Arjun Khotkar : अर्जुन खोतकर यांना ईडीचा दणका, खोतकरांशी संबंधित 78 कोटींची जमीन ईडीकडून जप्त
शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांच्यावर अंमलबजावणी संचलनालय अर्थात ईडीकडून मोठी कारवाई करण्यात आलीय. जालना सहकारी साखर कारखान्यावर ही कारवाई करण्यात आलीय. खोतकर यांच्याशी संबंधित तब्बल 78 कोटी 38 लाखाची मालमत्ता ईडीकडून जप्त करण्यात आली आहे.
मुंबई : शिवसेना नेते अर्जुन खोतकर (Arjun Khotkar) यांच्यावर अंमलबजावणी संचलनालय अर्थात ईडीकडून मोठी कारवाई करण्यात आलीय. जालना सहकारी साखर कारखान्यावर (Sugar Factory) ही कारवाई करण्यात आलीय. खोतकर यांच्याशी संबंधित तब्बल 78 कोटी 38 लाखाची मालमत्ता ईडीकडून (Enforcement Directorate) जप्त करण्यात आली आहे. खोतकर यांची मालमत्ता असलेली जालना सहकारी साखर कारखान्याची जमीन, एक रेसिडेन्शिलय प्लॅन्ट आणि एक बिल्डिंग आणि स्ट्रक्चर जप्त करण्यात आलंय. ईडीकडून आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन ही माहिती देण्यात आली आहे.
तात्पुरत्या स्वरुपात ही मालमत्ता जप्त करण्यात आली असून ही सर्व मालमत्ता खोतकर यांच्याशी संबंधित आहे. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं 2019 मध्ये गुन्हा दाखल केला होता. त्या अनुषंगाने हा तपास सुरु होता. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर आर्थिक गुन्हे शाखेनं हा तपास सुरु केला होता. त्याचवेळी ईडीनेही या प्रकरणात मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल केलेला होता. त्यानंतर तपासादरम्यान, यात मनी लॉन्ड्रिंग झाल्याचं आढळून आलं होतं.
Enforcement Directorate attaches land, building and structure, residual plant and machinery of Jalna Sahakari Sakhar Karkhana in Jalna, Maharashtra, under the PMLA in a case related to the illegal auction of cooperative sugar mills by Maharashtra State Co-operative Bank: ED
— NDTV (@ndtv) June 24, 2022
मार्च 2022 मध्ये रामनगर कारख्यावर निर्बंध लावण्याचे आदेश
मार्च महिन्यातही अर्जुन खोतकर यांच्या रामनगर साखर कारखान्यावर निर्बंध लावण्याचे आदेश ईडीने दिले होते. जालना जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून निर्बंध लावण्याचे आदेश ईडीने दिले होते. या कारखान्याचा वापर, विक्री आणि व्यवहार करण्यावर निर्बंध आणण्यात येतील असं त्यावेळी सांगण्यात आलं होतं. मागील काही महिन्यांपासून रामनगर साखर कारखाना गैरव्यवहार प्रकरणात अर्जुन खोतकर यांची ईडी चौकशी सुरु होती.
खोतकर यांच्या निवासस्थानी नोव्हेंबर 2021 मध्ये छापेमारी
अर्जून खोतकर यांच्या जालन्यातील राहत्या घरी ईडीने नोव्हेंबर 2021 मध्ये शुक्रवारी सकाळी धाड टाकली. त्याच्या आधी काही दिवसांपूर्वीच ईडीच्या अधिकाऱ्यांनी औरंगाबादसह जालना आणि नांदेडमधील काही ठिकाणी छापे मारले होते. त्यानंतर भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी जालना येथील साखर कारखाना विक्रीत अर्जुन खोतकर यांनी 100 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर अवघ्या काही दिवसातच ही छापेमारी सुरु झाली होती.