Shivsena NCP : शिवसेनेच्या नेत्यांच्या डोळ्यात राष्ट्रवादी, शरद पवार का खुपतायत? 5 नेत्यांची ही 5 वक्तव्य बघा
शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या आघाडीचं सरकार राज्यात असूनही गेल्या काही दिवसांमध्ये शिवसेनेच्या नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेससंदर्भातील नाराजी दर्शवणारी वक्तव्य केली आहेत.
मुंबई: महाराष्ट्रात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्त्वात महाविकास आघाडी सरकार स्थापन झालं. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्या पाठिंब्यावर उद्धव ठाकरे यांचं सरकार आलं. शिवसेना (Shivsena) आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या आघाडीचं सरकार राज्यात असून गेल्या काही दिवसांमध्ये शिवसेनेच्या नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेससंदर्भातील (NCP) नाराजी दर्शवणारी वक्तव्य केली आहेत. उस्मानाबाद येथील आमदार आणि माजी मंत्री तानाजी सावंत, गजानन किर्तीकर, श्रीरंग बारणे यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यपद्धतीवर टीका केलीय. तर, शिवसेनेचे परभणीचे खासदार संजय जाधव यांनी गेल्या वर्षी राष्ट्रवादीला पायाखाली घालू, असं म्हटलं होतं. तर, रायगडमधील माजी खासदार शिवसेना नेते अनंत गीते यांनी महाविकास आघाडी सरकार ही तडजोड असल्याचं म्हटलं होत. तर, राष्ट्रवादी काँग्रेसचा जन्म काँग्रेसच्या पाठीत खंजीर खूपसून झाल्याचं ते म्हणाले होते. गृह विभागाच्या धोरणावरुन शिवसेनेनं राष्ट्रवादी काँग्रेस बद्दल नाराजी दर्शवल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर शिवसेना नेत्यांच्या वक्तव्याचा आढावा घेण्यात आला.
तानाजी सावंत काय म्हणाले?
आम्हाला सत्तेत बसायची सवयच नव्हती. शिवसेना हा विस्थापितांचा गट आहे, कुणाही आजमावून बघू नये. शिवसेनेला दुय्यम वागणूक मिळते. अर्थसंकल्पातही तेच दिसून आलं. 60 ते 65 टक्के बजेट राष्ट्रवादीला, 30 ते 35 टक्के काँग्रेसला, त्यातही 16 ठक्के पगारासाठी काढावे लागतात. विकासकामाला केवळ 10 टक्के मिळतात. राष्ट्रवादीचा ग्रामपंचायत सदस्यही कोटी रुपये आणतो आणि आमच्या छातीवर नाचतो. आम्हाला केवळ गोड बोललं जातं. आम्ही केवळ आदेशाची वाट पाहतोय. जोपर्यंत सहन होईल तोवर सहन करु. आमची राष्ट्रवादी आणि काँग्रेसवर प्रचंड नाराजी आहे, अशा शब्दात तानाजी सावंत यांनी जाहीरपणे आपली भूमिका मांडली होती.
पाहा व्हिडीओ
गजानन किर्तीकर काय म्हणाले?
रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील शिर्दे येथे ब्राम्हणवाडी ते कोळबांद्रे रस्त्याच्या डांबरीकरण कामाच्या भूमिपूजन समारंभाला खासदार गजानन किर्तीकर उपस्थित होते. एका आमदाराला त्याच्या मतदार संघात विकास कामासाठी शासनाकडून निधी मिळविण्यासाठी मोठे प्रयत्न करावे लागतात, असं किर्तीकर म्हणाले होते. विकास कामांच्या निधीमध्ये पळवापळ केली जात असून ग्रामविकास मंत्रालयाच्या 25 /15 योजनेमधून निधी मिळविण्यासाठी मोठी स्पर्धा पाहावयास मिळते. आम्हाला मुंबईमध्ये हा प्रश्न उद्भवत नाही, मुंबईमध्ये नागरोत्थान, नगरविकासचा निधी मिळतो, मुख्यमंत्र्यांच्या मागे लागून आम्ही निधी मिळवितो. मात्र, निधीची पळवापळवी केली जात असून “ आम्ही म्हणायचे ठाकरे सरकार पण प्रत्यक्ष लाभ कोण घेतो, पवार सरकार” असे म्हणत त्यांनी निधी वाटपात शिवसेनेवर अन्याय होत असल्याने नाराजी व्यक्त केली होती.
पाहा व्हिडीओ
संजय जाधव काय म्हणालेले?
गेल्या वर्षी शिवसेनेचे परभणीचे खासदार राष्ट्रवादी काँग्रेस विरोधात आक्रमक झाले होते. “आमच्याही भावना अनावर होतात हे लक्षात ठेवा. शेवटी काही मर्यादा असतात. कुठपर्यंत शांत बसायचं, कुठ पर्यंत सहन करायचं. जेव्हा माकडीण सुद्धा स्वत:ला बुडायची वेळ आल्यावर लेकराला पाया खाली घालते हे लक्षात ठेवा. तर राष्ट्रवादीला आम्ही केव्हाही पायाखाली घालू शकतो हे तुम्हाला सांगतो. शेवटी आम्ही आता सहनशीलतेच्या पलिकडे गेलो आहोत, असं संजय जाधव म्हणाले होते.
पाहा व्हिडीओ
राष्ट्रवादीचा जन्म काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपूसन: अनंत गीते
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे आमचे नेते होऊ शकत नाहीत. महाविकास आघाडी ही केवळ तडजोड आहे. राष्ट्रवादीचा जन्म काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून झाला आहे, असा हल्लाबोल शिवसेना नेते आणि माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी रायगडमध्ये केले होते.
पाहा व्हिडीओ
राष्ट्रवादी काँग्रेस मुख्यमंत्र्यांच्या स्वभावाचा गैरफायदा घेतेय: श्रीरंग बारणे
राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेला डिवचण्याचा मुद्दाम प्रयत्न करत आहे. महाविकास आघाडीत राष्ट्रवादीकडून शिवसेनेसोबत दूजाभाव केला जातोय. निधी वाटपातही दूजाभाव होतोय. मावळ लोकसभेची जागा सोडण्याची मागणी केली की ती करायला लावली हे शोधलं पाहिजे. ज्यांनी ही मागणी केली ते कोण आहेत, त्यांना मी ओळखत नाही. सध्या राज्यातील सत्तेचा सर्वाधिक लाभ राष्ट्रवादी काँग्रेसच घेतेय. राष्ट्रवादी काँग्रेस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या स्वभावाचा गैरफायदा घेत आहे, असा गंभीर आरोप बारणे यांनी केला होता.
पाहा व्हिडीओ
इतर बातम्या:
Breaking News: कामावर रुजू न झालेल्यांवर उद्यापासून कारवाई! अनिल परब यांनी ठणकावलं, म्हणाले…