बाळा सावंत निष्ठावंत, तृप्ती सावंतांकडून बाळासाहेबांचा अवमान, बंडखोरीचा फटका बसलेले महाडेश्वर कडाडले
शिवसेना उमेदवार विश्वनाथ महाडेश्वर यांच्याविरोधात बंडखोरी केल्यामुळे सावंत यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली होती. (Vishwanath Mahadeshwar on Trupti Sawant)
मुंबई : शिवसेनेच्या माजी आमदार तृप्ती सावंत (Trupti Sawant) यांनी काल विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये (BJP) प्रवेश केला. “तृप्ती सावंत यांनी भाजपसारख्या बेगडी हिंदुत्व असलेल्या पक्षाचा आधार घेतला. त्यांनी शिवसेना आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा अवमान केला आहे” अशी प्रतिक्रिया माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी दिली आहे. महाडेश्वरांना शिवसेनेने वांद्रे पूर्व मतदारसंघातून तिकीट दिल्यानेच तृप्ती सावंत यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज भरला होता. त्यानंतर सावंतांची पक्षातून हकालपट्टी झाली, तर बंडखोरीचा फटका बसल्याने सावंतांसह महाडेश्वरही पराभूत झाले होते. (Shivsena Leader Vishwanath Mahadeshwar reacts on former MLA Trupti Sawant joining BJP)
“राणेंसारख्या बलाढ्या उमेदवाराला पराभूत”
“बाळा सावंत हे निष्ठावंत शिवसैनिक मातोश्रीच्या जवळचे होते. त्यामुळे त्यांना शिवसेनेने अनेक संधी दिलेल्या आहेत. त्यांना नगरसेवक केलं, आमदार केलं. कोणत्या पद्धतीचा अन्याय केला नाही. तृप्ती सावंत कार्यरत नसताना त्यांना आमदारकी दिली. नारायण राणे यांच्यासारख्या बलाढ्य उमेदवाराला शिवसैनिकांच्या ताकदीमुळे पराभूत करण्यात यश मिळालं” असं विश्वनाथ महाडेश्वर म्हणाले.
“भाजपसारख्या बेगडी हिंदुत्ववादी पक्षाचा आधार”
“2019 मध्ये तृप्ती सावंत यांनी पक्षाविरोधात बंडखोरी केल्यामुळे त्यांची शिवसेनेतून हकालपट्टी केली होती. शिवसेनेने त्यांच्यावर कोणत्याही पद्धतीचा अन्याय केलेला नाही. पण त्यांनी आता भाजपसारख्या बेगडी हिंदुत्ववादी पक्षाचा आधार घेतलाय. त्यांनी त्या पद्धतीने शिवसेनेचा आणि बाळासाहेब ठाकरेंचा अवमान केला आहे. त्यांच्या जाण्याने कोणत्याही पक्षावर, मतदारसंघातही परिणाम होणार नाही” असा दावा महाडेश्वरांनी केला.
“बाळा सावंत आणि तृप्ती सावंत हे शिवसेनेचे खंदे फलंदाज होते. त्या पद्धतीने त्यांना शिवसेनेत आमदारकीही मिळाली होती पण आता जे केलेले आहे ते निराशाजनक आहे” अशी प्रतिक्रिया मुंबई महापालिकेतील सुधार समितीचे अध्यक्ष सदा परब यांनी दिली.
तृप्ती सावंत यांचा भाजप प्रवेश
शिवसेनेच्या माजी आमदार तृप्ती सावंत यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं ‘मातोश्री ‘ निवासस्थान असलेल्या वांद्रे पूर्व या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व तृप्ती सावंत यांनी केलं होतं. मात्र विधानसभा निवडणुकीत शिवसेना उमेदवार विश्वनाथ महाडेश्वर यांच्याविरोधात बंडखोरी केल्यामुळे सावंत यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली होती. (Shivsena Leader Vishwanath Mahadeshwar reacts on former MLA Trupti Sawant joining BJP)
कोण आहेत तृप्ती सावंत?
– तृप्ती सावंत या शिवसेनेचे दिवंगत आमदार बाळा सावंत यांच्या पत्नी आहेत
– बाळा सावंत यांच्या निधनाने, 2015 च्या पोटनिवडणुकीत तृप्ती सावंत यांना उमेदवारी
– शिवसेनेकडून लढताना तृप्ती सावंत यांच्याकडून नारायण राणेंचा पराभव
– 2019 च्या निवडणुकीत तृप्ती सावंत यांना डावलून विश्वनाथ महाडेश्वरांना उमेदवारी
– मात्र 2019 मध्ये तृप्ती सावंत यांच्याकडून बंडखोरी करत निवडणूक लढवली
– या निवडणुकीत ना शिवसेनेचा विजय, ना तृप्ती सावंतांचा,
– काँग्रेसच्या झिशान सिद्दिकींनी बाजी मारली
संबंधित बातम्या
‘मातोश्री’च्या अंगणात शिवसेनेला जबर धक्का, माजी आमदाराचा भाजपमध्ये प्रवेश
जिद्दीला पेटलेल्या नारायण राणेंना हरवलं, ‘मातोश्री’वर विजयाचा गुलाल, कोण आहेत तृप्ती सावंत?
(Shivsena Leader Vishwanath Mahadeshwar reacts on former MLA Trupti Sawant joining BJP)