
विनायक डावरुंग, Tv9 मराठी, 1 डिसेंबर 2023 : आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर आज अतिशय महत्त्वाची सुनावणी पार पडली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा खरा ईमेल आयडी कोणता? या मुद्द्यावरुन आज पुन्हा युक्तिवाद झाला. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी महाराष्ट्र विधानसभेची 2022 ची नोंदवही सादर केली. त्यांनी ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांची फेरसाक्ष नोंदवत असताना त्यांना नोंदवहीतील एकनाथ शिंदे यांचा ईमेल आयडी वाचवून दाखवण्याची मागणी केली. यावेळी ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांनी 2023 च्या सुद्धा नोंदवहीमधील ईमेल आयडी रेकॉर्डवर घेण्याची विनंती केली. पण त्यावर शिंदे गटाच्या वकिलांनी आक्षेप घेतला. यावेळी दोन्ही गटाच्या वकिलांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. अखेर विधानसभा अध्यक्षांनी ठाकरे गटाची मागणी मान्य केली.
नेमका सवाल-जवाब काय?
देवदत्त कामत – पॅरा ७ चे वाचन देवदत्त कामत यांच्याकडून करण्यात आलं. मी वेळ वाचविण्यासाठी मी माझी याचिका फक्त रेकॉर्डवर ठेवण्याची विनंती करत आहे
अध्यक्ष नार्वेकर – अवकाळी पावसाचा मुद्दा, शेतकऱ्यांचे प्रश्न, आरक्षणासारखा महत्त्वाचा प्रश्न आहे. अधिवेशन माझी प्राथमिकता असूनही मी सुनावणीला वेळ देत आहे. तुम्ही सुद्धा सुनावणीत युक्तिवादाला कात्री लावून सुनावणी घेत आहात. त्यामुळे युक्तिवादाला आणखी 4 दिवस देणे अशक्य आहे. 22 तारखेपर्यंत वेळ दिलेला आहे. त्यामुळे 26 तारखेपर्यंत सुनावणी घेणे अशक्य आहे. आपण सगळ्यांनी मिळून ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करायला हवी. ठरलेल्या याचिका व्यतिरिक्त कोणतीही याचिका दाखल करुन घेतल्यास वेळेच निर्बंध पाळता येणार नाही. त्यामुळे ठरलेल्या वेळापत्रकानुसार सुनावणी पार पडू द्या.
जेठमलानी – ४ एप्रिल २०१८च्या कथित पत्रातील शिवसेनेच्या घटनेतील दुरुस्ती कधीही निवडणूक आयोगासमोर सादर करण्यात आली नव्हती?
प्रभु – हे खोटे आहे
जेठमलानी – शिवसेना पक्षाच्या घटनेत २०१८ साली दुरुस्ती केली, त्याला अपात्रता याचिका कार्यवाहीसाठीच नव्हे तर इतर सर्व प्रयोजनासाठी प्रतिवादी आमदारांनी आव्हान दिले आहे.
प्रभु – हे खोटे आहे.
जेठमलानी – तुमच्या प्रतिज्ञापत्रातील १२ ते २० परिच्छेदात आपल्या साक्षीनुसार वर्णन केलेली शिवसेनेची संघटनात्मक बांधणी ही घटनाबाह्य ठरते.
प्रभु – हे खोटे आहे.
जेठमलानी – उद्धव ठाकरे ज्या समुहाचे नेतृत्व करतात, तो समुह हा अपात्रता याचिकेसह इतर प्रयोजनार्थ सुद्धा तो शिवसेनेचे प्रतिनिधित्व करत नाही.
प्रभु – हे खोटे आहे
जेठमलानी – एकनाथ शिंदे यांना शिवसेनेचा संघटनेचा अतिशय मोठा पाठिंबा होता आणि हा पाठिंबा नष्ट व्हावा त्यामुळे २०१८ साली कथित दुरुस्ती घडवून आणली
सुनील प्रभू – खोटे आहे
जेठमलानी – २५ जून २०२२ ला संघटनेत बदल घडवून आणले. हे झालं तेव्हा उद्धव ठाकरे आणि अनिल देसाई यांना जाणवलं की, याचा उपयोग झाला नाही
सुनील प्रभू – खोटे आहे
जेठमलानी – उद्धव ठाकरे ज्या समूहाचा नेतृत्व करतात तो समूह आपत्रता कारवाई किंवा इतर कुठल्याही कारवाईसाठी शिवसेनेचा प्रतिनिधित्व करू शकत नाही
प्रभू – हे खोट आहे
जेठमलानी – एकनाथ शिंदे यांना शिवसेना संघटनेचा मोठा पाठींबा होता आणि त्यामुळेच 2018 साली कथित घटना दुरुस्ती शिवसेना घटनेत करण्यात आली?
प्रभू – हे खोटं आहे
जेठमलानी – 25 जून 2022 राष्ट्रीय कार्यकारणी बैठकीत जे संघटनात्मक बदल करण्यात आले तसा बदल करण्याची घटना परवानगी देत नाही?
प्रभू – हे खोटं आहे
जेठमलानी – 25 जून 2022 शिवसेनाच्या पक्षात संघटनात्मक बदल यासाठी करण्यात आले जेव्हा उद्धव ठाकरे आणि अनिल देसाई यांना हे समजले की कथित 2018 सालच्या घटना दुरुस्तीचा काहीच फायदा नाही ?
प्रभू – खोट आहे
जेठमलानी – नॅशनल एक्झिक्युटिव्ह हा शब्द कोणत्या अन्वयार्थाने वापरला आहे? त्याचा मराठी अर्थ काय आहे?
प्रभू – ऑन रेकॉर्ड आहे
जेठमलानी – शिवसेनेच्या कोणत्या घटनेमध्ये नॅशनल एक्झिक्युटिव्ह शब्द वापरला आहे? त्याचा मराठी अर्थ काय?
प्रभू – ऑन रेकॉर्ड आहे
अध्यक्ष नार्वेकर – रेकॉर्ड हे खूप मोठे आहे, तुम्हाला त्याचे थेट उत्तर द्यावे लागेल. तुम्हाला अर्थ माहिती नसेल तर तसे सांगा.
जेठमलानी – आम्ही तुमच्यासाठी एवढे मराठीचे इंग्रजीत भाषांतर करत आहोत, तर तुम्ही थोडे इंग्रजीचे मराठीत भाषांतर करा.
प्रभू – प्रतिनिधी सभा. मला काहीही खोटे सांगायचे नाही. चुकीचं जायला नको, म्हणून मी रेकॉर्डवर आहे असं सांगितलं.
जेठमलानी – राष्ट्रीय कार्यकारिणीत किती सदस्य असतात?
प्रभू – माझ्या मते 175 ते 180
जेठमलानी – महाराष्ट्र विधानसभेने सदस्यांचा परिचय प्रसिद्ध केला आहे. मी आपल्याला २०२२ सालातील १४व्या महाराष्ट्र विधानसभेची नोंदवही दाखवू इच्छितो. ही नोंदवही महाराष्ट्र विधानसभेने प्रसिद्ध केलेली आहे. ही सद्य स्थितीत एकमेव नोंदवही आहे, ज्यात २२ व २३ जून २०२२ रोजी विधानसभेने सदस्यांचा पत्ता व ईमेल पत्ता नोंद केलेला आहे. त्यातील एकनाथ शिंदे यांचा ईमेल पत्ता पाहावा आणि तो अध्यक्षांना वाचून दाखवावा.
प्रभू – Ministereknathshinde@gmail.com
जेठमलानी – 22 जून आणि 23 जून ची नोटीस एकनाथ शिंदे यांना ज्या ईमेल आयडीवर पाठवली तो इमेल आयडी एकनाथ शिंदे यांचा नव्हताच
(पुस्तिकेनुसार एकनाथ शिंदे यांचा ईमेल आयडी ministereknathshinde@gamil .com तर ठाकरे गटाकडून ज्या ईमेलवर ईमेल लेटर पाठविण्यात आले तो ईमेल आयडी विधिमंडळ पक्ष कार्यालयातील माहितीनुसार eknath.shinde@gmail.com याच ईमेलवर पाठविण्यात आला असल्याचं म्हणणं आहे)
जेठमलानी – पी-११ मध्ये जो ईमेल काल सादर केला आहे तो चुकीचा आहे. कारण २२ जून २०२२ मध्ये एकनाथ शिंदे यांचा हा मेल आयडी नव्हता
सुनील प्रभू – खोटे आहे
(नोंदवहीच्या मुद्द्यावर ठाकरे गट आक्रमक)
सुनील प्रभू – २०२३ सालची नोंदवही रेकॉर्डवर घ्यावी
(जेठमलानी यांचा विरोध)
जेठमलानी – २०२३ सालच्या नोंदवहीचा २०२२ सालातील घटनेशी संबंध काय?
विधानसभा अध्यक्ष यांनी आक्षेप नोंदवत ठाकरे गटाचा मुद्दा ग्राह्य धरला
अध्यक्ष – २०२३सालातील मुद्दा ही रेकॉर्डवर घेण्याचे मान्य केले
(२२ जून २०२२ साली एकनाथ शिंदे यांना पाठवलेली नोटीस चुकीच्या मेल आयडीवर पाठवल्याचा युक्तिवाद याआधी शिंदे गटाच्या वकिलांनी केला होता. त्याला अनुसरून जेठमलानी यांनी विधानसभेची नोंदवहीवर वेगळा मेल आयडी असल्याचा मुद्दा मांडला. परिणामी ठाकरे गटाने यावर्षी २०२३ मध्ये प्रकाशित झालेला मेल आयडी सादर करण्याचा प्रयत्न केला. त्यास जेठमलानी यांनी आक्षेप घेतला. २०२३ सालातील मेल आयडी हा २०२२ सालातील घटनेशी जोडू नये, अशी जेठमलानी यांची मागणी होती. परिणामी ठाकरे गटाचा मेल पाठवल्याचा दावा खोडण्यात जेठमलानी यशस्वी होताना दिसत आहेत)
जेठमलानी – आपल्या प्रतिज्ञापत्रात उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना ३० जून २०२१ रोजी पाठवलेल्या पत्राचा उल्लेख केला आहे. तसेच त्यात त्यांनी पक्ष विरोधी कारवायात भाग घेत आहात आणि आपण पक्ष सोडल्याचे नमूद केले आहे. हे खोटे आहे?
प्रभू – हे खोटे आहे
जेठमलानी -तुम्ही या ओळीशी सहमत आहात का?
प्रभू – हो सहमत आहे.
कामत – तुम्ही एकनाथ शिंदे यांचा ईमेल चुकीचा आहे म्हणू शकत नाही. तुम्ही सगळे बनावट आहे असं बोलणे चुकीचे आहे. साक्ष नोंदविण्यासाठी ज्यांनी मेल पाठवला आहे ते विजय जोशी यांची उलट तपासणीमध्ये हे प्रश्न विचारले. त्यांचा ईमेल चेक करा. ते दाखवतील मेल कधी कसा पाठवला ते दाखवतील.
जेठमलानी – तुम्ही तुमच्या सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार एकनाथ शिंदे यांना उद्धव ठाकरे यांनी 30 जून 2022 पत्र लिहून त्यामध्ये शिंदे हे पक्षविरोधी कारवाईमध्ये भाग घेत आहेत आणि आपण पक्षाच्या पदाचा त्याग केला आहे या स्टेटमेंटशी तुम्ही सहमत आहेत का ?
प्रभू – हे बरोबर आहे
जेठमलानी – या पत्रानुसार 22 जून 2022 रोजीच एकनाथ शिंदेंसह प्रतिवादी आमदारांनी जर पक्षाच्या पदाचा त्याग केला असं म्हणत असतील तर त्यांना व्हीप लागू होत नाही?
प्रभू – हे खोटं आहे
कामत – जर अध्यक्ष यांनी प्रतिवादी आमदारांच्या …
जेठमलानी – 2 जुलै 2022 रोजी तुम्ही व्हीप दिला आहे तो प्रतिवादी आमदार हे तुमचे सदस्य होते म्हणून दिला होता का ?
प्रभू – हो, हे रेकॉर्डवर आहे