BMC Committee Election | दोन्ही उमेदवारांचीच मतं अवैध, तरीही बेस्ट अध्यक्षपदी पुन्हा शिवसेनेचाच झेंडा
बीएमसीचे विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी अर्ज मागे घेतला. तर निवडणुकीत काँग्रेस तटस्थ राहिल्याने शिवसेनेच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला.
![BMC Committee Election | दोन्ही उमेदवारांचीच मतं अवैध, तरीही बेस्ट अध्यक्षपदी पुन्हा शिवसेनेचाच झेंडा BMC Committee Election | दोन्ही उमेदवारांचीच मतं अवैध, तरीही बेस्ट अध्यक्षपदी पुन्हा शिवसेनेचाच झेंडा](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2020/10/06134235/Shivsena-BEST-Praveen-Shinde.jpg?w=1280)
मुंबई : मुंबई महापालिकेच्या बेस्ट अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेनेने पुन्हा एकदा झेंडा फडकवला आहे. बेस्ट अध्यक्षपदी शिवसेनेचे प्रवीण शिंदे विजयी झाले. निवडणुकीत काँग्रेस तटस्थ राहिल्याने शिवसेनेच्या विजयाचा मार्ग सुकर झाला. (Praveen Shinde elected as BEST President in BMC Committee Elections)
बेस्ट अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेनेच्या प्रवीण शिंदे यांना 8 मते मिळाली, तर भाजपच्या प्रकाश गंगाधरे यांना 5 मते मिळाली. बीएमसीचे विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी अर्ज मागे घेतला. तर निवडणुकीत काँग्रेस तटस्थ राहिल्याने शिवसेनेच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला.
बेस्ट अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजप-शिवसेनेच्या दोन्ही उमेदवारांच्या सह्यांचा गोंधळ झाला. चुकीच्या जागी सही केल्यामुळे मतदानात उमेदवारांचीच दोन मतं अवैध ठरली.
एकूण सदस्य किती?
शिवसेना – 8 भाजप – 6 काँग्रेस – 2 राष्ट्रवादी – 1 एकूण – 17
कोणाला किती मतं?
शिवसेना (प्रवीण शिंदे) – 8 भाजप (प्रकाश गंगाधरे) – 5 अवैध (उमेदवार) – 2 तटस्थ (काँग्रेस) – 2
(Praveen Shinde elected as BEST President in BMC Committee Elections)
याआधीही, मुंबई महापालिकेतील समित्यांच्या निवडणुकीत काँग्रेसने शिवसेनेला दिलेला शब्द पाळला होता. मुंबई महापालिका शिक्षण समिती आणि स्थायी समितीच्या निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराने अर्ज मागे घेतला. शिवसेना आणि काँग्रेसची महापालिकेत छुपी आघाडी झाल्याने शिवसेनेच्या वर्चस्वाला धक्का देण्याचे भाजपचे मनसुबे फोल ठरले.
शिवसेना पक्ष प्रमुख, मुख्यमंत्री सन्मा. श्री.उद्धव साहेब ठाकरे व शिवसेना नेते, मंत्री सन्मा.आदित्य साहेब ठाकरे यांच्या आदेशाने आज बेस्ट समिती अध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी शिवसेनेच्या वतीने श्री. प्रवीण शिंदे जी यांनी अर्ज भरला आहे.. @OfficeofUT @AUThackeray pic.twitter.com/bMb6NNdz8U
— Anil Kokil (@AnilKokil) October 1, 2020
राज्यातील महाविकास आघाडीत वितुष्ट नको म्हणून काँग्रेसने अध्यक्षपदाच्या निवडणुकीत उमेदवारीचा अर्ज मागे घेतला. शिक्षण समितीच्या अध्यक्षपदी शिवसेनेच्या संध्या दोशी, तर स्थायी समितीच्या अध्यक्षपदी शिवसेनेचे यशवंत जाधव निवडून आले.
आम्हाला शिवसेना विश्वासात घेत नाही म्हणून महापालिकेत राज्यासारखी महाविकास आघाडी होऊ शकली नाही, अशी नाराजी महापालिकेतील विरोधी पक्ष नेते असलेल्या काँग्रेसच्या रवी राजा यांनी बोलून दाखवली होती. मात्र आता सारे आलबेल असल्याचे चित्र आहे.
महापालिकेत स्थायी समितीच्या निवडणुकीत काँग्रेस ऐन वेळी माघार घेईल, असं सूचक वक्तव्य अनिल परब यांनी केलं होतं. तसंच केवळ स्थायी समितीच नाही तर सर्वच समित्यांवर शिवसेनेचाच अध्यक्ष निवडून येईल आणि शिवसेनेचा बीएमसीतील गड अबाधित राहील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला होता.
संबंधित बातम्या :
काँग्रेसने शब्द पाळला, BMC च्या तिजोरीच्या चाव्या शिवसेनेकडेच
(Praveen Shinde elected as BEST President in BMC Committee Elections)