Sanjay Raut | संजय राऊत यांच्याकडून उद्धव ठाकरेंची प्रभू श्रीरामांशी तुलना
Sanjay Raut | "भाजपाकडे धैर्य नव्हतं, म्हणून बाबरी कोसळताच त्यांच धैर्य कोसळलं. ते म्हणाले आमच काम नाही, त्याचवेळी वीज कडाडावी तसे बाळासाहेब ठाकरे म्हणाले, हे काम माझ्या शिवसैनिकांनी केलं असेल, तर मला त्यांचा अभिमान आहे"
नाशिक : “प्रभू रामाशी आमच जुन नातं आहे. श्री रामाशी शिवसेनेच अत्यंत जिव्हाळ्याच, भावनिक जुन नातं आहे. शिवसेना नसती तर अयोध्येत काल प्रभू श्रीरामाची प्राण प्रतिष्ठा होऊ शकली नसती. शिवसेनेचे वाघ तिथे पोहोचले. त्यांनी धैर्य दाखवलं, शौर्य दाखवलं म्हणून काल पंतप्रधानांना अयोध्येत जाऊन श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा करता आली. लोक म्हणतात शिवसेनेचा रामाशी संबंध काय? याबाबतीत समर्थ रामदासांनी जे सांगितलय, ते शिवसेनच्या बाबतीत सांगितलय. आम्ही काय कोणाचे खातो, ते श्रीराम आम्हाला देतो. आमचा राम बाळासाहेब ठाकरे असेल, काळाराम असेल किंवा आमचा राम अयोध्येचा राम असेल जिथे अधिवेशन होतय ते धर्मक्षेत्र आहे” असं शिवसेना नेते खासदार संजय राऊत म्हणाले. नाशिकमध्ये शिवसेनेच्या अधिवेशनात ते बोलत होते.
“हे धर्मक्षेत्र कुरुक्षेत्र आहे. जो राम अयोध्येतला तोच पंचवटीतला राम आहे. इथे पंचवटी आहे. प्रभू रामाचा आयुष्यातला सर्वात मोठा संघर्ष नाशिकामध्ये झाला. म्हणूनच उद्धवजींनी या पुण्यभूमीची, युद्धभूमीची निवड केलीय” असं संजय राऊत म्हणाले. “श्रीरामाच आणि शिवसेनेच नातं आहे. रामाच धैर्य म्हणजे शिवसेनेच धैर्य, रामाच शौर्य ते शिवसेनेच शौर्य आहे. रामाचा संयम तो उद्धव ठाकरेंचा संयम आहे. म्हणून रामाच आणि आपल नातं आहे” असं संजय राऊत म्हणाले. त्यांनी प्रभू रामचंद्रांबरोबर उद्धव ठाकरेंची तुलना केली.
‘तो दिल्लीतील रावणशाहीपुढे झुकणार नाही’
“धैर्य मानवजातीला मिळालेल सर्वात मोठ वरदान आहे. हे धैर्य नसतं, तर शिवसैनिकांनी बाबरी मशिद पाडली नसती. हे धैर्य आमच्यापाशी होतं, म्हणून आमच्या शिवसैनिकांच्या वाघांनी बाबरीचे घुमट पाडले. भाजपाकडे धैर्य नव्हतं, म्हणून बाबरी कोसळताच त्यांच धैर्य कोसळलं. ते म्हणाले आमच काम नाही, त्याचवेळी वीज कडाडावी तसे बाळासाहेब ठाकरे म्हणाले, हे काम माझ्या शिवसैनिकांनी केलं असेल, तर मला त्यांचा अभिमान आहे” असं संजय राऊत म्हणाले. “बाळासाहेबांच्या या एका वाक्याने हिंदूंच्या मनातील मरगळ, निराशा झटकली गेली. बाळासाहेबांकडे हे धैर्य प्रभू श्रीरामांकडून आलं. महाराष्ट्रात श्रीरामच वास्तव्य होतं. धैर्य, आत्मविश्वास ज्याच्यापाशी तो कधीच हरत नाही, तो दिल्लीतील रावणशाहीपुढे झुकणार नाही” असं संजय राऊत म्हणाले.