Buldhana : बुलडाणा येथे शिवसेनेचा मेळावा, खा. प्रतापराव जाधव मात्र तळ्यात-मळ्यात..!
शिवसेनेतील बंडखोर आमदारांच्या भूमिकेचा परिणाम हा ना पक्षावर होणार आहे ना स्थानिक पातळीवरील शिवसैनिकावर. उलट अजून जास्त ताकदीने शिवसैनिक हा मैदानात उतरणार असून, जिल्ह्यातील शिवसैनिक कालही उद्धव ठाकरे यांच्या सोबत होते आजही आहेत आणि उद्याही राहतील अशी ग्वाही जिल्हाप्रमुख जालींदर बुधवत यांनी दिली आहे.
बुलडाणा : (Shivsena) शिवसेनेचे आमदार, मंत्री हे एकनाथ शिंदे गटात सामील होत असताना मात्र, (Buldhana) बुलडाणा येथे शिवसेनेचा मेळावा पार पडला आहे. जिल्ह्यातील दोन आमदारांचा समावेश हा एकनाथ शिंदे गटात यापूर्वीच झाला आहे. त्यामुळे त्या दोन आमदारांची भूमिका स्पष्ट आहे. मात्र, (Pratprao Jadhav) खासदार प्रतापराव जाधव हे नेमके कोणत्या गटात आहेत, हे स्पष्ट झाले नसून बुलडाणा जिल्ह्यातील शिवसैनिकांमध्ये एक प्रकारे संभ्रम निर्माण आहे. शिवसेना पक्ष प्रमुख यांनी मातोश्रीवर झालेल्या बैठकीतच जिल्ह्याच्या ठिकाणी मेळाव्याचे आयोजन करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार आयोजित मेळाव्यात शिवसैनिकांची तर उपस्थिती होती मात्र, प्रतापराव जाधव हे मेळाव्याला उपस्थित नव्हते. त्यामुळे त्यांच्या भूमिकेबद्दल संशयाचे वातावरण हे मेळाव्यातच झाले होते.
खा. प्रतापराव जाधव गेले कुठे?
जिल्ह्यातील दोन आमदारांनी बंडखोरी करुन शिंदे गटात समावेश केला आहे. याचा कोणताही परिणाम पक्षावर होऊ नये म्हणून जिल्ह्याच्या ठिकाणी आता मेळावे पार पडत आहेत. त्याच अनुशंगाने शहरातील एका हॉटेलमध्ये शिवसैनिकांचा मेळावा घेण्यात आला होता. यामध्ये जिल्हाभरातील शिवसैनिक तर सहभागी झाले होते पण खा. प्रतापराव जाधव यांची अनुपस्थिती हा चर्चेचा मुद्दा ठरला होता. मेळावा संपला तरी ते उपस्थित झाले नव्हते. त्यामुळे त्यांनी काही वेगळा निर्णय घेतला का अशी चर्चा रंगली होती.
पक्षावर परिणाम नाही, उलट ताकदीने लढण्याचा निर्धार
शिवसेनेतील बंडखोर आमदारांच्या भूमिकेचा परिणाम हा ना पक्षावर होणार आहे ना स्थानिक पातळीवरील शिवसैनिकावर. उलट अजून जास्त ताकदीने शिवसैनिक हा मैदानात उतरणार असून, जिल्ह्यातील शिवसैनिक कालही उद्धव ठाकरे यांच्या सोबत होते आजही आहेत आणि उद्याही राहतील अशी ग्वाही जिल्हाप्रमुख जालींदर बुधवत यांनी दिली आहे. शिवाय ज्यांनी पक्ष प्रमुखाला धोका दिला ते खरे शिवसैनिकच नव्हते. आता नव्या आशा घेऊन शिवसैनिक हा पक्ष वाढीसाठी प्रयत्न करेल असा सूर या मेळाव्यातून निघाला.
मेळाव्यानंतर शहरातून रॅली
मेळाव्याला अनुपस्थित असलेल्या खा. जाधव यांनी शेवटी मोबाईलवरुन शिवसैनिकांशी संवाद साधला तो ही केवळ काही मिनिटांसाठी. त्याच्या अशा भूमिकेमुळे संभ्रम निर्माण झाला आहे. असे असले तरी मेळावा पार पडताच पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी गर्दे हॉल पासून कारंजा चौक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत रॅली काढली. या दरम्यान उद्धव ठाकरे यांच्या समर्थनात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख जालींदर बुधवत, सह संपर्क प्रमुख प्राध्यापक नरेंद्र खेडेकर, दत्ता पाटील, भोजराज पाटील, छगनराव मेहेत्रे, मधुसूदन सावळे, धीरज लिंगाडे, संजय हाडे, निलेश राठोड, लखन गाडेकर उपस्थित होते.