शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनी घेतले कामाख्या देवीचे दर्शन, ‘अंबुबाची’ महोत्सवातही झाले सहभागी; सर्बानंद सोनोवाल यांचा दावा
शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनी गुवाहाटीमध्ये कामाख्या मंदिराला भेट दिली. ते कामाख्या मंदिरात सुरु असलेल्या अंबुबाची महोत्सवात देखील सहभागी झाले, असा दावा मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी केला आहे.
गुवाहाटी : शिवसेनेमधील बंडखोर आमदारांची संख्या वाढतच आहे. शिवसेनेतील एकूण 41 आमदारांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना पाठिंबा दिला आहे. तर आणखी सात अपक्ष आमदार देखील एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी झाले आहेत. आज सकाळीच तीन आमदार आसामच्या गुवाहाटीमध्ये (Guwahati) दाखल झाले. या सर्व आमदारांना गुवाहाटीमधील एका हॉटेलमध्ये ठेवण्यात आले आहे. हॉटेलभोवती चोखबंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दरम्यान कालपासून आसाममध्ये कामाख्या देवीच्या अंबुबाची महोत्सवाला (Assam Ambubachi Mela) सुरुवात झाली आहे. हा महोत्सव जगप्रसिद्ध आहे. या महोत्सवात सहभागी होण्यासाठी जगभरातून भाविक येत असतात. शिवसेनेच्या या बंडोखोर आमदारांनी देखील अंबुबाची महोत्सवाला भेट दिल्याचा दावा आयुष मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी केला आहे. ते आसाममधील पुरग्रस्त भागाचा पहाणी दौरा करत आहेत. यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी आमदारांनी अंबुबाची महोत्सवाला भेट देऊन कामख्या देवीचे आर्शीरवाद घेतल्याची माहिती दिली.
काय आहे अंबुबाची महोत्सव?
अंबुबाची महोत्सव हा आसाममध्ये होणार जगप्रसिद्ध महोत्सव आहे. हा महोत्सव गुवाहाटीमध्ये असलेल्या कामाख्या देवीच्या मंदिरात भरतो. भारतात ज्या देवीच्या 51 शक्तिपिठांचा उल्लेख होतो. त्यामध्ये कामख्या देवीचा देखील समावेश आहे. गुवाहाटीमधील कामख्या मंदीर हे 51 शक्तिपिठांपैकी एक पीठ आहे. दरवर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीला या महोत्सवाला सुरुवात होते. हा महोत्सव चार दिवस असतो. यंदा या महोत्सवाला 22 जूनरोजी सुरुवात झाली आहे. हा महोत्सव 26 जूनपर्यंत चालणार आहे. दरम्याना शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनी या महोत्सवाला भेट दिल्याचा दावा आयुष मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी केला आहे. आमदारांनी कामख्या देवीचे दर्शन घेतल्याचे सोनोवाल यांनी म्हटले आहे.
नाराज आमदारांच्या संख्येत वाढ
एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात बंडखोरी केली. एकनाथ शिंदे यांच्यासोबत सुरुवातीला तेरा आमदार असल्याची माहिती मिळत होती. मात्र आता हा आकडा 41 वर पोहोचला आहे. आज आणखी तीन आमदारांची यामध्ये भर पडली असून, ते गुवाहाटीमध्ये दाखल झाले आहेत. यामुळे आता महाविकास आघाडी सरकार संकटात आले आहे. बुधवारी उद्धव ठाकरे यांनी या बंडखोर आमदारांना भावनिक आवाहन देखील केले होते. या अवाहानंतर कोणत्याही परिस्थितीमध्ये आता राष्ट्रवादी आणि क्राँग्रेससोबत आघाडी होणार नसल्याची भूमिका एकनाथ शिंदे यांनी मांडली आहे. एकाच वेळी एवढे आमदार फुटल्याने महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे.