Eknath Shidne | मुख्यमंत्रीपदावरचं मळभ हटणार, शिंदे गटाच्या शिवसेनेला मान्यता मिळणार? भुजबळांच्या बंडावेळी काय घडलं?
एकनाथ शिंदेंचा गट भाजप, प्रहार किंवा मनसेमध्ये विलीन होण्याची शक्यता फेटाळली जात आहे.
मुंबईः एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची (Maharashtra CM) शपथ तर घेतलीय, मात्र शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी हा शपथविधीच बेकायदेशीर असल्याचा आरोप केला आहे. पक्षप्रमुखांनी एकनाथ शिंदे यांना शिवसेनेच्या नेतेपदावरून हकालपट्टी केली आहे. तसेच एकनाथ शिंदे गटाने आम्ही उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेपासून वेगळे आहोत, असे सांगितले आहे. पक्षांतर बंदीच्या कायद्यानुसार, त्यांनी कोणत्याही पक्षात विलीन होण्याचा निर्णयही घेतलेला नाही. आम्हीच शिवसेना असे ते म्हणत असले तरीही यासाठीची कायदेशीर प्रक्रिया अद्याप झालेली नाही, त्यामुळे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली तरीही ते नेमके कोणत्या पक्षाचे आहेत, हाच घोळ असून हे पदच अवैध असल्याचा आरोप केला जातोय. मात्र पुढील दोन ते तीन दिवसात मुख्यमंत्री पदाभोवतीचं मळभ दूर होण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्रीपदाभोवतीचं मळभ कसं दूर होणार?
शिवसेनेतून बंड करून बाहेर पडलेल्या 39 आमदारांना आता मनसेचाच पर्याय असल्याच्या वावड्या उठत आहेत. मात्र यात फार तथ्य नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेत-त्वाखालील शिवसेना बंडखोर गटाला विधानसभेत स्वतंत्र गट म्हणून मान्यता मिळू शकते. शिंदे गटाने शिवसेनेविरुद्ध बंड केले असले तरीही विधीमंडळाच्या कामकाजात मूळ पक्ष आणि त्या पक्षाचा विधीमंडळ पक्ष हे दोन स्वतंत्र घटक मानले जातात. त्यामुळे पक्षातून बंडखोरी करत बाहेर पडलेल्या गटाने दुसऱ्या एखाद्या पक्षात विलीन झालेच पाहिजे, अशी सक्ती कायद्यानुसार नाही.
शिंदे एस म्हणून मान्यता मिळणार?
सूत्रांनी वर्तवललेल्या शक्यतेनुसार, सोमवार, मंगळवार बोलावण्यात आलेल्या दोन दिवसीय विशेष अधिवेशनात बहुमत सिद्ध केले जाईल. विधानसभा अध्यक्ष निवडला जाईल. त्यामुळे विधानसभा अध्यक्षांचे जे अधिकार राष्ट्रवादीचे आमदार आणि विद्यमान उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्या हाती गेले आहेत, ते संपुष्टात येतील. त्यानंतर नव निर्वाचित अध्यक्ष शिंदे गटाला मान्यता देण्याचा निर्णय घेतील. शिंदे गटाला शिवसेना एस म्हणून मान्यता मिळू शकते. एवढंच नाही तर पुढील अडीच वर्षे किंवा पाच वर्षांसाठी ही मान्यता मिळेल.
छगन भुजबळांच्या बंडावेळी काय झालं होतं?
छगन भुजबळ यांनी 1991 मध्ये शिवसेनेशी बंड केलं होतं तेव्हा त्यांच्या गटालाही शिवसेना बी असं नाव देण्यात आलं होतं. याच नावाने त्यांचा स्वतंत्र गट स्थापन कऱण्यात आला होता. आताही भुजबळांप्रमाणेच शिवसेनेतील शिंदे गटालाही मान्यता मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे एकनाथ शिंदेंचा गट भाजप, प्रहार किंवा मनसेमध्ये विलीन होण्याची शक्यता फेटाळली जात आहे.