मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचे आरोप, शिवसेना नेते एकनाथ शिंदे म्हणतात…
धनंजय मुंडे यांच्या स्पष्टीकरणानंतर राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. शिवसेना नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी मात्र या प्रकरणावर कोहीही बोलण्यास नकार दिला आहे.
गोंदिया : राज्याचे सामाजिक न्यायविकास मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचे आरोप झाल्याने राज्यात खळबळ उडालीय. खुद्द मुंडे यांनी फेसबुक पोस्ट लिहित परस्पर सहमतीने करुणा शर्माशी माझे संबंध आहेत तसंच आम्हाला दोन मुलेही आहेत, असं सांगितलं आहे. धनंजय मुंडे यांच्या स्पष्टीकरणानंतर राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. शिवसेना नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी मात्र या प्रकरणावर काहीही बोलण्यास नकार दिला आहे. (Shivsena Eknath Shinde on Dhananjay Munde Rape Case)
नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे गोंदिया जिल्ह्यातील आमगाव येथे शिवसेना मेळाव्यासाठी आले होते. यावेळी मेळावा पार पडल्यानंतर पत्रकारांनी धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर तुम्हाला काय वाटतं? असा प्रश्न विचारला. मात्र यावर बोलण्यास एकनाथ शिंदे यांनी टाळलं. ‘नो कॉमेंट्स’ असं म्हणत त्यांनी याविषयावर कोणतंही मत व्यक्त केलं नाही.
धनंजय मुंडे यांच्यावर आरोप झाल्यानंतर राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेनेतली मंडळी काय बोलणार, काय प्रतिक्रिया देणार? याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. तत्पूर्वी राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी “धनंजय मुंडे यांचं हे कौटुंबिक प्रकरण आहे. याविषयावर मी अधिक काही बोलणार नाही. याविषयी तेच बोलतील. परंतु त्यांनी दिलेल्या स्पष्टीकरणातून त्यांची बाजू समजलेली आहे”, असं मलिक म्हणाले.
दुसरीकडे हिंदु धर्मात दोन लग्न किंवा पत्नी पत्नी कायद्याने गुन्हा आहे, अशी भूमिका भाजपच्या महिला आघाडीने घेत मुंडे यांच्यावर टीका केली होती. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसने भाजपला टोला लगावलाय. “भाजप महिला आघाडीच्या भूमिकेनंतर भाजपच्या नेत्यांना आता टेन्शन आलं असेल”, असा टोला काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी लगावलाय.
काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या भूमिकेनंतर मुंडे प्रकरणी शिवसेना काय भुमिका घेते, याकडे लक्ष लागलं असतानाच एकनाथ शिंदे यांनी मात्र याविषयावर न बोलता ‘नो कॉमेंट्स’चा पवित्रा घेतला. आता दस्तुरखुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसंच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार याप्रकरणी काय भुमिका घेतात, तसंच पुढे काय पाऊल टाकतात, याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.
हे ही वाचा
धनंजय मुंडेंनी तात्काळ राजीनामा द्यावा; चंद्रकांत पाटलांची मागणी