नाथाभाऊंनी मला मुलगा मानलं असतं, तर वाईट वेळ आली नसती : गुलाबराव पाटील
एकनाथ खडसेंनी माझा मुलगा म्हणून माझा वापर केला असता, तर मी पक्का माणूस आहे. पिछे नही हटेगा, असं गुलाबराव पाटील म्हणताच एकच हशा पिकला.
जळगाव : नाथाभाऊंनी मला वडिलांसारखं प्रेम दिलं, मात्र मुलगा कधी मानलं नाही, त्यामुळे ही वाईट वेळ आली, अशा कानपिचक्या शिवसेना नेते आणि पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी लगावल्या आहेत. भुसावळमध्ये आयोजित जाहीर सत्कारात गुलाबराव (Gulabrao Patil on Eknath Khadse) बोलत होते.
भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी मला वडिलांसारखं प्रेम दिलं, मात्र मुलगा कधी मानलं नाही, त्यांनी मुलगा म्हणून माझा वापर केला असता, तर मी पक्का माणूस आहे. पिछे नही हटेगा, असं गुलाबराव पाटील म्हणताच एकच हशा पिकला.
‘नाथाभाऊंनी अशा लोकांना सोबत ठेवलं, त्यांचा रक्त ग्रुप चेक केला नाही, जर त्यांनी रक्त ग्रुप चेक करुन माणसं ठेवली असती, तर गुलाबराव पाटलासारखा सच्चा माणूस कधी तुटला नसता. आणि तुटू शकणारही नाही. कालसुद्धा रक्षाताई खडसे लोकसभेला उभ्या राहिल्या, तेव्हा मी त्यांच्या प्रचाराला गेलो होतो. माझी मागची दुश्मनी काढली नाही, कारण मला या देशाचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाहायचं होतं’, असं गुलाबराव पाटील यांनी सांगितलं.
आडनाव ठाकरे नसतं, तर संगीतकारांमध्ये दिसले असते : गुलाबराव पाटील
‘हम तो दिलसे चलनेवाले है, मी मनाने चालणारा माणूस आहे, सच्चा दिलाने चालणारा माणूस आहे. मी कोणत्या पक्षाचा आमदार मानत नाही. राजकारणात कधीच कोणी कोणाचा दुश्मन नसतो. कधी वाटलं होतं का तीन लोकांचं सरकार बनेल?’ असा प्रश्न विचारत गुलाबराव पाटलांनी हास्याचे कारंजे उडवले.
राजकारणात परखड दुश्मनी नको, विचारांची लढाई आहे. ज्या दिवशी विचारांची लढाई सोडून निवडणूक लागेल, त्यावेळी मी तुमच्या विरुद्ध प्रचाराला येईन, मै आऊंगा, मी प्रचार करायला येईन, मी पुन्हा येईन ना, असा टोलाही गुलाबरावांनी लगावला.
Gulabrao Patil on Eknath Khadse