Shivendraraje Bhosale : महाराष्ट्रात लवकरच देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्त्वात सरकार येणार, शिवेंद्रराजे भोसलेंचा विश्वास
एकनाथ शिंदे काल सायंकाळापासून सुरतमध्ये आहेत. यावर भाजपसहीत राष्ट्रवादी आणि काँग्रेस नेत्यांच्या प्रतिक्रिया येतायत.
सातारा : राज्यात सध्या महाविकास आघाडी सरकार अल्पमतात येण्याची शक्यता निर्माण झालीय. महाराष्ट्रात (Maharashtra) पुन्हा एकदा राजकीय भूकंप घडण्याची शक्यताय. शिवसेनेचे (shiv sena) एक-दोन नव्हे तर तब्बल 25 पेक्षा अधिक आमदार नॉटरिचेबल असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार अल्पमतात येण्याची शक्यता आहे. शिवसेनेचे नेते आणि राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांनी 25 पेक्षा अधिक आमदारांसोबत बंड पुकारल्यानं राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ माजली आहे. यात शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्क झाल्याची माहिती पत्रकार परिषदेत दिली. तर आईचं दूध विकणारे शिवसेनेत कधी निर्माण होणार नाहीत, असंही राऊत म्हणाले आहेत. दरम्यान, यातच भाजपचे नेते शिवेंद्रराजे भोसले यांनी मोठं विधान केलं आहे. राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणुकीत भाजपला मिळालेलं यश हे पुन्हा राज्यात भाजप सरकार येण्याचे संकेत आहेत, असं शिवेंद्रराजे भोसले म्हणाले आहेत.
राज्यात सध्या राजकीय घडामोडींना वेग आलाय. यातच शिवसेना नेते संजय राऊत, राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले रोहीत पवार ?
शिवसेनेत फूट पडल्यास भाजप अविश्वासाचा ठराव आणू शकते याबाबत रोहित पवार यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर प्रतिक्रिया देताना रोहित पवार यांनी म्हटले आहे की, आम्ही जोडण्याचे काम करतो. ते तोडण्याचे काम करतात. पाहुयात कोण जिंकतं ते. आम्ही आमच्या नेत्यांसोबत आहोत, आमचे नेते जो आदेश देतील तसं आम्ही करू, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे.
राऊत काय म्हणाले?
एकनाथ शिंदे काल सायंकाळापासून सुरतमध्ये आहेत. त्यांच्यासोबत शिवसेनेचे 35 आमदार असल्याचा दावा भाजपाकडून करण्यात आला आहे. मात्र हा दावा संजय राऊत यांनी फेटाळून लावला आहे. हे खरे आहे की, आमचे काही आमदार आमच्या संपर्कात नाहीत. मात्र आमचा एकनाथ शिंदे यांच्यासी संपर्क झाला आहे. राज्यात भूकंप वगैरे काही येणार नाही. मुख्यमंत्री प्रत्येक विभागाचा आढावा घेत असतात. जर त्यातून काही गैरसमज झाला असेल तर तो दूर करू. भाजपकडून राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पाडण्याचा प्रयत्न सुरू आहे. हा शिवसेनेच्या पाठीत केला गेलेला वार आहे. शिवसेनेवर वार म्हणजेच तो म्हराष्ट्रावर वार आहे.