नारायण राणेंच्या अटकेसाठी मंत्री अनिल परबांचे फोन, खासदार विनायक राऊत म्हणतात, ‘मग त्यात गैर काय?’
शिवसेना नेते परिवहन मंत्री अॅड. अनिल परब यांनी पोलिसांना सूचना दिल्या असतील तर त्यात गैर ते काय? कारण ते रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी ते पोलिसांना सूचना करु शकतात, असं स्पष्टीकरण शिवसेना नेते खासदार विनायक राऊत यांनी दिलं आहे.
रत्नागिरी : शिवसेना नेते परिवहन मंत्री अॅड. अनिल परब (Anil Parab) यांनी पोलिसांना सूचना दिल्या असतील तर त्यात गैर ते काय? कारण ते रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी ते पोलिसांना सूचना करु शकतात, असं स्पष्टीकरण शिवसेना नेते खासदार विनायक राऊत यांनी दिलं आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्या अटकेसाठी शिवसेना नेते परिवहन मंत्री अॅड. अनिल परब यांनी पोलिसांवर दबाव आणल्याचा आरोप काल भाजपने केला. भाजपच्या आरोपांना आज विनायक राऊत यांनी उत्तर दिलं.
‘परब यांनी पोलिसांना सूचना दिल्या असतील तर त्यात गैर ते काय?
परिवहन मंंत्री आणि रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब यांनी काल नारायण राणे यांना अटक होण्यापूर्वी काही मिनिटे अगोदर पत्रकार परिषद घेतली. याच पत्रकार परिषदेतली एक क्लिप व्हायरल झाली ज्यामध्ये ते राणेंच्या अटकेसाठी पोलिसांना सूचना करत होते. यावर भाजपने आक्षेप नोंदवत हा मातोश्रीवरुन सगळा प्लॅन ठरला होता. आता परब यांना आम्ही कोर्टात खेचणार आहोत, अशी आक्रमक भूमिका चंद्रकांत पाटील यांनी घेतली. त्यावरच विनायक राऊत यांनी भाजपला प्रत्युत्तर दिलं आहे. ‘परब यांनी पोलिसांना सूचना दिल्या असतील तर त्यात गैर ते काय?, असा प्रतिसवाल त्यांनी केला आहे.
पोलिसांनी कायद्याचं पालन केलं
राणेंच्या अटकेसाठी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री आणि शरद पवार यांची संमती होतीआणि पद्धतशीरपणे प्लॅन झाला, या चर्चांवर बोलताना त्यांनी भाजपवर निशाणा साधला. या सगळ्या वायफळ बडबडी आहेत. राणे समर्थकांनी या सगळ्या अफवा पसरवलेल्या आहेत. मी इतकंच म्हणेन कायद्याचं पालन झालं, कायद्याच्या रक्षकांनी त्यांचं काम केलं, असं विनायक राऊत म्हणाले.
राणेंना बाबासाहेबांच्या संविधानाची ताकद कळाली असेल
राणेंवर टीका करताना विनायक राऊत म्हणाले, “नारायण राणेंना आतापर्यंत 302, 326, 337, 506 (2) एवढीच माहिती आतापर्यंत राणेंनी होती पण आता राणेंना कालच्या घटनेवरुन बाबासाहेबांना लिहिलेला कायदा कळाला. केंद्रीय नेत्याने मुख्यमंत्र्यांचा अपमान केला तर काही होऊ शकत नाही, या गैरसमजात राणे होते, पण कालच्या घटनेवरुन त्यांना संविधान आणि कायद्याची ताकद कळाली असेल”
फडणवीस अभ्यासू, राणेंच्या धुडगुसीचं समर्थन करणार नाहीत
देवेंद्र फडणवीस एक अभ्यासू व्यक्तिमत्व आहे, ते राणेंच्या धुडगूसाचं समर्थन करणार नाहीत, पण सध्या त्यांचा नाईलाज आहे, घेतलंय पदरात तर लटकत का होईना ते समर्थन करत आहेत, असाही चिमटा त्यांनी फडणवीसांना काढला.
EXCLUSIVE : नारायण राणेंच्या अटकेची इनसाईड स्टोरी, अनिल परब सतत पोलिसांच्या संपर्कात, अटकेसाठी दबाव?
(Shivsena MP Vinayak Raut Statement on Anil Parab phoneCall police over Narayan Rane Arrest process)