राज्यसभा निवडणूक : निष्ठावंतांना डावललं, शिवसेना-भाजपची आयारामांवर भिस्त
प्रियांका चतुर्वेदी, छत्रपती उदयनराजे भोसले, ज्योतिरादित्य शिंदे या आयाराम नेत्यांना शिवसेना आणि भाजपने राज्यसभेची उमेदवारी दिली आहे. Shivsena BJP ignores Veterans
मुंबई : महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सात जागांसाठी महाविकास आघाडीने उमेदवार जाहीर केले आहेत. काँग्रेसने निष्ठावान नेते राजीव सातव यांना उमेदवारी दिलेली असताना शिवसेना आणि भाजपने मात्र ज्येष्ठ नेत्यांना डावलल्याचं चित्र आहे. सेना-भाजपने गेल्या वर्षभरात पक्षात प्रवेश करणाऱ्या आयाराम नेत्यांना तिकीट दिलं आहे. (Shivsena BJP ignores Veterans in Rajyasabha Election Candidature)
उदयनराजेंना सहा महिन्यात दुसऱ्यांदा तिकीट
भाजपने राज्यसभेसाठी जाहीर केलेल्या पहिल्या उमेदवार यादीत महाराष्ट्रातून छत्रपती उदयनराजे भोसले यांना उमेदवारी दिली. उदयनराजे भोसले यांनी गेल्या वर्षी लोकसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली आणि भाजपचा झेंडा हाती धरला होता. त्यांनी खासदारकीचा राजीनामा दिल्यामुळे साताऱ्यात पोटनिवडणूक लागली, परंतु पक्ष बदलणाऱ्या उदयनराजेंना मतदारांनी नाकारलं आणि राष्ट्रवादीच्या श्रीनिवास पाटील यांना संसदेत पाठवलं. उदयनराजे भोसलेंचं राजकीय पुनर्वसन करण्यासाठी भाजपने त्यांना वरच्या सभागृहात पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांना केंद्रात मंत्रिपद मिळण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.
उदयनराजेंना तिकीट मिळाल्यामुळे भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना पुन्हा डावलल्याचं चित्र आहे. आधी विधानसभा निवडणुकीत उमेदवारी मिळाली नसताना, राज्यसभेतही त्यांच्या पदरी निराशा पडली आहे. खुद्द खडसे मात्र राष्ट्रीय राजकारणापेक्षा महाराष्ट्रातील राजकारणात आपल्याला रस असल्याचं सांगतात. याशिवाय सहयोगी खासदार संजय काकडे यांचाही पत्ता कट झाला आहे.
पक्षप्रवेशानंतर चार तासात ज्योतिरादित्यांना तिकीट
राहुल गांधी यांच्या अत्यंत जवळचे असलेल्या ज्योतिरादित्य शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. त्यानंतर काही तासांतच त्यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला. दुसऱ्याच दिवशी त्यांनी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला. अवघ्या चार तासांनंतर जाहीर झालेल्या भाजपच्या राज्यसभेच्या उमेदवार यादीत शिंदे यांचं नाव होतं. काँग्रेसने निष्ठावंत ज्योतिरादित्यांना मध्य प्रदेशातून राज्यसभेचं तिकीट देण्यास टाळाटाळ केली, परंतु भाजपने आयाराम नेत्यासाठी तिकीट हातात धरतच बाहू पसरले.
प्रियांका चतुर्वेदींवर शिवसेनेची मदार
राज्यसभेची निवडणूक लढवण्यासाठी शिवसेना नेत्या प्रियांका चतुर्वेदी उत्सुक होत्या. त्यादृष्टीने चतुर्वेदींनी प्रयत्न सुरु केले होते. विशेष म्हणजे प्रियांका चतुर्वेदी या पर्यावरण-पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या निकटवर्तीय मानल्या जातात. चतुर्वेदींनी थेट ‘फील्डिंग’ लावल्याने राज्यसभेच्या एका जागेच्या शर्यतीत त्या पुढे होत्या. अखेर त्यांनाच तिकीट जाहीर झालं.
अन्य पक्षातून आलेल्या नेत्यांपेक्षा जुन्या जाणत्या नेत्यांनाच संधी मिळाली पाहिजे असा पक्षात मतप्रवाह होता. शिवाय यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेले माजी खासदार चंद्रकांत खैरे, शिवाजीराव आढळराव पाटील, अनंत गिते यांची नावेही चर्चेत होते. याशिवाय विधानपरिषदेचे आमदार दिवाकर रावतेही उत्सुक होते. परंतु शिवसेनेने दिग्गजांना डावलून आयारामांच्या पदरात दान टाकलं.
राहुल गांधींचा विश्वासू मोहरा
राहुल गांधी यांचे निकटवर्तीय असलेले हिंगोलीचे माजी खासदार राजीव सातव यांना काँग्रेसने महाराष्ट्रातील जागेवरुन राज्यसभेची उमेदवारी दिली आहे. राजीव सातव यांच्या नेतृत्वात काँग्रेसने 2017 मधील गुजरात विधानसभा निवडणुकीत चांगलं यश मिळवलं होतं. फेब्रुवारी 2010 ते डिसेंबर 2014 या काळात त्यांनी भारतीय युवा काँग्रेसचं अध्यक्षपदही भूषवलं होतं. (Shivsena BJP ignores Veterans in Rajyasabha Election Candidature)
राजीव सातव यांनी स्वतःहून 2019 मधील लोकसभा निवडणुकीत न उतरण्याचा निर्णय घेतला होता. सातव यांच्या रुपाने संसदेच्या वरच्या सभागृहात काँग्रेसचा आवाज पुन्हा कणखर होताना दिसेल.
VIDEO : राज्यसभा निवडणूक | कोणत्या पक्षाची कोणाला उमेदवारी?https://t.co/RnE7ieUZQi
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 12, 2020
26 मार्चला निवडणूक
राज्यसभेच्या महाराष्ट्रातील सात जागांसाठी 26 मार्चला निवडणूक होणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख उद्या (शुक्रवार 13 मार्च) आहे. संख्याबळानुसार महाविकास आघाडीचे चार, तर भाजपचे तीन उमेदवार निवडून येऊ शकतात. राष्ट्रवादी दोन तर काँग्रेस-शिवसेना प्रत्येकी एक जागा लढणार आहे.
महाराष्ट्रातील 7 जागांसाठी उमदेवार
- उदयनराजे भोसले – भाजप
- भागवत कराड – भाजप
- रामदास आठवले – भाजप पुरस्कृत
- शरद पवार – राष्ट्रवादी
- फौजिया खान – राष्ट्रवादी
- राजीव सातव – काँग्रेस
- प्रियांका चतुर्वेदी – शिवसेना
राज्यसभा नियुक्तीसाठी निकष काय?
राज्यसभेवर निवडून जाण्यासाठी उमेदवाराला पहिल्या पसंतीची 37 मतं आवश्यक आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीचे चार तर भाजपचे दोन उमेदवार सहज निवडून येतील. शिल्लक राहिलेल्या मतांमधून आणखी एक उमेदवार निवडून आणण्याचा आघाडीचा आणि भाजपचा प्रयत्न राहणार आहे.
Shivsena BJP ignores Veterans in Rajyasabha Election Candidature
संबंधित बातम्या :
राहुल गांधींचा विश्वासू मोहरा राज्यसभेवर, महाराष्ट्रातून काँग्रेसचा उमेदवार निश्चित
संजय काकडेंचा पत्ता कट, खडसेंनाही तिकीट नाही, राज्यसभेसाठी भाजपची दुसरी उमेदवार यादी
गोपीनाथ मुंडेंकडून पक्षप्रवेश, भाजपचे राज्यसभा उमेदवार भागवत कराड कोण आहेत?
काँग्रेस रिटर्न प्रियांका चतुर्वेदींना शिवसेनेचं तिकीट, खैरे, रावतेंना डावललं
राज्यसभेसाठी फक्त शरद पवारांचा उमेदवारी अर्ज, काँग्रेसच्या भूमिकेमुळे फौजिया खान वेटिंगवर