शिवसेनेपेक्षा राष्ट्रवादीच्या आमदारांची कामे जलद, सेना आमदारांचा मुख्यमंत्र्यांकडे नाराजीचा सूर
याआधी लॉकडाऊनचा कालावधी, प्रशासकीय, सनदी आणि पोलीस अधिकारी यांच्या बदल्यांवरुन राष्ट्रवादी- शिवसेनेत असलेले मतभेद उघड झाले होते
मुंबई : शिवसेनेच्या आमदारांपेक्षा राष्ट्रवादीच्या आमदारांची कामे जलद होतात, असा सूर शिवसेना आमदारांनी आळवला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत झालेल्या आभासी बैठकीत हा मुद्दा सेना आमदारांनी मांडल्याची माहिती आहे. उद्धव ठाकरे यांच्यासह रविवारी शिवसेना आमदारांची व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक पार पडली होती. (Shivsena MLAs upset claims NCP MLAs demands get faster approval)
राष्ट्रवादी काँग्रेसकडे अर्थ खाते आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार अर्थमंत्री असल्याने त्यांच्या पक्षातील आमदारांची कामे पटापट होतात, असा दावा सेना आमदारांनी केला आहे. शिवसेनेच्या आमदारांच्या कामांना हवी तशी गती मिळत नसल्याची खंत आमदारांनी बैठकीत मांडली.
हेही वाचा : उद्धव ठाकरेंची शिवसेना आमदारांसोबत तब्बल 4 तास बैठक, रवींद्र वायकर यांची खास पदी नियुक्ती
याआधी लॉकडाऊनचा कालावधी, प्रशासकीय, सनदी आणि पोलीस अधिकारी यांच्या बदल्यांवरुन राष्ट्रवादी- शिवसेनेत असलेले मतभेद उघड झाले होते.
रवींद्र वायकर यांना खास जबाबदारी
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेना आमदारांच्या मागण्यांकडे विशेष लक्ष देता यावे म्हणून आमदार रवींद्र वायकर यांची समन्वयक म्हणून नियुक्ती केली आहे. त्यांच्यावर सेना आमदारांच्या मागण्या समजून घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत पोहचवण्याची जबाबदारी आहे. या मागण्याचा सातत्याने पाठपुरावा व्हावा आणि शक्य ती कामं लवकरात लवकर व्हावी असा या मागील उद्देश असल्याचं सांगितलं जात आहे.
शिवसेनेच्या आमदारांच्या आपआपल्या मतदारसंघानुसार अनेक मागण्या आहेत. मात्र, या मागण्यांचा योग्य पाठपुरावा झाला नाही. त्यासाठीच उद्धव ठाकरे यांनी रवींद्र वायकर यांची नियुक्ती केली. त्यांच्यावर आमदार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात समन्वय राखण्याची जबाबदारी असेल.
रवींद्र वायकर यांनी याआधी युती सरकारमध्ये मंत्रिपद भूषवलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या आमदारांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेतली. जवळपास 4 तास उद्धव ठाकरे यांनी शिवसेना आमदारांच्या अडचणी समजून घेतल्या.
या बैठकीत रवींद्र वायकर हे मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारीत समन्वयक म्हणून काम करतील असा निर्णय उद्धव ठाकरे यांनी घेतला. यापुढील काळात रवींद्र वायकर शिवसेना आमदारांच्या अडलेल्या कामांचा पाठपुरावा करणार आहेत. रवींद्र वायकर शिवसेनेचे जोगेश्वरी विधानसभा मतदार संघाचे आमदार आहेत.
VIDEO : 36 जिल्हे 72 बातम्या | 11 August 2020 https://t.co/4brkDJUOWM
— TV9 Marathi (@TV9Marathi) August 11, 2020
(Shivsena MLAs upset claims NCP MLAs demands get faster approval)