Shivrajsingh Chauhan : ‘मनात संकल्प, हृदयात तडफ असेल तर उद्धव ठाकरेजी मार्ग निघतोच’, OBC आरक्षणावरुन शिवराजसिंह चौहानांचा जोरदार टोला
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी पंकजा मुंडे यांचं तोंडभरुन कौतुक केलं. त्याचबरोबर चौहान यांनी ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारला जोरदार टोला लगावलाय.
परळी : भाजप नेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांच्या 8 व्या स्मृतीदिनानिमित्त गोपीनाथ गडावर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. पंकजा मुंडे यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान (ShivrajSingh Chauhan) उपस्थित होते. त्यावेळी बोलताना चौहान यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतीला उजाळा दिला. तसंच भाजपच्या राष्ट्रीय सचिव आणि मध्य प्रदेशच्या भाजप प्रभारी पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांचं तोंडभरुन कौतुक केलं. त्याचबरोबर चौहान यांनी ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारला जोरदार टोला लगावलाय.
शिवराजसिंह चौहान म्हणाले की, मी आज भाजप नेता म्हणून आलेलो नाही तर गोपीनाथ मुंडे हे माझे मोठे बंधू होते. त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी मी आलो आहे. पंकजा मुंडे या खूप मोठ्या नेत्या आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली मध्य प्रदेश सरकार काम करत आहे. आमच्या मध्य प्रदेशात त्या खूप चांगलं संघटन करतात. मी मध्य प्रदेशचा मामा आहे तसा महाराष्ट्राचाही मामा आहे. माझं प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे यांच्याशी खूप जवळच नातं आहे. मी महाराष्ट्राचा जावाईही आहे. त्यामुळे जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत आपलं नातं कायम राहील.
ओबीसी आरक्षणावरुन ठाकरे सरकारला टोला
ओबीसी आरक्षणावर बोलताना शिवराज सिंह चौहान यांनी ठाकरे सरकारला जोरदार टोला लगावलाय. जर मनात संकल्प असेल तर, हृदयात तडफ असेल तर उद्धव ठाकरेजी मार्ग निघतोच. मी स्पष्ट सांगितलं होतं की, ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका होणार नाहीत. कुणी साथ दिली अथवा नाही दिली तरी आम्ही ओबीसी आरक्षणाची लढाई लढली. ट्रिपल टेस्टच्या आधारावर ओबीसी आरक्षणाची प्रक्रिया पूर्ण केली, अशा शब्दात शिवराजसिंह चौहान यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला.
गोपीनाथ मुंडेंच्या आठवणींना उजाळा
‘मी लहान मुलींची नेहमी पूजा करतो. मी योग्य करतोय हे आज या तीन मुलींकडे पाहून वाटतं. गोपीनाथ गड पाहून मुली मुलांपेक्षा मोठ्या असतात हे स्पष्ट झालं. किती प्रतिक्षा असेलया मातीला, गोपीनाथ मुंडे मंत्री होऊन इथे यावेत. पण गोपीनाथ मुंडे दुसऱ्या जगात निघून गेले. 3 जून आपल्यासाठी काळा दिवस आहे. कुटुंबाचं काय सांगू मला स्वत:ला वाटतं की गोपीनाथ मुंडे हसत येतील आणि म्हणतील सांगा मध्य प्रदेशचं कसं सुरु आहे? छोट्या गावातून आले, झाडाखाली शिकले, गरिबांचं दु:ख दूर करण्याची प्रेरणा त्यांना राजकारणात घेऊन आली. गोदावरीच्या पुरावेळी पायी चालत संकटात सापडलेल्या लोकांच्या भेटीला गेले. ज्ञान, भक्ती आणि कर्म याचा सुरेल संगम गोपीनाथ मुंडे होते. मी थकणार नाही, उतणार नाही, कुणासमोर झुकणार नाही, असे मुंडे होते. त्यांची लोकप्रियता मी पाहिली आहे, त्यांचा संघर्षही पाहिला आहे. जिथं गुंडांचं राज्य, अंडरवर्ल्ड होतं. पण त्यांनी पोलिसांना सांगितले आणि एन्काऊंटर सुरु केलं. गोपीनाथ मुंडे यांनी इतिहास बदलला. ऊस तोडणारांच्या हातात हत्याराऐवजी त्यांनी लेखणी दिली. गोपीनाथ मुंडे कामाच्या जीवावर जिवंत राहतील’, अशा शब्दात शिवराजसिंह चौहान यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणींना उजाळा दिला.